Leading International Marathi News Daily

मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

खेळ कोणताही असो, एकवेळ प्रेक्षक नसले तर चालेल पण चीअर गर्ल्स हव्या, असा सध्याचा ट्रेन्ड आहे. वाळकेश्वरमधील बाणगंगा भागातही रंगलेल्या कॅरमच्या डावातही खेळाडूंना प्रोत्साहनही दिले जात होते. फरक एवढाच की, नाचणाऱ्या चीअर गर्ल्सऐवजी बदकांचा थवा ‘क्व्ॉक क्व्ॉक’ करत खेळाडूंना ‘चीअर अप’ करत होता.

इकडे तिकडे चोहीकडे, ‘पेव्हर ब्लॉक’ सगळीकडे
शशिकांत कोठेकर

पदपथावर तसेच मुख्य रस्त्याच्या कडेला तसेच गाडय़ा पार्क करायच्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवणे योग्य असताना मुंबई, ठाण्यात सर्रास सर्व रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसवले जातात. याबरोबर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी देखील पेव्हर ब्लॉकचा मोठय़ा प्रमाणात वापर होऊ लागला आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉक वापरण्याची पद्धत पहिल्यांदा ठाणे शहरात सुरू झाली. मुंबईतही त्याचेच अनुकरण करण्यात आले.


चित्रपट चालती महोत्सवांची वाट..

सुनील डिंगणकर

वेगळ्या विषयावरील किंवा गंभीर विषय मांडणारे चित्रपट गेल्या वर्षी पूर्ण झाले असूनही ते व्यावसायिकदृष्टय़ा प्रदर्शित करण्यात आलेले नाहीत. यापैकी बहुतेक चित्रपट आधी महोत्सवांमध्ये दाखविले जाऊन मग ते सामान्य मराठी प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्याचा ट्रेन्ड सध्या दिसून येत आहे. ‘मेड इन चायना’, ‘जोगवा’, ‘तांदळा’, ‘महासत्ता’, ‘बाई माणूस’, ‘मानसन्मान’, ‘मनातल्या मनात’ आदी वेगळ्या धाटणीचे चित्रपट महोत्सवाची वारी करून आल्यानंतरच व्यावसायिकदृष्टय़ा प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

खार मंडईचा झाला ‘पिसांचा झुकता’ मनोरा!
प्रतिनिधी

इटली येथील पिसाचा झुकता मनोरा जगप्रसिध्द आहे तो संपूर्ण मनोरा एका बाजूला कलत जावूनही तो अद्यापि कोसळला नाही म्हणून. मनोऱ्याची ही इमारत एका बाजूने कलत चालली आहे आणि ते पाहायला देशविदेशातून पर्यटक येतात. मुंबईत देखील खार येथील पालिका मंडईच्या इमारतीची अवस्था पिसाच्या अशा झुकत्या मनोऱ्याप्रमाणे झाली आहे.

आज शिवाजी राजा झाला..
येत्या गुरुवारी तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती.. जाणता राजा असे ज्यांचे वर्णन केले जाते त्या या वीरपुरुषाने सर्व महाराष्ट्राला एका महान जाणीवीने एकत्र बांधले आणि हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणून उतरविले. महाराजांच्या १६८० या मृत्यूच्या वर्षांबद्दल मात्र इतिहासकारांमध्ये कोणताही प्रवाद नाही. त्यांचा जन्म १६३० चा असे जरी मानले तर मृत्यूसमयी त्यांचे वय केवळ ५० वर्षे होते. एवढय़ा छोटय़ा आयुष्यामध्ये इतके अफाट कर्तृत्व गाजविणारा माणूस युरोप-अमेरिकेमध्ये सुध्दा नाही.पुन्हा या नरश्रेष्ठ पुरुषाची जन्मरास कन्या असावी हा एक वेगळाच योगायोग..मराठीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकतृत्वाचे गुणगान करणारी गाणी काही कमी नाहीत. एचएमव्ही-सारेगामा या कंपनीने त्यांच्यावरील १६ गाणी एकत्र गुंफून राजा शिवछत्रपती नावाची सीडी बाजारात आणली आहे.

मॉल संस्कृतीतील चाळींचे दर्शन
वरळी, मुंबई येथील ललित कला भवन, सूरप्रवाह ही संस्था १९७४ पासून हौशी, कामगार रंगभूमीवर सातत्याने कार्यरत आहे. या संस्थेने आतापर्यंत ३५ नाटके विविध नाटय़स्पर्धामध्ये सादर केली आहेत. त्यामधील काही नाटकांना महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धेत व कामगार नाटय़स्पर्धेत पारितोषिकेही मिळाली आहेत. शहरांमध्ये चाळसंस्कृती संपून मॉल संस्कृती आली, तरीही अजून काही अशा चाळी आहेत की जिथली माणसे अजूनही तीच आहेत. अजूनही अशी घरे आहेत की जिथे चैनीच्या वस्तू नाहीत. त्या लोकांना फक्त जगणे एवढेच माहीत आहे. असेच एक घर असते. पूर्वी एकमेकांशी मिळून मिसळून वागणारे, सर्वाचे सुख-दु:ख समजून घेणारे हे घर. एकमेकांशी प्रेमाने बोलणारे हे घर, पण ते आज एकमेकांना परके झाले आहे. या घरातील माणसे आता क्वचितच एकमेकांशी बोलतात.

‘आयुर्वेद- निरोगी जीवनाचे तत्त्वज्ञान’
प्रतिनिधी

मानवी आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे आयुर्वेद. त्यांचा दैनंदिन आयुष्यात उपयोग केल्यास माणूस निरोगी आयुष्य जगू शकतो त्यासाठी आयुर्वेदात किती उपयुक्त गोष्टी सांगितल्या आहेत याबद्दल ‘आयुर्वेद अँड यू’ या झंडु आणि लोकसत्ता आयोजित कार्यक्रमात तज्ज्ञांनी माहिती दिली. दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक डॉ. रविन थत्ते यांनी केले.

पुणे-मुंबई-अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेनची शक्यता चाचपणार!
प्रतिनिधी

पुणे-मुंबई-अहमदाबाद मार्गावर ताशी ३५० किमी वेगाने धावणारी बुलेट ट्रेन चालविणे कितपत शक्य आहे, याबाबतची चाचपणी करण्याचे कंत्राट रेल्वेने ‘सिस्ट्रा’ या फ्रेंच कंपनीला देण्यात आले आहे. येत्या सहा महिन्यांत या कंपनीकडून अहवाल सादर केला जाणार आहे. ‘सिस्ट्रा’ने इंग्लंड, स्पेन, जर्मनी आणि चीन या देशांतील स्पर्धक कंपन्यांना मात देऊन हे १५ कोटी रुपयांचे कंत्राट मिळवले आहे. बुलेट ट्रेनच्या आर्थिक, तांत्रिक आणि संचनलविषयक बाबींबाबत ही कंपनी पूर्व अहवालात (प्री-फिजीबिलीटी)माहिती देणार आहे. याखेरीज बुलेट ट्रेनचा संभाव्य मार्ग, भाडे आणि प्रवासी संख्या यासारख्या गोष्टींचाही समावेश त्यात असेल. बुलेट ट्रेनसाठी रेल्वेने पुणे, लोणावळा, खंडाळा, कल्याण, मुंबई, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, गांधीनगर, अहमदाबाद असा संभाव्य मार्ग निश्चित केला आहे. सध्या ९३ किमी लांबीच्या मुंबई-पुणे प्रवासासाठी सुमारे साडेतीन तास आणि ४४० किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद प्रवासासाठी सात तासांचा अवधी लागतो. प्रचंड वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनमुळे मुंबई-पुणेदरम्यानचे अंतर अवघ्या २५ मिनिटांत कापता येईल आणि दोन तासांच्या आत मुंबईहून अहमदाबादला पोहोचणे शक्य होईल. पुणे-मुंबई-अहमदाबादखेरीज दिल्ली-पाटणा, दिल्ली-अमृतसर, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-एर्नाकुलम, हावडा-हल्दिया या मार्गावर बुलेट ट्रेन चालविण्याची घोषणा रेल्वेने केली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी याप्रकारच्या वेगवान ट्रेन चालविण्यास अनुकूलता दर्शविली आहे. पुणे-मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी एलिव्हेटेड मार्ग बांधण्याची योजना आहे. मात्र रेल्वेने एलिव्हेटेड मार्गाखेरीज भूमिगत मार्गाच्या उभारणीसाठी किती खर्च येईल, याचीही चाचपणी करण्यास ‘सिस्ट्रा’ला सांगितले आहे.

‘पेव्हर ब्लॉक’बाबत सामान्य नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी ‘मुंबई वृत्तान्त’ने केलेल्या आवाहना नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रियां आज प्रसिद्ध करीत आहेत. आपल्या प्रतिक्रिया नागरिक २२८२२१८७ किंवा २२८४६२७७ या फॅक्सवर किंवा या मेलवर पाठवू शकतात.

खर्च कोटींचा.मार्ग बोटीचा..
पालिका अधिकारी व कंत्राटदारांच्या फेव्हरसाठी पेव्हर ब्लॉक सगळीकडे बसवण्याचा नवीन उद्योग सुरू झाला आहे. रिफ्लेव्ही व सिगमेन्टिव्ह अशा दोन प्रकारचे पेव्हर ब्लॉक रस्त्यांवर तसेच पदपथावर बसवले जात आहेत. ६० एमएम जाडीचे रंगीत पेव्हर ब्लॉक पदपथावर आणि ८० एमएम जाडीचे मुख्य रस्त्यावर बसवले जातात. २००७ मध्ये वांद्रे ते दहिसर दरम्यान ५४ हजार २५० चौ.मी. परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले. लगेच २००८ मध्ये दोन लाख चौ.मी.चे ८० एमएम जाडीचे पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले. आजही अलियावर जंग महामार्गावर वाहन चालक एस्सेल वर्ल्डमध्ये असल्याचा आनंद लुटत आहेत. मुंबईतील रस्त्यांच्या खाली गटारे, महानगर गॅस, टेलिफोन, वीजेच्या केबल, जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या आहेत. प्रत्येक वेळी कोणत्यातरी कारणाने रस्ता खोदलेला दिसतो. हे खोदकाम सोपे व्हावे यासाठी पेव्हर ब्लॉकचे रस्ते करण्यात येतात. काम झाल्यावर कसेतरी पेव्हर ब्लॉक बसवून रस्ता नीट केला जातो. त्यामुळे मोठे वाहन त्यावरून गेल्यावर पेव्हर ब्लॉक उखडले जातात आणि रस्ता खराब होतो. खोदकामाच्या खर्चात आणि त्रासात कपात व्हावी म्हणून रातोरात रस्ते निर्माण करणारा पेव्हर ब्लॉकचा सोपा पर्याय पालिकेने निवडला आहे. यामुळे खर्च कोटींचा होत असला तरी, हा मार्ग मात्र बोटीचा बनून जातो.
अनिल बबन चासकर, कांदिवली (प)

मुख्य रस्ते पेव्हर ब्लॉकचे..आश्चर्यजनक बाब
मी गेली २० वर्षांपासून लोकसत्ताचा नियमित वाचक आहे. सध्या दुबई येथे कामाला असलो तरी, इंटरनेटवर लोकसत्ता नियमित वाचतो. नोव्हेंबर महिन्यात चेंबूरला मी माझ्या घरी आलो असता, तेथील मुख्य रस्ता, चौक पेव्हर ब्लॉकने बनविल्याचे पाहिले आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. दुबईमध्ये देखील पेव्हर ब्लॉक बसवले जातात मात्र मुख्य रस्त्यांवर, वाहतूक चौकात पेव्हर ब्लॉक कधीही बसवले जात नाहीत.
दुबईत या प्रकाराला इंटरलॉक पध्दती म्हणतात. वाहने पार्क करायच्या जागेत तसेच पदपथांवर पेव्हर ब्लॉक बसवले जातात. पेव्हर ब्लॉक बसवण्यापूर्वी तो समपातळीत करून विशिष्ट प्रकारची वाळू सुरूवातीला इंटरलॉकच्या खाली पसरवली जाते, नंतर इंटरलॉक बसवून झाले की, त्यावर वाळू पसरवून व्हायब्रेटींग मशीनद्वारे त्याची लेव्हल नीट केली जाते. मुंबईत मला अमरमहाल सारखा वाहतूकीचा मुख्य चौक एका रात्रीत पेव्हर ब्लॉकने केला गेला हे पाहून खरेच आश्चर्य वाटले.
प्रफुल्ल केदारे, दुबई.