Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘आयुर्वेद- निरोगी जीवनाचे तत्त्वज्ञान’
प्रतिनिधी

मानवी आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे आयुर्वेद. त्यांचा दैनंदिन आयुष्यात उपयोग केल्यास माणूस निरोगी

 

आयुष्य जगू शकतो त्यासाठी आयुर्वेदात किती उपयुक्त गोष्टी सांगितल्या आहेत याबद्दल ‘आयुर्वेद अँड यू’ या झंडु आणि लोकसत्ता आयोजित कार्यक्रमात तज्ज्ञांनी माहिती दिली. दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक डॉ. रविन थत्ते यांनी केले आयुर्वेद हे आरोग्य विज्ञानाच्या तत्त्वज्ञानातून उगम पावले असून ते मनुष्याची प्रकृती आणि त्यातून निर्माण होणारी विकृती याविषयी भाष्य करतो, असं मत डॉ. रविन थत्ते यांनी व्यक्त केलं. आरोग्य कुंडली म्हणजे काय तसेच आहार, विहार, औषधी, पंचकर्म, रसायन या आयुर्वेदातील पद्धतींनी आरोग्य कसं टिकवता येईल याबाबत डॉ. मधुरा कुलकर्णी व डॉ. उदय कुलकर्णी यांनी स्लाइड शोच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. दैनंदिन आयुष्यात आयुर्वेदात सांगितलेल्या लहान-सहान गोष्टी पाळल्या तर त्याचा दीर्घकालीन फायदा कसा होतो याबाबत तज्ज्ञांनी काही उदाहरणे दिली.
आयुर्वेदातही तंत्रज्ञान असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे पंचकर्म पद्धतीचे ४५ उपाय आयुर्वेदात सांगितलेले आहेत. अनारोग्य टाळण्यासाठी आयुर्वेद प्रतिबंधात्मक ठरू शकतो असेही तज्ज्ञांनी सांगितले. आयुर्वेदाबाबतच्या अनेक गैरसमजांचे निरसन यावेळी केले गेले. आयुर्वेदिक औषधांनाही एक्स्पायरी डेट असते. त्याशिवाय त्वरित उपचार देणारी अनेक औषधे व उपचारपद्धती आयुर्वेदात सांगितली आहेत ही माहितीही त्यावेळी दिली. स्त्री रोग, बालकांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदात सखोल विवेचन केले आहे. औषध ही रुचकर, पाचक असावीत याबाबतही आयुर्वेदात विचार केलेला आढळतो असेही तज्ज्ञांनी सांगितले. यावेळी झालेल्या छोटेखानी परिसंवादात ज्येष्ठ प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ व मिश्र वैद्यकशास्त्राचे अभ्यासक डॉ. वि. ल. इनामदार, डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना मार्गदर्शन केले. काय करावे यापेक्षा काय करू नये हे कळणे महत्त्वाचे असे मत डॉ. वि. ल. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. यावेळी ‘झंडु’चे मार्केटिंग महाव्यवस्थापक प्रदीप पाटील म्हणाले की, पाच वर्षांच्या आयुर्वेद या उपचारपद्धतींचा योग्य प्रकारे प्रसार करण्याचा झंडुचा प्रयत्न आहे. लोकसत्ताचे वृत्तसंपादक दत्ता पंचवाघ यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी खुमासदार रितीने सूत्रसंचालन केले. तसेच उपस्थितांना ऋतुनुसार आहार दिनदर्शिका देण्यात आली.
‘आयुर्वेद अ‍ॅण्ड यू’ मालिकेतील पुढील कार्यक्रम रविवार २२ फेब्रुवारी रोजी यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा येथे रात्री ८ वाजता होणार आहे. यात ‘सर्वासाठी आयुर्वेद आहारशास्त्र’ याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. या मालिकेच्या निमित्ताने लोकांमध्ये आयुर्वेदाविषयी असलेली जिज्ञासा व कुतूहल अधोरेखित झाली आहे.