Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

चित्रपट चालती महोत्सवांची वाट..
सुनील डिंगणकर

वेगळ्या विषयावरील किंवा गंभीर विषय मांडणारे चित्रपट गेल्या वर्षी पूर्ण झाले असूनही ते व्यावसायिकदृष्टय़ा प्रदर्शित करण्यात आलेले नाहीत. यापैकी बहुतेक चित्रपट आधी महोत्सवांमध्ये दाखविले जाऊन मग ते सामान्य मराठी

 

प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्याचा ट्रेन्ड सध्या दिसून येत आहे.
‘मेड इन चायना’, ‘जोगवा’, ‘तांदळा’, ‘महासत्ता’, ‘बाई माणूस’, ‘मानसन्मान’, ‘मनातल्या मनात’ आदी वेगळ्या धाटणीचे चित्रपट महोत्सवाची वारी करून आल्यानंतरच व्यावसायिकदृष्टय़ा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. काही निर्माते-दिग्दर्शकांच्या मते मराठी चित्रपटावर महोत्सवाची मोहोर उमटल्यावरच मराठी प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी जातो तर काहींच्या मते महोत्सवामुळे चित्रपटाची चर्चा होण्यास मदत होत असली तरी त्याचा अपेक्षित परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसत नाही.
या संदर्भात मत व्यक्त करताना ‘जोगवा’चे प्रस्तुतकर्ते संजय पाटील म्हणाले की, महोत्सवात चित्रपट प्रदर्शित झाल्यावर विविध माध्यमांमधून त्याची चर्चा होते. सध्या सर्वसामान्य प्रेक्षकांना महोत्सवांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांविषयी आकर्षण निर्माण झाले आहे. महोत्सवांमुळे चित्रपटाला प्रसिद्धी मिळण्यास, पर्यायाने प्रेक्षकाला चित्रपटगृहाकडे खेचण्यास मदत होते. ‘गाभ्रीचा पाऊस’चे निर्माते प्रशांत पेठे यांच्या मते चित्रपटाला जाण्याआधी प्रेक्षकांना त्याच्या दर्जाबद्दल खात्री हवी असते. विनोदी चित्रपटांचा किंवा त्यातील प्रत्येक कलाकाराचा एक प्रेक्षकवर्ग आहे. वेगळ्या किंवा गंभीर धाटणीच्या विषयांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक पटकन येत नाही. महोत्सवांमधून चित्रपट दाखविण्यात आल्यामुळे त्याला आर्थिक फायदा होत नसला तरी चित्रपटाची प्रसिद्धी होण्यास मात्र मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या महोत्सवासाठी चित्रपट पाठविला आणि तो दाखविण्यात आला, असे होत नाही. त्या ठिकाणीही इतर चित्रपटांशी स्पर्धा करावी लागते. त्या तोडीचा चित्रपट असेल तरच तो महोत्सवांत दाखविला जातो. ‘मेड इन चायना’चे दिग्दर्शक संतोष कोल्हे यांच्या मते महोत्सवांचा आणि सर्वसामान्य प्रेक्षकांचा फारसा संबंध नाही. एखादा चित्रपट महोत्सवात दाखविला जाणे ही त्या चित्रपटातील दिग्दर्शक-कलाकारांच्या दृष्टीने चांगली बाब असते. कारण या निमित्ताने कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडत असते. महोत्सवात चित्रपट प्रदर्शित झाल्याने चित्रपटाची चर्चा होत असली तरी प्रेक्षक त्यामुळे चित्रपट पाहायला येतील, हा समज तितकासा योग्य नाही. ‘गंध’चे दिग्दर्शक सचिन कुंडलकरही याच मताचे आहेत. ते म्हणतात की, ‘फेस्टिवलछाप’ अशी या चित्रपटांची काही वेळा हेटाळणीही केली जाते. मराठी प्रेक्षकांची अजूनही मराठी चित्रपट पाहण्याची फारशी इच्छा नसते. महोत्सवामध्ये चित्रपट दाखविला गेल्यामुळे दिग्दर्शकाला प्रोत्साहन मिळते, एवढीच यात जमेची बाजू असते. अनेक मराठी प्रेक्षकांना ‘फॉरेन रिटन्र्ड’ कलाकृतींचे आकर्षण असते. त्यामुळे परदेशातील महोत्सवात मराठी चित्रपट गौरविला गेला तरच प्रेक्षकांचा मराठी चित्रपटाला जाण्याकडे कल दिसून आला आहे. ‘तांदळा’च्या निर्मात्या माधुरी अशीरगडे म्हणाल्या की, आमची कलाकृती केवळ आम्हाला आवडून चालत नाही. दुसऱ्याने पावती द्यावी लागते. त्यामुळे शासनाचे पुरस्कार जाहीर झाल्यावरच त्या ‘तांदळा’ प्रदर्शित करणार आहेत.
वर नमूद केले बहुतेक चित्रपट विविध चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेले आहेत. त्यांची समीक्षकांनी प्रशंसाही केली आहे. या चित्रपटांना महोत्सवांचा कितपत फायदा झाला ते मात्र हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.