Leading International Marathi News Daily

मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

लोकसभेसाठी जिल्ह्य़ात अजूनही खडाखडीच!
नगरला बाहेरचा उमेदवार लादणार नाही - कळमकर
प्रमुखांची मेळाव्यास अनुपस्थिती

नगर, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

नगर मतदारसंघ राष्ट्रवादी कोणाला सोडणार नाही. या मतदारसंघात बाहेरचा उमेदवार लादणार नाही. उमेदवारास पक्षाचे चिन्ह घेऊनच निवडणूक लढवावी लागेल, असे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी आज पक्षाच्या मेळाव्यात दिली. मेळाव्याकडे मात्र पक्षाच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.

भाजपची उमेदवारी मलाच - गांधी
नगर, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

लोकसभेच्या नगर मतदारसंघात भाजपकडून उमेदवारीची संधी आपणास मिळेल, त्यामुळे मतदारसंघातील प्रलंबित कामांना आपण पुन्हा गती देऊ, असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांनी केले. तालुक्यातील मांडवे येथे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत गांधी बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य रमेश पिंपळे होते. या वेळी सर्वश्री. रामदास भोर, पोपट निमसे, दत्तात्रेय हिरनवाळे, सुनील पंडित उपस्थित होते.गांधी यांनी सांगितले की, आपल्या खासदारकीच्या काळात नगर-दक्षिणमध्ये विकासकामांना वेग आला होता. या वेळेस पक्षाकडून उमेदवारीची पुन्हा संधी मिळेल. आगामी काळात नगर तालुक्यासाठी कुकडी व पिंपळगाव जोगा धरणांच्या पाण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. कर्जत तालुक्यातील पाटपाण्याच्या चाऱ्यांची कामे केंद्रातील वाजपेयी सरकारच्या माध्यमातून केली. त्याच पद्धतीने राज्य व केंद्राच्या माध्यमातून तालुक्याच्या शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सोडवू.विधानसभा मतदारसंघाचे विभाजन झाले असले, तरी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाबाबत जनतेने त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही गांधी यांनी केले.प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य भानुदास निकड्र यांनी केले. बैठकीस भाजप शाखाप्रमुख आसाराम निमसे, संजय निमसे, सुदाम निमसे, मच्छिंद्र सुपेकर, रामहारी बुधे, गणेश खांदवे, डॉ. हनुमंत निमसे उपस्थित होते. आभार गंगाधर पंडित यांनी मानले.

‘खोटे बोलणे जमत नाही; दिलेला शब्द पाळतो’
अश्वारूढ शिवपुतळ्याचे थोरात यांच्या हस्ते अनावरण
नगर, १६ फेब्रुवारी/वार्ताहर
उत्तरेचे प्रश्न सुटले आता दक्षिणेचे सोडवू, असे खोटे बोलणे आम्हाला जमत नाही. आम्ही शब्द दिला तर तो पाळतो, अशी टीका कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी खासदार बाळासाहेब विखे यांचे नाव न घेता केली. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ लाख रुपये खर्चाच्या पुतळ्याचे अनावरण, तसेच ३० लाख रुपये खर्चाच्या रस्ता क्रॉक्रिटीकरणाचा प्रारंभ आज थोरात यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले होते. या वेळी माजी महापौर संदीप कोतकर, जिल्हा बँकेचे संचालक संपतराव म्हस्के, जिल्हा उपनिबंधक दीपक शिंदे, सुरेश गवळी, अशोक झरेकर, दीपक सूळ, कृष्णा जाधव, प्रवीण घुले, ज्ञानदेव वाफारे, दादाभाऊ चितळकर, बाजार समितीचे सभापती भानुदास कोतकर, उपसभापती भाऊसाहेब काळे आदी उपस्थित होते.

‘लाचलुचपत’ची संगणकप्रणाली आजपासून कार्यान्वित
नगर, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईवर, तसेच विभाग करीत असलेल्या तपासाच्या प्रगतीवर नियंत्रण ठेवणारी संगणकप्रणाली उद्या (मंगळवार)पासून नगर कार्यालयात कार्यान्वित केली जात आहे. ही संगणकप्रणाली ऑनलाईन पद्धतीने विभागाच्या नाशिक येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाशी जोडण्यात आली आहे.

‘कायम विनाअनुदानाचे धोरण रद्द करण्याचा लवकरच निर्णय’
राजूर, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

आदिवासी भागातील मुला-मुलींना शिक्षणासाठी सरकार विविध योजना राबविते. आदिवासी भागात कायम विनाअनुदान धोरण यापुढे रद्द होणार असून, याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मधमाशांचा समाजवाद
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल वाई, पाचगणी व महाबळेश्वर ही ठिकाणे पाहण्यासाठी गेली होती. सहलीदरम्यान वाई येथील रेशीम उत्पादन केंद्र व महाबळेश्वर येथील मधुमक्षिका पालन केंद्र पाहण्याचे नियोजन केले होते. मधमाशी वसाहतीने व समाजवादी जीवनपद्धतीने जगत असल्याचे मी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यामुळे मधमाशीच्या पोळांमध्ये समाजवादी जीवनपद्धती कशा पद्धतीने विकसित झाली असावी, याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुतुहल निर्माण झाले असावे. सांप्रत काळी इराक-अमेरिका युद्धाचे चटके संपूर्ण जगाला अस्वस्थ करत होते.

आयुक्तांच्या हाती चाबूक हवा!
शहरातील वाहतूक, सार्वजनिक आरोग्य व एकूणच नागरी व्यवस्थेला कसली शिस्त नाही. कोणीही, कसेही वागा, काही होणार नाही! कारण कोणी वालीच नाही. महापालिकेचेही तसेच झाले आहे. कोणीही, कधीही या, कसेही वागा. काहीही होणार नाही. कारण या यंत्रणेला कोणी वालीच नाही! याला कारण ही यंत्रणाच आहे. त्यांचा कोणाला धाक, वचक व भीतीही नाही. राहणार तरी कशी? कसलाही प्रश्न निर्माण झाला की, प्रशासनप्रमुख तातडीने सरकारला मार्गदर्शन मागतात.

उपनगरांना पाणीटंचाईची झळ
लोंढे यांचा उपोषणाचा इशारा
नगर, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी
उन्हाळ्याच्या तीव्रतेबरोबरच शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटत चालला असून, प्रामुख्याने उपनगरांमधील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ढवणवस्ती येथील नागरिकांच्या आंदोलनानंतर आता केडगावमधील नगरसेवक शिवाजी लोंढे यांनी नागरिकांसमवेत मनपा कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

न्यायालयाच्या आवारात चोरी करणाऱ्या तिघांना अटक
संगमनेर, १६ फेब्रुवारी/वार्ताहर
येथील न्यायालय आवारातील मुद्देमालाची खोली फोडून चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. चोरीची कबुली देतानाच चोरून नेलेला माल आणि इतरत्र चोरी केलेल्या गॅसटाक्या त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केल्या. तुषार परदेशी (देवीगल्ली), जावेद सय्यद (संगमनेर खुर्द) आणि मनोज खजुरे (संजयनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विविध घटनांत जप्त केलेला मुद्देमाल कोठडीत ठेवण्यात येतो. तीन दिवसांपूर्वी रात्री मुद्देमालाच्या खोलीचा कडी-कोयंडा उचकटून वरील तिघांनी एक विद्युतपंप आणि तीन गॅसच्या टाक्या चोरून नेल्या होत्या. पोलीस ठाण्याशेजारी आणि न्यायालयाच्या आवारात चोरी झाल्याने पोलिसांनी गांभीर्याने तपास करत परदेशी यास काल संशयावरून ताब्यात घेतले होते. अगोदर हो-ना करणाऱ्या परदेशी याला पोलिसी खाक्या दाखवताच चोरीची कबुली देत आपल्या साथीदारांची नावे सांगितली. त्याआधारे पोलिसांनी उर्वरित दोघा आरोपींना आज पकडले. त्यांच्याकडून चोरलेला कृषिपंप, तीन गॅसटाक्यांखेरीज इतरत्र चोरलेल्या अधिक दोन गॅसटाक्या पोलिसांच्या हाती लागल्या. आरोपींच्या अटकेसाठी पोलीस कर्मचारी संजय धीवर, अशोक गायकवाड आदींनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

महसूल कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा
नगर, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

कोतवालापासून ते अतिरिक्त जिल्हाधिकारीपर्यंत सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी आज सामूहिक रजेवर असल्याने जिल्हाधिकारी, तसेच तहसील कार्यालयांमधील सर्व कामकाज आज ठप्प होते.सहाव्या वेतन आयोगात महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचा दावा करून महसूल अधिकारी महासंघाने राज्यस्तरीय आंदोलन सुरू केले असून, आजची सामूहिक रजा हा त्याचाच भाग होता.सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या १ दिवसाच्या रजेचे अर्ज शुक्रवारीच (दि. १३) जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. सर्वच रजेवर असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात आज फक्त जिल्हाधिकारी डॉ. अन्बलगन यांचीच काय ती एकमेव उपस्थिती होती.सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. त्यात वेतनश्रेणीबाबत आयोगाने केलेल्या अन्यायाचा निषेध करण्यात आला. सामूहिक रजा १ दिवसाचीच होती. उद्या (दि. १७) सर्व अधिकारी, कर्मचारी कार्यालयात असतील व कामही करतील. मात्र, १८ फेब्रुवारीला मुंबईत संघटनेबरोबर होणारी सरकारची बोलणी अयशस्वी झाल्यास २० फेब्रुवारीपासून सर्व अधिकारी व कर्मचारी बेमुदत संप सुरू करणार आहेत, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी संशोधनावर भर द्यावा - राव
नगर, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून संशोधनावर भर द्यावा, असे आवाहन इंडियन सीमलेस मेटल टय़ूब्स लिमिटेडचे संशोधन विभागप्रमुख डॉ. टी. एच. राव यांनी केले.
चास (ता. नगर) येथील एस. जी. रायसोनी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील शोधनिबंध वाचन स्पर्धेचे उद्घाटन डॉ. राव यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.‘इंटरडिसिप्लनरी अभियांत्रिकी शाखेतील संशोधन व संधी’ या विषयावर ही स्पर्धा होती. व्हीआरडीईचे सहायक निदेशक एम. डब्ल्यू. त्रिकांडे, अजित ताटिया, प्राचार्य डॉ. बी. के. मुखर्जी आदी या वेळी प्रमुख उपस्थित होते.त्रिकांडे यांनी भाषणात ‘ऑटोमोबाईल्स व वाहन उद्योगातील अभियांत्रिकी शाखांचे महत्त्व व उपलब्ध संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. संगणक व इलेक्ट्रॉनिक्सचा वापर करून ऑटोमोबाईल्स क्षेत्रात र्सवकष प्रगती करणे शक्य आहे, असे त्रिकांडे यांनी सांगितले. प्रा. आर. एस. देशपांडे यांनी प्रास्ताविक, तर प्रा. श्रीमती एस. एम. वाळके यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेच्या स्मरणिकेचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पोलीस व आरोपींवर कारवाईसाठी राठोड कुटुंबीयांचे उपोषण सुरू
नगर, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील शेकूचा तांडा येथील पंचशीला नारायण राठोड हिच्या मृत्यूप्रकरणी उशिरा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांविरुद्ध, तसेच मृत्यूस कारणीभूत आरोपीविरुद्ध कारवाई व्हावी, या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मृत मुलीच्या कुटुंबीयांनी उपोषण सुरू केले आहे.पंचशीला राठोड हिचा मृत्यू विजेचा धक्का बसून झाला होता. आरोपी रामनाथ देवीसिंग राठोड याने शेतीच्या कुंपणात वीजप्रवाह सोडला होता. पोलिसांनी या प्रकरणी उशिरा गुन्हा दाखल केला. पोलीस व आरोपीवर कारवाई झाली नाही, असे उपोषणास बसणाऱ्या राठोड कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्याचा अहवाल पोलीस महासंचालकांना पाठविला आहे. तो आल्यावर कारवाई होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. राठोड यांचे कुटुंबीय उपोषणास बसले आहे.

दलित महासंघाचा नगरमध्ये मोर्चा
नगर, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांना देण्यात आले. महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील उमाप यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. काशिनाथ पाटील सुलाखे, नामदेव चांदणे, सुधाकर शेरकर, वामन पगारे, पोपटराव साठे आदी पदाधिकाऱ्यांसह विविध कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.दलित, मागासवर्गीयांचे सर्व महामंडळांचे कर्ज माफ करावे, शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे करावे, दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करावी आदी मागण्यांचे निवेदन डॉ. अन्बलगन यांना देण्यात आले.

शिवजयंतीमुळे दि. १९ला जिल्ह्य़ातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश
नगर, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी
शिवजयंती उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी दि. १९ला जिल्ह्य़ातील सर्व देशी-विदेशी मद्यविक्री व ताडीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

‘निवडणुकीत उतरलेल्या गुन्हेगारांना हद्दपार करावे’
निघोज, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

लोकशाहीची क्रूर चेष्टा थांबविण्यासाठी निवडणुकीत उतरलेल्या गुन्हेगारांना हद्दपार करावे. असे मत हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. संजीवनी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन, तसेच गुणवंताच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव शेळके अध्यक्षस्थानी होते. संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय शेळके, महाविद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब मगर, ‘पारनेर’चे माजी संचालक शिवाजीराव कारखिले, मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक श्रीशांत पवार, अशोक ढवळे या वेळी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले की, आपल्या देशामध्ये गुन्हेगारांना संसदेत तसेच विधानसभेत बसण्याची संधी मिळते, ही लोकशाहीची क्रूर चेष्टा असून कायद्याची शोकांतिका म्हटली पाहिजे. गुन्हेगारीला प्राधान्य देण्याचे काम निवडणुकीच्या माध्यमातून होते. म्हणूनच संसदेत आपले लोकप्रतिनिधी गुन्हेगारी प्रवृत्तींना वंदन करतात. यासाठी तरुण पिढीने लोकशाहीची क्रूर चेष्टा थांबविण्यासाठी निवडणुकीत उतरलेल्या गुन्हेगारांना हद्दपार करावे. प्रास्ताविक संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय शेळके यांनी केले.

सहाव्या वेतन आयोगाच्या फरकासाठी तीन तास धरणे
पारनेर, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा फरक दोन टप्प्यांत द्यावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर तीन तास धरणे आंदोलन करण्यात आले.असोसिएशनचे अध्यक्ष महादू कुसकर, उपाध्यक्ष बा. बो. गाडिलकर, ना. पा. मुळे, सरचिटणीस संभाजी शेरकर, गणपतराव देशमुख, या. ग. बांडे, पां. रा. भारती, मा. भा. खामकर, पो. ना. चेमटे, क. रा. चौधरी, भि. का. शेटे, कमल आढाव उपस्थित होते.तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन सुरू असल्यामुळे पोलीस निरीक्षक राजेंद्र ससाणे यांनी निवेदन स्वीकारले. सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्याच्या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा, मागील २८ महिन्यांचा फरक त्वरित अदा करावा, चौथ्या व पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हयातीत सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी, अशी मागणी असल्याचे उपाध्यक्ष मुळे यांनी सांगितले.

पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामास मान्यता
राहाता, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

तालुक्यातील केलवड येथे ४५ लाख रुपये खर्चाच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामास जिल्हा परिषदेने प्रशासकीय मान्यता दिली आहे. आमदार विखे आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या प्रयत्नातून हे काम होणार आहे.पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मुख्य इमारतीबरोबरच अन्य बांधकामाचा खर्च ४५ लाखांचा आहे. पंचायत समिती सदस्य शकुंतला गमे, सुभाष गमे, पी. डी. गमे, तबाजी घोरपडे, नामदेव घोरपडे, किशोर वाघमारे, अलका बनसोडे, वैजयंती जेजूरकर यांनी या कामाचा पाठपुरावा केला.

भारत स्काऊट व गाईडचे आज
कोपरगावला पुरस्कार वितरण
नगर, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

भारत स्काऊटस् व गाईडस्च्या वतीने स्काऊटर, गाईडर पुरस्काराचे वितरण उद्या (मंगळवारी) कोपरगाव येथे होत आहे. अध्यक्षस्थानी आमदार अशोक काळे असतील.या वेळी पुरस्कार वितरण, तसेच विविध गुणदर्शनाचाही कार्यक्रम होणार आहे. सकाळी ९ वाजता होणाऱ्या कार्यक्रमास आमदार अशोक काळे व साईबाबा संस्थानचे विश्वस्त अशोक खांबेकर उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सत्रात बिपीन कोल्हे व आमदार दिलीप सोनवणे, स्काऊट गाईडचे मुख्य आयुक्त भा. ई. नगराळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, उपाध्यक्ष सुजित झावरे उपस्थित राहणार आहेत.गुणवंत स्काऊटर म्हणून रवींद्र खाटेकर यांना, तर गाईडर म्हणून संगीता रासकर व ज्योती देवरे यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. जिल्हा संघटनाच्या कार्याबद्दल अप्पासाहेब शिंदे यांचाही या वेळी विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे भारत स्काऊट-गाईडचे जिल्हा सचिव शरद दळवी यांनी सांगितले.