Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

खार मंडईचा झाला ‘पिसांचा झुकता’ मनोरा!
प्रतिनिधी

इटली येथील पिसाचा झुकता मनोरा जगप्रसिध्द आहे तो संपूर्ण मनोरा एका बाजूला कलत जावूनही तो अद्यापि कोसळला नाही म्हणून. मनोऱ्याची ही इमारत एका बाजूने कलत चालली आहे आणि ते पाहायला देशविदेशातून पर्यटक येतात. मुंबईत देखील खार येथील पालिका मंडईच्या इमारतीची अवस्था

 

पिसाच्या अशा झुकत्या मनोऱ्याप्रमाणे झाली आहे.
१९८३ साली बांधलेली ही मंडई धोकादायक झाल्याने कोणत्याही क्षणी ही इमारत कोसळण्याची शक्यता आहे. या मंडईत ३६२ व्यापारी गाळे असून २३ कुटुंबे राहत आहेत. पहिल्या मजल्यावर पालिकेची वायुवैद्यक प्रयोगशाळा असून दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर पालिका कर्मचाऱ्यांसाठी २३ घरे बांधण्यात आली आहेत. इमारत धोकादायक झाल्याने त्यापैकी १० कुटुंबांनी अन्यत्र स्थलांतर करणे पसंत केले आहे. सर्वाधिक अडचण झाली आहे, ती दुकानदारांची. रोजचा व्यवसाय बंद करून दुसरीकडे दुकान कसे सुरू करणार असा प्रश्न त्याना पडला आहे. १९४५ साली जुनी मंडई बांधण्यात आली होती. नंतर १९८३ साली मंडईची नवीन इमारत बांधून तिचे नामकरण आचार्य आत्माराम भाऊ लाड मंडई असे करण्यात आले. मात्र पुरेशा देखभालीअभावी १६ वर्षांंतच या इमारतीची दुरावस्था झाली आहे. इमारतीच्या भिंतींचे प्लॅस्टर निघून गेले आहे. अनेक दुकानांच्या स्लॅबमधून पाण्याची गळती होत आहे. ८ डिसेंबर २००८ रोजी मंडईच्या स्लॅबचे प्लॅस्टर पडून एक ग्राहक जखमी झाला होता. गाळा क्र. ८५-८६ मध्ये मोठय़ा प्रमाणावर लिकेज असून त्याची दुरू स्ती करायला पालिकेला वेळ नाही. मंडईची इमारत धोकादायक झाली असून तिची पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचे पालिका अधिकारी मान्य करतात. त्यासाठी शुभम डेव्हलपर्स यांना काम देण्यात आले आहे. मात्र दरवेळेला मंडईबाबत पालिकेचे बदलणारे धोरण आणि मंडई पुनर्बाधणीबाबत होणारी दिरंगाई यामुळे खार येथील मंडईचे काम सुरू होऊ शकलेले नाही. तसेच मंडईत असलेल्या दुकानदारांचे तात्पुरते पुनर्वसन कोठे करणार याबाबतही निर्णय होऊ शकलेला नाही. या साऱ्या दिरंगाईमुळे मंडईचे काम रखडले आहे. इमारत एका बाजूने कलत चालली असून येथील दुकानदार आणि इमारतीत राहत असलेली पालिको कर्मचाऱ्यांची कुटुंबे जीव धोक्यात घालून तेथे राहत आहेत.