Leading International Marathi News Daily

मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

प्रादेशिक

राणे यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी !
मुंबई, १६ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

मुख्यमंत्रीपद नाकारल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवणारे नारायण राणे यांचे निलंबन मागे घेण्यात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली आहे. राणेंच्या संबंधात दिल्लीत दोन मतप्रवाह होते. एका गटाचे, म्हणजे विलासरावांच्या समर्थकांचे म्हणणे असे की ‘राणे काँग्रेस संस्कृती’चे पालन करीत नाहीत. याउलट राणेंची बाजू मांडणारे सांगत की, राणेंना विरोधात ठेवणे काँग्रेसला परवडणारे नाही. या पाश्र्वभूमीवर राज्यात राणे हे उपयुक्त ठरू शकतात, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज्याचे प्रभारी ए. के. अ‍ॅन्टोनी यांना पटवून दिले.

‘सेन्सेक्स’ची ३२९ अंशांनी घसरगुंडी
मुंबई, १६ फेब्रुवारी/व्यापार प्रतिनिधी

आर्थिक मंदीच्या झळा कमी करण्यासाठी उद्योगक्षेत्रासाठी आणखी एखादे उभारी देणारे ‘पॅकेज’ येईल अशी अपेक्षा असताना, संसदेत सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून पुरता अपेक्षाभंग झाल्याने मुंबई शेअर बाजाराने आज मोठय़ा घसरणीची प्रतिक्रिया नोंदविली. अर्थसंकल्पाने केलेल्या निराशेला आज आशियाई शेअर बाजारांमधील नरमाईनेही हातभार लावला आणि ‘सेन्सेक्स’ कालच्या तुलनेत ३२९.२९ अंशांची तूट नोंदवून बंद झाला.

महापालिकेचे ‘बेकायदा’ परिपत्रक मागे घेण्याची मागणी
मुंबई, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

विकासकाने इमारतीच्या मंजूर आराखडय़ाचे उल्लंघन करून केलेले बांधकाम दंड आकारून नियमाधीन करण्यासंबंधी महापालिकेने कार्यालयीन परिपत्रकान्वये ठरविलेले नवे धोरण याविषयी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे पूर्णपणे उल्लंघन करणारे, बेकायदा बांधकाम करण्यास विकासकांना प्रोत्साहन देणारे व मुळात आयुक्तांच्याही अधिकारकक्षेच्या बाहेरचे असल्याने ते तात्काळ मागे घेतले जावे, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेने केले आहे.

हाती काहीच न लागल्याने उद्योगक्षेत्र निराश
मुंबई, १६ फेब्रुवारी/व्यापार प्रतिनिधी

अंतरीम अर्थसंकल्पाबाबत उद्योगक्षेत्राच्या फारशा अपेक्षा नसल्या तरी, सध्याच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी आणखी एखाद्या ‘पॅकेज’ अपेक्षा पूर्ण न झाल्याने उद्योगक्षेत्राने सार्वत्रिक निराशेची प्रतिक्रिया दर्शविली. सर्वाधिक अपेक्षा असलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्राचे सोडाच पण कोणत्याच उद्योगक्षेत्रासाठी कोणतीच तरतूद अर्थसंकल्पात नाही, अशी प्रतिक्रिया पाश्र्वनाथ डेव्हलपर्सचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी व्यक्त केली.

जलवाहिन्यांलगतच्या झोपडय़ांवर अखेर कारवाई!
मुंबई, १६ फे ब्रुवारी / प्रतिनिधी

मुंबईतील जलवाहिन्यांलगत असणाऱ्या झोपडपष्य़ांवर पालिकेने काय कारवाई केली याचा खुलासा उच्च न्यायालयाने मागितल्यानंतर पालिकोयंत्रणेला जाग आली असून, आज वांद्रे येथील जलवाहिन्यांलगतच्या अडीचशे झोपडय़ांवर पालिकेने कारवाई केली. विशेष म्हणजे या झोपडय़ा तोडताना संभाव्य निवडणुका लक्षात घेऊन २००० नंतरच्याच झोपडय़ा तोडण्याची खबरदारी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली. मुंबईच्या जलवाहिन्यांना पडलेला झोपडपष्य़ांचा विळखा सोडवण्यासाठी न्यायालयाने आदेश देण्याबाबतची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. न्यायालयाने याबाबतचे स्पष्टीकरण पालिकेकडे मागितले आहे. न्यायालयाचा दणका बसू नये यासाठी जलवाहिन्यांलगतच्या अनधिकृत झोपडय़ांवर कारवाई करणे पालिकेला आवश्यक होते. मात्र संभाव्य लोकसभा निवडणूका लक्षात घेता सन २००० पर्यंतच्या मुंबईतील झोपडय़ा अधिकृत करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वांद्रे येथील झोपडया तोडताना २००० नंतर बांधलेल्याच झोपडय़ा तोडण्याची पुरती खबरदारी पालिकेने घेतली. शांतीलाल कंपाऊंड ते गेट क्र. १८ या अर्धा किलोमीटरच्या मार्गातील जलवाहिन्यांभोवतालच्या झोपडय़ा आज चार जेसीबी व ११ डंपर्स यांच्याबरोबर मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्तात तोडण्यात आल्या.

सीएसटी उपनगरी स्थानकातील फूड प्लाझा शुक्रवारी खुला होणार
मुंबई, १६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सीएसटी उपनगरी स्थानकातही येत्या २० तारखेपासून नवा वातानुकूलित फूड फ्लाझा सुरू होणार आहे. ‘रिफ्रेश’ नावाचा हा फूड प्लाझा चोवीस तास सुरू राहणार असल्याने, शेवटची लोकल चुकल्यानंतरही प्रवाशांना पेटपुजेची चिंता भेडसावरणार नाही.इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉपोरेशनच्या (आयआरसीटीसी) धोरणानुसार ‘गोयल अ‍ॅण्ड गोयल’ या खासगी कंपनीने हा फूड फ्लाझा उभारला आहे. या दुमजली फूड प्लाझामध्ये बिस्किटे, आयस्क्रीम, ज्यूस, स्नॅक्स या गोष्टींखेरीज जेवणाचीही सोय असेल. त्यामध्ये महाराष्ट्रीय, दाक्षिणात्य, पंजाबी, चायनीज पदार्थ तेथे मिळतील. हा वातानुकूलित फूड प्लाझा दुमजली आहे. सीएसटीच्या हेरिटेज वास्तूच्या सौंदर्याला कोणतीही बाधा येणार नाही, अशाप्रकारे तो सजविण्यात आला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

जेएनआरयुएमअंतर्गत राज्याला मिळाले १० हजार ७८० कोटी
मुंबई, १६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांकरिता जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुननिर्माण अभियानांतर्गत १० हजार ७८० कोटींची मंजुरी देण्यात आली. राज्याला मंजूर झालेल्या निधीपैकी मुंबई महानगर प्रदेशाकरिता पाच हजार २२७ कोटी आणि प्रिन्स ऑफ वेल्स ते आणिक पांजरपोळ येथील पूर्व मुक्त मार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग ते आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील उन्नत मार्गाकरिता ४९१ कोटीच्या राखीव निधीलादेखील मान्यता देण्यात आली. मुंबईची भविष्यातील पाणी पुरवठय़ाची गरज भागवण्यासाठी मध्य वैतरणा पाणी पुरवठा प्रकल्पाला एक हजार ३२९ कोटी, मलनिस्सारण व्यवस्थापक प्रकल्पासाठी ३६४ कोटी, मलबार हिल रिझव्‍‌र्हायर ते क्रॉस मैदानापर्यंत भूमिगत बोगदयासाठी ९४ कोटी, मरोशी ते रूपारेल महाविदयालयपर्यंत भूमिगत बोगदा २९४ कोटी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी १७८ कोटीच्या कामांना मंजूरी देण्यात आली.

आरे भास्कर उद्यानास मुंबई महानगरपालिकेचे प्रथम पारितोषिक
मुंबई, १६ फेब्रुवारी /प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभागातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या उद्यान स्पर्धेत आरे भास्कर संस्था, गोरेगाव (पू.) येथील उद्यानास ‘अ’ वर्ग उद्यानाचे २००८ सालचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले.शिवसेनानेते, आमदार गजानन कीर्तीकर आरे भास्कर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून, त्यांच्या कल्पनेतील या उद्यानाचे संकल्प चित्र आराखडा सुप्रसिद्ध वास्तुविशारद शेखर दादरकर यांनी साकारले आहे.दिंडोशी येथील आरे भास्कर जॉगस पार्क महापालिकेच्या भूखंडावर सुमारे साडेसात कोटी रुपये खर्च करून विकसित केला आहे. सुमारे दोनशे प्रकारची विविध झाडे, फुलझाडे लावण्यात आली आहेत. अत्यंत दुर्मीळ जातीचे वृक्ष पाहण्यासाठी वनस्पतीप्रेमी व अभ्यासक उद्यानास आवर्जून भेट देतात. योग केंद्र, व्यायामशाळा, वाचनालय अत्यंत आकर्षक पद्धतीने उभारण्यात आली आहे. किमान २५ प्रकारचे विविधरंगी मासे असलेला पाण्याचा तलावही बांधण्यात आलेला आहे. एक किलोमीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक बांधला असून, जागोजागी विश्रांतीसाठी आकर्षक लाकडी बाके बसविण्यात आली आहे.

‘काँग्रेसने माघार घेण्यासाठी सयुक्तिक कारण द्यावे’
मुंबई, १६ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

जागावाटपात काँग्रेसचा २७ जागांचा दावा सयुक्तिक आहे. काँग्रेसने कमी जागा स्वीकारून माघार घेण्याचे कारण काय हे राष्ट्रवादीने पटवून द्यावे, असे आव्हानच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीला दिले.एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे यांनी राष्ट्रवादीचा जागावाटपाबाबतचा पर्याय फेटाळून लावला. राष्ट्रवादीने समविचारी पक्षांसाठी जागा निश्चित करून उर्वरित जागांचे समप्रमाणात वाटप करावे, असा प्रस्ताव दिला आहे. हा पर्याय मान्य नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. गेल्या पाच वर्षांंतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालांचा अभ्यास केल्यास काँग्रेस पुढे असल्याचे सिद्ध होते, असे ते म्हणाले.

पाणी टंचाईवरून नगरसेवकांमध्ये तू तू-मैं मैं!
ठाणे, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

शहरातील अनेक भागात अनियमित पाणीपुरवठा होत असल्यावरून सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. मात्र यावेळी नगरसेवकांमधील वादावादीच अधिक रंगली. वागळे भागात पाणी टंचाई असल्याची बाब या भागातील नगरसेवकांनी मांडली. इंदिरानगर, लोकमान्यनगर या भागात पाणी नाही. चार-चार दिवस लोकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरली असून, त्यांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागते. असे या भागातील नगरसेवकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले. त्यावर या भागातील पाणी वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी लवकरच कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती केली जाईल आणि पाणी टंचाईवर मार्ग काढला जाईल, असे आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी सांगितले. कळव्यातही तीव्र पाणी टंचाई जाणवत असून, आम्हाला एमआयडीसीचे पाणी नको, स्टेमचे द्या, अन्यथा मोर्चा काढू असा इशारा शिवसेनेचे गटनेता राजेंद्र साप्ते यांनी दिला. मात्र कळव्यात मुबलक पाणी असून साप्ते यांनी सभागृहाची दिशाभूल करू नये, आपल्याच प्रभागापुरते बोलावे, असा टोला राष्ट्रवादीचे मिलिंद साळवी यांनी लावला. त्यावरून कळव्यातील नगरसेवकांमध्ये बराच काळ आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या, अखेर पाणी खाते चांगले काम करीत असून, त्यांचे कौतुक करा, असा सल्ला अपर्णा साळवी यांनी दिला.

डॉ. नंदू लाड यांचा उद्या सत्कार
मुंबई, १६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

शुश्रूषा इस्पितळाचे अध्यक्ष डॉ. नंदू लाड यांना ओरिसाच्या उत्कल विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी प्रदान केल्याबद्दल त्यांचा सत्कार येत्या बुधवारी १८ फेब्रुवारी रोजी दादरच्या वनिता सभागृहात सायंकाळी ४ वाजता आयोजिण्यात आला आहे. नंदू लाड सत्कार समितीने या सत्कारसमारंभाचे आयोजन केले असून सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. हा सोहळा सारस्वत बँकेने पुरस्कृत केला आहे.

डॉ. रेखा डावर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार
मुंबई, १६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

जे. जे. इस्पितळाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. रेखा डावर यांना कुटुंब नियोजनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल यंदाचा डॉ. लाभशेटवार यूएसए फौंडेशनचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. उद्या सकाळी साडेनऊ वाजता सहार रोड येथील ग्रँड इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलात होणाऱ्या समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. गेल्या आठवडय़ात त्यांना मराठवाडा महिला भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आईपासून मुलाला एड्स होऊ नये यासाठी डॉ. डावर यांनी मोलाची कामगिरी केली आहे. आतापर्यंत आठशेहून अधिक एचआयव्हीग्रस्त मातांची यशस्वी प्रसूती करून केवळ औषधोपचाराद्वारे नवजात अर्भकाचा एड्सपासून बचाव केला आहे. याबाबत त्यांना नॅकोतर्फे सेंटर ऑफ एक्सलन्स हा गौरव प्राप्त झाला आहे. कुटुंब नियोजन तसेच सुरक्षित गर्भपाताच्या नव्या पद्धती शोधण्यातही त्यांचा वाटा आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांनी याआधीच गौरविण्यात आले आहे.

‘मुंबईचे प्रशासन’ या विषयावर परिसंवाद
मुंबई, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

मुंबईतील अनेकविध नागरी समस्यांवर काम करणाऱ्या ‘मुंबई विकास समिती’तर्फे येत्या गुरुवारी, १९ फेब्रुवारी रोजी ‘मुंबईचे प्रशासन’ या महत्त्वपूर्ण विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. दादर (प.) येथील डी. एल. वैद्य मार्गावरील विठ्ठल मंदिरात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होणाऱ्या या परिसंवादात माजी पालिका आयुक्त व राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर, राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका सुधा मोहन पालिकेचे माजी मुख्य अभियंता एस. एन. पाटणकर तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. गोपाळ शेष्ी, शिवसेनेचे आमदार सुभाष देसाई आदी राजकीय नेते सहभागी होणार आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी शरद बोडस - ९८६९५५३९०५ अथवा अनिल गचके - ९८२१७३१२८१ यांच्याशी संपर्क साधावा.

इंडियन मुजाहिदीनच्या २१ जणांवर आरोपपत्र दाखल होणार
मुंबई, १६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

देशाच्या विविध भागांत २००६ पासून घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी गटाच्या २१ जणांवर उद्या मुंबई पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या वतीने आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे विशेष सरकारी वकील कल्पना चव्हाण यांनी आज विशेष ‘मोक्का’ न्यायालयास सांगितले. अटक करण्यात आलेल्या २१ जणांच्या न्यायालयीन कोठडीतही आज न्यायालयाने उद्यापर्यंत वाढ केली आहे. अहमदाबाद, दिल्ली आणि बंगळुरू येथील बॉम्बस्फोटांच्या मालिकेसह देशाच्या विविध भागांत २००६ पासून स्फोट घडविण्यात आले होते.

मुलुंड येथील पेट्रोलपंपावरील १५ लाखांची रोकड लुटली
मुंबई, १६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुलुंड पश्चिम येथील लालबहाद्दूर शास्त्री मार्गावर असलेल्या छेडा पेट्रोलपंपवरील सुमारे १५ लाखांची रोकड मध्यरात्री पहारेकऱ्याला रिव्हॉल्व्हरच्या धाक दाखवून व चॉपरचा वार करून चार अज्ञात इसमांनी लुटली. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मध्यरात्री दीडच्या सुमारास एक इसम सदर पेट्रोलपंपवर आला. आपल्या मित्राला अपघात झाला असून तातडीने फोन करावयाचा आहे, असे सांगून त्याने पहारेकरी जमीनदारसिंग याला कार्यालयाचा दरवाजा उघडण्यास सांगितले. पहारेकऱ्याने दरवाजा उघडताच आणखी तीन इसम तेथे आले. त्यांनी पहारेकऱ्याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिजोरी दाखविण्यास सांगितले. तिजोरी फोडून त्यातील १५ लाख रुपये ताब्यात घेतले आणि पहारेकऱ्याला मारूती व्हॅनमध्ये कोंडून ते पळून गेले.