Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

इकडे तिकडे चोहीकडे, ‘पेव्हर ब्लॉक’ सगळीकडे
शशिकांत कोठेकर

पदपथावर तसेच मुख्य रस्त्याच्या कडेला तसेच गाडय़ा पार्क करायच्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवणे योग्य असताना मुंबई, ठाण्यात सर्रास सर्व रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसवले जातात. याबरोबर रस्त्यांवरील

 

खड्डे बुजवण्यासाठी देखील पेव्हर ब्लॉकचा मोठय़ा प्रमाणात वापर होऊ लागला आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉक वापरण्याची पद्धत पहिल्यांदा ठाणे शहरात सुरू झाली. मुंबईतही त्याचेच अनुकरण करण्यात आले. खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर म्हणजे गाडय़ांची पुरती वाट लावून घेण्यासारखे आहे, हे आता लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. रस्त्यांवरील खड्डय़ांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकल्याने खड्डा वरून बुजल्यासारखा दिसतो, मात्र अशा खड्डय़ामधून गाडी गेल्यावर गाडीतील माणसांना धक्के खावे लागतात. हल्ली रंगीत पेव्हर ब्लॉक वापरण्याची फॅशनच आली आहे. पदपथांवर रंगीत पदपथ लावणे समजू शकते मात्र मुख्य रस्त्यांवर देखील लाल, पिवळ्या रंगाचे पेव्हर ब्लॉक वापरण्याची शक्कल पालिका अधिकाऱ्यांनी वापरली आहे. अशा पेव्हर ब्लॉकचा नक्की उपयोग काय असा प्रश्न विचारला तर त्याचे त्यांच्याकडे उत्तर नाही.
पेव्हर ब्लॉकला असलेली वाढती मागणी लक्षात घेता अनेक कंपन्या आता पेव्हर ब्लॉक बनवण्याच्या उद्योगात उतरल्या आहेत. कंपन्या वाढल्याने कंत्राटे मिळविण्याची स्पर्धाही वाढली आहे. त्यामुळे नवीन रस्ते, छोटे रस्तेदेखील पेव्हर ब्लॉकने तयार करण्याचा आग्रह धरला जाऊ लागला. पेव्हर ब्लॉक परदेशातही बसवले जातात. मात्र त्याचे निकष वेगळे आहेत. मुख्य रस्त्यांवर, ज्या रस्त्यांवर वाहनांची वाहतूक जास्त आहे, अशा रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसवले जात नाहीत.