Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

आज शिवाजी राजा झाला..
येत्या गुरुवारी तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती.. जाणता राजा असे ज्यांचे वर्णन केले जाते त्या या वीरपुरुषाने सर्व महाराष्ट्राला एका महान जाणीवीने एकत्र बांधले आणि हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणून उतरविले. महाराजांच्या १६८० या मृत्यूच्या वर्षांबद्दल मात्र इतिहासकारांमध्ये कोणताही प्रवाद नाही. त्यांचा जन्म १६३० चा असे जरी मानले तर मृत्यूसमयी त्यांचे वय केवळ ५० वर्षे होते. एवढय़ा छोटय़ा आयुष्यामध्ये इतके अफाट कर्तृत्व गाजविणारा माणूस युरोप-अमेरिकेमध्ये सुध्दा नाही. पुन्हा या

 

नरश्रेष्ठ पुरुषाची जन्मरास कन्या असावी हा एक वेगळाच योगायोग..मराठीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकतृत्वाचे गुणगान करणारी गाणी काही कमी नाहीत. एचएमव्ही-सारेगामा या कंपनीने त्यांच्यावरील १६ गाणी एकत्र गुंफून राजा शिवछत्रपती नावाची सीडी बाजारात आणली आहे. शिवजन्माचा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी ती उपयुक्त आहेच, पण शिवाजी महाराजांवरील सर्व उत्तम गाणी संकलित झाली असल्याने त्याला एक संग्रह मूल्यही आहे. जय जय महाराष्ट्र माझा हा शाहीर साबळे यांनी गायलेला व शाहीर पिलाजीराव सरनाईक यांनी गायलेले त्यांच्यावरील तीन पोवाडे रसिक कधीही विसरू शकत नाही. महाराष्ट्राने हे सर्व पोवाडे आजपर्यंत डोक्यावर घेतले आहेत. संगीतकार श्रीनिवास खळे यांचा खरा पिंड भावगीतांच्या निर्मितीचा..पण गर्जा महाराष्ट्र माझा सारखा राजा बढे यांनी लिहिलेला पोवाडा शाहीर साबळे यांच्या आवाजात त्यांनी अमर करून ठेवला आहे. स्वराज्याचे तोरण , शिवजन्म आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील रोमहर्षक प्रसंगांवर अशा पिलाजीरावांच्या खडय़ा आवाजातील तीन पोवाडय़ांनी या सीडीची सुरुवात होते. त्यानंतर पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजातील शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, लतादीदींच्या आवाजात हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा आणि कवी कुसुमाग्रजांचे वेडात मराठे वीर दौडले सात अशी गाणी येतात. संगीतकार सी. रामचंद्र यांनी हिंदीच्या तुलनेत मराठीत तसे कमी काम केले आहे. छत्रपती शिवाजी हा त्यांनी सुरुवातीच्या काळात संगीत दिलेला एक चित्रपट. त्यातील वाजत डंका आणि आज शिवाजी राजा झाला ही दोन गाणी निवडण्यात आली आहेत. आज शिवाजी राजा झाला या गाण्यात तर पडद्यावर चक्क लता मंगेशकर यांचेच दर्शन घडते. त्यानंतर अमर भुपाळी चित्रपटातील फडकतो भगवा झेंडा, कृष्णा शिंदे यांच्या आवाजात चमके शिवबाची तलवार आणि संगीतकार दशरथ पुजारी यांच्या आवाजात अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, पावन खिंडीत पावन झालो आणि रायगडावर माय हिरकणी अशी गाणी येतात. कल्याणच्या सुभेदाराची सून परत सन्मानाने पाठविणे हा प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यात कधीच घडला नाही असे इतिहासकार ठासून सांगतात. पण त्या प्रसंगावरील कवी मधुकर जोशी यांचे दशरथ पुजारी यांनी गायिलेले अशीच आमुची आई असती मात्र उभ्या महाराष्ट्राने स्वीकारले. पुजारी जेव्हा मधुकर जोशी यांच्या घरी गेले तेव्हा या गीताचा कागद त्यांना घरात शिरल्या शिरल्या पायाशी मिळाला. कारण जोशींच्या मुलाने त्यांनी लिहिलेले गाण्यांचे सुटे कागद उधळले होते. हा जर कागद माझ्या हातात लागला नसता तर कदाचित हे गाणेच जन्माला आले नसते, असा किस्सा पुजारी या निमित्ताने सांगायचे. शेवटी मराठी पाऊल पडते पुढे या गाण्याने या सीडीची सांगता होते.
सुरवरदा रामा
प्रतिभावंत गायक-संगीतकार सुधीर फडके यांचे तेवढेच प्रतिभावंत चिरंजीव श्रीधर फडके यांची संत रामदासांच्या अभंगावरील ही सीडी त्यांची खास नवी निर्मिती आहे. एकूण १३ अभंग श्रीधर यांनी रचले असून आरती अंकलीकर टिकेकर, अमृता सुभाष, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, संजीव चिमलगी यांच्याकडून ते गाऊन घेतले आहेत. सर्व उत्तम वाद्यांवरील नजाकतभऱ्या सुरावटी आणि रामदासांच्या प्रत्येक अभंगाला न्याय मिळेल या पध्दतीने केलेल्या रचना यातून श्रीधरपंतांनी आपली कमाल दाखविली आहे. उत्तम सूरांबरोबरच तालाचे गहिरे रंग या अभंगांमधून रसिकांना अनुभवायला मिळतात. आरती अंकलीकर टिकेकर, संजीव चिमलगी, सुरेश वाडकर आणि अमृता सुभाष यांच्या आवाजीतील अभंग खासच म्हणावे लागतील. ‘किती एक आले गेले, किती एक मरून गेले’ ही संत रामदासांचा दासबोधामधील एक गाजलेला अभंग. ‘माय रघुवीर बाप रघुवीर’मधून सर्व चराचरामध्ये तो रामराया कसा व्यापून राहिला आहे आणि त्याच्या भक्तीतून भक्तांमध्येही कसा एकजिनसीपणा नांदायला लागतो याचे सुरेख वर्णन आहे. रंगीत मानस संगीत मानसमधील वेधला हो मनू खास उतरला आहेच, पण ‘धरे धीर राहे स्थिर अरे तू मना’ या पदातून रामरायाला आठवत राहशील तरच हे साधू शकते असे सामान्य जनांना त्यात संदेश देण्यात आले आहे.
बासरी, क्लॅरोनेट, सतार, सिंथेसायझरसह सर्व वाद्यांची सुरेख गुंफण श्रीधर फडके यांनी करीत प्रत्येक अभंग खुलविण्याचा प्रयत्न केला आहे. भोवती डोंगराचा फेर ही सवाई चाफळ क्षेत्राच्या महानतेवर आहे आणि ती मोहनबुवा रामदासी यांनी गायिली आहे. ‘तनु मन धन जन भूवन पाळा’मध्ये ‘नित्य निरंतर अंतर माझे पळपळ विकळ जातो दयाळा’ यातून एक उच्च आध्यात्मिक अनुभुतीचे दर्शन आहे. यातील बुलबुल तरंगचे सूर खास उमटले आहेत. ही श्रीधर फडके यांची नवी निर्मिती रामदासांच्या भक्तांनी खास ऐकण्याजोगी आहे. बुधवारच्या दासनवमीनिमित्त या सीडीचे पुन्हा आगळे महत्त्व आहे.