Leading International Marathi News Daily

मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

नवनीत

जी व न द र्श न
विवेकाची वात

 

ख्रिस्ताचा शिष्य संत पॉल म्हणतो, ‘‘धर्मशास्त्रातील नियम आपल्या अंत:करणात लिहिलेले आहेत. आपली विवेकबुद्धी त्याला साक्ष आहे. (नवा करार, रोमकरांस पत्र २:१५) बरे काय आणि वाईट काय या संबंधीचे नियम आपल्या मनाच्या शिळेवर कोरलेले आहेत. सूर्यफूल सूर्याकडे वळते, तसे आपले मन नैसर्गिकपणे सत्य, सुंदर आणि मंगल यांच्याकडे झेप घेत असते. त्यांचा आपण नेहमी वेध घ्यावा म्हणून संत पॉल सुचवितो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय आहे त्यांचे मनन करा. (फिलिप्पीकरांस पत्र ४:८) ज्यांचे आपण चिंतन करतो. तेच आपल्या कृतीत उतरत असते. आपल्या जन्माबरोबरच देवाने आपल्या अंत:करणाच्या वेदीवर विवेकाची वात लावली आहे. त्या वातीला जपावे आणि जोपासावे लागते कारण, माणूस चांगला आहे तसा स्वार्थी आणि अहंकारी आहे. त्याला सत्यापेक्षा सुख अधिक प्रिय असते. वासना त्याला खुणावीत असतात. पुण्याचा पेहेराव धारण करून पाप आपल्याला मोहित करीत असते. इव्हने बागेमध्ये फळ पाहिले. ते चवीला स्वादिष्ट, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे. (जुना करार, उत्पत्ती ३:६) असे तिला वाटले. बाह्य़ रंग, रुपाला ती भुलली आणि तिने लक्ष्मणरेषा ओलांडली. म्हणनच नीतीनियमांनी मना सज्जनाला भक्तीपंथाचे धडे द्यावे लागतात. स्त्री गर्भवती होते. बाळाला उदरात नवमास जोपासते आणि मग त्याला जन्म देते त्याचप्रमाणे संस्कारांच्या पाठशाळेत आपण नीती नियम शिकतो, मनाच्या गर्भाशयात ते अंकुरतात, त्यातूनच मूल्ये जन्माला येतात. मुलांना आणि मूल्यांना प्रसवावे लागते तेव्हाच ती आपली होत असतात. विवेकबुद्धी म्हणजे मनात वाजणारी घंटा आहे. जरासाही धोका जाणवला की ती इशारा देते, मग हृदयाची धडधड वाढते. तो सूक्ष्म नाद ऐकण्यासाठी आत्म्याचे कान टवकारावे लागतात. संत ऑगस्टीन सांगतात, ‘‘बांधवांनो, तुमच्या विवेकबुद्धीचा कौल घ्या, अंतर्मुख व्हा आणि जे काही तुम्ही करता ते देवाच्या साक्षीने करा.’’
फादर फ्रान्सिस दिब्रिटो

कु तू ह ल
धूमकेतूंच्या कक्षा

धूमकेतूंच्या कक्षांचे स्वरूप कसे असते? सर्वच धूमकेतू हॅलीच्या धूमकेतूप्रमाणे सूर्याला पुन:पुन्हा भेटायला येतात का?
सर्व धूमकेतू सूर्याभोवती दीर्घ वर्तुळाकार कक्षेत फिरतात. त्यांची कक्षा बंदिस्त अथवा खुली असू शकते. खुली कक्षा असलेले धूमकेतू सूर्याला फक्त एकदाच भेट देतात. त्यांच्या कक्षेच्या स्वरूपामुळे ते सूर्यमालेच्या बाहेर कायमचेच निघून जातात. बंदिस्त कक्षा असलेल्या धूमकेतूंची त्यांच्या आवर्तन कालानुसार दोन गटांत वर्गवारी करता येते. छोटा आवर्तन काल असलेले धूमकेतू ३ वर्षे ते २०० वर्षे इतक्या कालावधीत एक आवर्तन पूर्ण करतात, तर मोठा आवर्तन काल असलेल्या धूमकेतूंना एक आवर्तन पूर्ण करण्यासाठी काही शे ते लाखो वर्षे लागू शकतात.
हॅलीचा धूमकेतू हे छोटा आवर्तन काल असलेल्या धूमकेतूचे उत्तम उदाहरण आहे. हॅलीचा धूमकेतू सूर्याभोवतीचे एक आवर्तन ७६ वर्षांत पूर्ण करतो. त्याची कक्षा नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे पोहोचलेली आहे. छोटा आवर्तन काल असणारे धूमकेतू सर्वसाधारणपणे सूर्यमालेच्या प्रतलातच प्रवास करतात. मोठा आवर्तनकाल असणाऱ्या धूमकेतूंची कक्षा सूर्यमालेच्या प्रतलात असेलच असे नाही. काही लाख वर्षे आवर्तनकाल असणारे धूमकेतू त्यांच्या प्रवासकालात ग्रहमालेच्या कितीतरी दूर निघून जातात. तरीही ते गुरुत्वाकर्षणाने सूर्यालाच बांधलेले असतात. १९९५ साली दिसलेला हेल-बॉप (२४०० वर्षे आवर्तनकाल) आणि १९९६ साली दिसलेला हयाकूताके (१४००० वर्षे आवर्तनकाल) हे धूमकेतू मोठा आवर्तनकाल असलेल्या धूमकेतूंची उदाहरणे आहेत.
गुरूसारख्या मोठय़ा ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे, धूमकेतूंच्या कक्षा बदलतात आणि काही धूमकेतू सूर्यावर अथवा इतर ग्रहांवर आदळून नष्ट होतात.
योगेश सोमण
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
खगोलशास्त्रज्ञ आर्गलांडर

जर्मनी हा देश पूर्वी प्रशिया या नावाने ओळखला जात होता. प्रशियातील नेमेल या ठिकाणी २२ मार्च १७९९ रोजी आर्गलांडर फीड्रिक व्हिल्हेल्म आऊगुस्ट यांचा जन्म झाला. राज्यशास्त्र या विषयात त्यांना करीअर करायचे होते. पण योगायोगाने त्यांनी वेसेल या खगोलशास्त्रज्ञाचे व्याख्यान ऐकले. त्या व्याख्यानाच्या प्रभावाने त्यांनी त्यांचे सहाय्यक म्हणून काम करायचे ठरवले आणि खगोलशास्त्रात त्यांनी स्वतंत्र इतिहास रचला. बॉन येथील प्रशियन विद्यापीठात खगोलशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांनी ‘युरानोमेट्रिया नोव्हा’ हा खगोलशास्त्रीय नकाशा तयार केला. डोळ्यांनी दिसणाऱ्या ताऱ्यांच्या नावाची सूचीही तयार केली. संक्रमण मापकाचा उपयोग करून त्यांनी २२ हजार ताऱ्यांची स्थाने निश्चित केली. अवकाशातील सूर्यकुलाच्या गतीचे अध्ययन करून ३,२४,१८८ लाख ताऱ्यांची यादी असलेला खगोलशास्त्रीय नकाशा त्यांनी तयार केला. उत्तर ध्रुव ते दक्षिण संक्रांतीच्या दरम्यानच्या आकाशातील ताऱ्यांची अचूक स्थानेही त्यांनी दर्शवली. एकंदरीत आधुनिक खगोलशास्त्राचा पायाच त्यांनी रचला त्यांनी खगोलशास्त्रात स्वतंत्र इतिहास घडवला तो चलताऱ्यांचा अभ्यास करून. ठराविक काळाने तेजस्वितेत बदल होणाऱ्या चलताऱ्यांचा अभ्यास ही पुढे खगोलशास्त्रातील एक स्वतंत्र शाखाच निर्माण झाली ती त्यांच्या संशोधनामुळेच. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक सन्मान मिळाले. सेंट पीटर्सबर्ग, लंडन, बर्लिन, पॅरिस, व्हिएन्ना येथील अकादमीचे सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आले. रॉयल सोसायटी (लंडन), नॅशनल अ‍ॅकेडमी (अमेरिका) यांचेही ते सभासद होते. वयाच्या ७६व्या वर्षी १८७५ रोजी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
हर्षवर्धनचं दु:ख

हर्षवर्धनला रोज सकाळी उठल्यावर गळून गेल्यासारखं वाटायचं. उठायला नकोच वाटायचं. आजचा दिवस का उजाडला? काय घडेल आज? काही वाईट घडणार नाही ना अशी सारखी धास्ती वाटायची. काही करू नये, कुठे जाऊ नये. कुणाशी बोलू नये. गप्प बसून राहावे म्हणून तो सगळ्यांना टाळायचा. कागदावर रेघोटय़ा मारत कुठेतरी बसून राहायचा. शाळेतही कुणात मिसळायचा नाही. जेव्हा पाहावं तेव्हा समोर पुस्तक धरून बसलेला किंवा खिडकीतून दूर कुठेतरी पाहात असलेला दिसायचा. घरी दारी कुठेच त्याचे मन लागत नव्हते. घराच्या पायऱ्यांवर उदास बसलेल्या हर्षवर्धनच्या पाठीवर कुणाचा तरी हात हळूवार फिरला. त्याने पाहिले तर बाबांकडे येणारे कोशेकाका त्याच्याशेजारी बसून मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवत होते. त्या प्रेमळ स्पर्शाने त्याला भरून आलं. कसंबसं रडू आवरून खाली पाहात तो गप्प बसून राहिला. कोशेकाकाही काही न बोलता त्याच्या शेजारी बसून राहिले. काहीसुद्धा विचारले नाही त्यांनी. थोडय़ावेळाने हर्षवर्धन जरा शांत झाला. त्याच्या लक्षात आले की आपल्याला पाठीवरून फिरणाऱ्या हातामुळे खूप बरं वाटतंय. कोशेकाकांशी मोकळेपणाने बोलावंसं वाटतंय. पण धीर होईना. असं कसं एकदम बोलायचं? संकोच वाटला त्याला. पण एकीकडे वाटलं बोलावं.. आपली भीती सांगून टाकावी. कोशेकाकांचा हात पाठीवरून फिरला तसा त्याला एकप्रकारे धीर आला होता. विश्वास वाटू लागला होता. कोशेकाकांच्या मनात येत होते, ‘हा पोरगा कसल्यातरी भावनिक वेदनेत आहे. बोलायला लाजतोय. तसा अबोलच आहे थोडासा. कसा बरे बोलता करावा याला?’ काही न सुचून ते त्याच्याशेजारी फक्त बसून राहिले. मधूनमधून त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिले. हळू आवाजात एक एक शब्द उच्चारत हर्षवर्धन म्हणाला, ‘‘हल्ली आईबाबांची खूप भांडणं होतात. कशावरूनही कधी खर्चावरून, कधी घरच्या मांजरावरून. आई म्हणते, बाबा घरी काही लक्ष देत नाहीत. खूप चिडचिड करते. बाबा म्हणतात, मला माझ्या व्यापात घरात पाहणं जमणार नाही.. काका, हल्ली ते एकमेकांशी भांडणाशिवाय साधं बोलतच नाहीत. मला फार भीती वाटते. आई.. वेडी होणार नाही ना? तीच म्हणत होती तसं. बाबा आम्हाला सोडून निघून जातील का? तसं म्हणत होते ते.. खूप रडू येतं मग मला.’’ कोशेकाका म्हणाले, ‘‘अरे वेडय़ा, नवराबायकोतली भांडणं असतात ही. पेल्यातल्या वादळासारखी. आपोआप शांत होतात. आई-बाबांना एकमेकांशिवाय करमणार नाही. दोघं कामाच्या ताणाखाली असतील. थोडय़ा दिवसात सगळं नीट होईल. अरे माझी आणि काकूची सुद्धा होतातच भांडणं. मी गेलो का कुठं रे?’’ हर्षवर्धनला कितीतरी हलकं वाटलं. मनातले विचार भीती दु:ख हळूहळू विरघळून गेली. बऱ्याच दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं.
तुम्हाला जेव्हा खूप दु:ख होतं तेव्हा मित्रांशी, वडिधाऱ्यांशी मोकळेपणाने बोला. मन हलकं होईल. आतल्या आत कुढत राहू नका. त्यामुळे दु:ख वाढेल.
आजचा संकल्प : दुसऱ्याजवळ मनातले दु:ख बोलायला मी संकोच करणार नाही.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com