Leading International Marathi News Daily

मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

नाशिक येथे माकप व किसान सभेतर्फे आयोजित मोर्चासाठी वाहनांच्या टपावर बसून आलेले कार्यकर्ते.


माकपच्या भव्य मोर्चामुळे वाहतुकीची कोंडी

प्रतिनिधी / नाशिक

वीज भारनियमन रद्द करावे व वनाधिकार कायद्याची काटेकोरपणे अमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र राज्य किसान सभा यांच्यातर्फे काढण्यात आलेल्या भव्य मोर्चामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णत कोलमडून पडली. मोर्चेकऱ्यांची संख्या मोठी असल्याने मध्यवर्ती भागातील रस्त्यांवरून मोर्चा नेण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नाही.

प्रस्तावित विद्यापीठासाठी नाशिककर आग्रही
*‘शिवसंघ’ आक्रमक *प्रसंगी आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी / नाशिक

पुणे विद्यापीठाच्या विभाजनाच्या हालचाली सुरू असून या प्रस्तावित विभाजन प्रक्रियेत नाशिकला डावलतानाच अहमदनगरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप करतानाच हे विद्यापीठ कवीवर्य कुसुमाग्रजांच्या नांवे नाशिकलाच स्थापन व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, इशारा शिवसंघ युवा सर्वागीण विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष निलेश गायकवाड यांनी दिला आहे.

वृक्षतोडीविरोधात नेचर क्लबचा मूक मोर्चा
प्रतिनिधी / नाशिक

‘हरित नाशिक, सुंदर नाशिक’ असे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या महापालिकेने रस्त्या रुंदीकरण मोहिमेत जुने वृक्ष तोडून काय मिळविले, विविध भागातील वृक्षतोडीला जबाबदार कोण, पर्यावरण विभाग का बंद अशा अनेक प्रष्टद्धr(२२४)षांकडे सोमवारी नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे काढण्यात आलेल्या मुकमोर्चाद्वारे लक्ष वेधण्यात आले. झाडांसाठी ५०० रूपये असणारी दंडाची रक्कम १० हजार रूपये करावी,

अजिंक्य दुधारे कनिष्ठ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी
नाशिक येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयातील व्दितीय वर्ष वाणिज्य शाखेचा विद्यार्थी अजिंक्य दुधारे मलेशियातील पेगॉन येथे आयोजित व्दितीय कनिष्ठ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीमध्ये सहभागी झाला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेला तो महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू आहे. हैदराबादमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यने वैयक्तिक व सांघिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावले होते. त्याआधारे ही निवड झाली. सिडनी येथे झालेल्या युथ ऑलिम्पिकमध्ये अजिंक्यने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. नुकत्याच कन्नुर येथे झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेतही त्याने सुवर्ण व दोन रौप्य पदक मिळविले. अजिंक्यला कैलास लवांड, अशोक दुधारे, राजू शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले.
प्रतिनिधी, नाशिक

अनवधानाने गोळी सुटून रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू
भुसावळ, १६ फेब्रुवारी / वार्ताहर

शहरातील रेल्वे सुरक्षा दलाच्या शस्त्रसाठा विभागातील कार्यालयात कार्यरत जवानाचा स्वतच्या रायफलमधून अनवधानाने गोळी सुटल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आर. पी. डी. रोडवरील क्वॉर्टर गार्ड या कार्यालयात आज सकाळी ही घटना घडली. मोहन रंगराव भोसले (२८) असे या जवानाचे नाव असून तो सांगली जिल्ह्य़ातील बत्तीसशिराळा तालुक्यातील मूळ रहिवासी आहे. सकाळी सहाला तो डय़ुटीवर हजर झाला. त्यानंतर अवघ्या १० ते १५ मिनिटात अचानक गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आल्याने कमांडर एस. सी. चौधरी यांनी बाहेर धाव घेतली. कार्यालयातील पायऱ्यांच्या बाजूला भोसले जखमी अवस्थेत पडले होते. या घटनेची माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्यांना भुसावळ रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच भोसले यांचा मृत्यू झाला. रेल्वे सुरक्षा दलाच्या या कार्यालयात संपूर्ण भुसावळ विभागातील सुरक्षा रक्षकांचा शस्त्रसाठा ठेवलेला असतो. या शस्त्रसाठय़ाच्या सुरक्षिततेच्या २४ तासांसाठी सहा शस्त्रधारी जवानांची डय़ुटी असते. मोहन भोसले यांचा हात अनवधानाने रायफलीच्या ट्रीगरला लागल्याने ही घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

‘काँक्लीअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया नाशिकमध्ये यशस्वी
नाशिक / प्रतिनिधी

ज्या कर्णबधिरांना श्रवणयंत्रानेही ऐकू येत नाही ते काँक्लीअर इम्प्लांटने ऐकू शकतात. नाशिकमध्ये नुकतीच या प्रकारची पहिली शस्त्रक्रिया डॉ. इंदोरवाला यांनी यशस्वी करून दाखविली. या प्रकारच्या प्रत्यारोपणाच्या दोन शस्त्रक्रिया नाशिक येथे करण्यात आल्या. जालना व नाशिक येथील तीन वर्षांच्या दोन मुलांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. जन्मत: कर्णबधीर असणारी मुले किंवा भाषापूर्व काळात बधीरत्व आलेली मुले आपल्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करतात. ऐकू न येणे या एका अपंगत्वामुळे ते भाषा संपादन करू शकत नाहीत व त्यामुळे बहिरेपणा व बोलता न येणे अशी दोन अपंगत्व त्यांच्यात येतात. तीव्र, अतीतीव्र श्रवणदोष असलेल्या व्यक्तींना चांगल्यात चांगले श्रवणयंत्रही उपयोगी ठरत नाही. अशा वेळेस ‘काँक्लीअर इम्प्लांट’ ही नवीन वैद्यकीय सुविधा उपयोगी ठरू शकते, १० महिने ते ७७ वर्ष वयाच्या व काही प्रौढांना सुद्धा कॉक्लीअर इम्प्लांटमुळे श्रवणाची उपलब्धी होऊन ते उत्तम संपर्क साधू शकतात असा दावा यावेळी करण्यात आला.

दिंडोरी लोकसभा मतदार संघात उमेदवारीचा जनता दलाचा निर्णय
नाशिक / प्रतिनिधी

पुरोगामी विचारांच्या पक्षांसोबत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्णय नाशिक जिल्हा जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. मोहन खामकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. दिंडोरी, पेठ, हरसूल, सुरगाणा, चांदवड, येवला, निफाड, इगतपुरी, येथील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. बैठकीस काही इच्छुक उमेदवार समर्थकांसह उपस्थित होते. त्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. उमेदवारीबाबत अंतीम निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते निहाल अहमद जाहीर करणार आहेत. १९७७ पासून पूर्वाश्रमीच्या मालेगाव लोकसभा मतदार संघात व आताच्या दिंडोरी लोकसभा मतदार संघात सातत्याने जनता दलाने मित्रपक्षाच्या सहकार्याने निवडणूक लढविली आहे. म्हणून सर्व डाव्या विचारांचे पक्ष व पुरोगामी विचारांच्या संघटना यांच्या सहकार्याने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी असे विचार नाशिक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी मांडले. पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष एकनाथ येवले, बाळासाहेब पालखेडे, सुरेश भवर, सुनिल तायडे, नारायण सोनवणे, एम. एल. पठाण, कचेश्वर दुसारे आदी यावेळी उपस्थित होते.

पंचवटीभूषण, पंचवटीगौरव पुरस्कारांचे वितरण
नाशिक / प्रतिनिधी

माजी पाटबंधारे मंत्री आ. गोंविदराव आदिक यांच्या प्रमुख उपस्थितीत अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांच्या वाढदिवसानिमित्त पंचवटी सेवाभावी संस्था, पंचवटी सार्वजनिक वाचनालय, पंचवटी नागरी सहकारी पतसंस्था, पंचवटी कला, क्रीडा मंडळ, पंचवटी महिला गृहउद्योग या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात पंचवटी भूषण व पंचवटी गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आज स्वातंत्र्य टिकविण्यासाठी तरूण पिढीसमोर एक आव्हान आहे. स्वातंत्र्य समृध्द करण्यासाठी युवा पिढीने प्रयत्न करुन गरिबांचे अश्रु पुसणे गरजेचे असल्याचे मत आदिक यांनी याप्रसंगी व्यक्त केले. आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी वाचनालयास ग्रंथ व फर्निचर खरेदीसाठी आमदार निधीतून एक लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. याप्रसंगी सदाशिव भोरे, नेताजी भाईर, डॉ. कुष्णराव वाईकर यांना पंचवटी भूषण तर हिरामण झिरवळ, कविता नेरकर, नंदकुमार पलंगे, क्रांतिवीर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, पंचवटी एज्युकेशन सोसायटी यांना पंचवटी गौरव पुरस्कार देण्यात आला. प्रास्ताविक डॉ. सुनील ढिकले तर सुत्रसंचालन हिरालाल परदेशी यांनी केले.

काँग्रेस नेहमीच अल्पसंख्यांकांच्या पाठीशी- आ. रोहिदास पाटील
धुळे / वार्ताहर

जिल्ह्य़ातील अल्पसंख्यांक व मागासवर्गीयांना विविध योजनांचा फायदा देत काँग्रेसने नेहमीच त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. रोहिदास पाटील यांनी केले. धुळे शहरासह जिल्ह्य़ातील मुस्लिमांसाठी हज यात्रेकरिता यात्रेकरुंचा कोटा वाढविण्यात आल्यानिमित्ताने मुस्लिम समाजातर्फे पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अल्पसंख्यांक विकास मंत्री अनिस अहमद, जवाहर सुतगिरणीचे अध्यक्ष सुभाष देवरे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ, नगरसेवक मुझफ्फर हुसैन आदी उपस्थित होते. काँग्रेसने नेहमीच अल्पसंख्याकांच्या प्रगतीसाठी विशेष योजना राबवून स्वयंरोजगाराची संधी देवून शहराचा चेहरामोहरा बदलविण्याचे काम केले आहे, असेही पाटील यांनी सांगितले. अनिस अहमद यांनी राज्यातील आघाडी सरकारने अल्पसंख्यांकाकरिता विविध विकासात्मक योजना राबविल्याचा उल्लेख केला. शासनाने मुस्लिमांच्या उच्च शिक्षणासाठी मदत केली. तसेच स्वयंरोजगारासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी दिली.

जनता विद्यालयात माता-पालक मेळावा
पिंपळगाव / वार्ताहर

शैक्षणिक प्रवाहात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मातांचा सहभाग अत्यंत मोलाचा असून ग्रामीण भागात माता-पालक संघाची स्थापना व प्रबोधन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मराठा विद्याप्रसारक समाजाचे संचालक विश्वास मोरे यांनी केले. येथील जनता विद्यालयात माता-पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे आरोग्य, आहार, वाचन, शरीर संपदा, निर्भिडता, चारित्र्यसंवर्धन, अभ्यासूवृत्ती, विद्यार्थ्यांच्या अंगी वाढविण्यासाठी पालक-शिक्षक विद्यार्थी यांच्यात सुसंवादाची गरज असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड रमेश जाधव यांनी याप्रसंगी केले.

‘इमोशनल बँक अकौंटींग’ वर व्याख्यान
पिंपळगाव बसवंत / वार्ताहर

येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत सिडको महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. जी. मामडे यांचे ैइमोशनल बँक अकाउंटींगै या विषयावर व्याख्यान झाले. मानव जीवनात भावनांना अनन्यसाधारण महत्व आहे. आपण ज्या प्रमाणे बँकेत पैसा शिल्लक ठेवतो त्याप्रमाणेच प्रत्येकाजवळ भावनांची शिल्लक असावी. जी व्यक्ती भावना जाणते, भावना ठेवते, तीच खऱ्या अर्थाने यशस्वी जीवन जगते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दूरदृष्टी ठेऊन योग्य नियोजनाव्दारे त्यांची अमलबजावणी करावी, असे आवाहन डॉ. मामडे यांनी केले.
जीवनात जगताना पंचसूत्रे लक्षात ठेवावी. त्यात दुसऱ्यांना नेहमी समजून घेणे, प्रत्येक घटकाकडे व्यवस्थित लक्ष देणे, दिलेला शब्द पाळणे, सर्वाच्या अपेक्षा जाणून घेणे व व्यक्तीगत समतेचा प्रवाह सतत राखणे या सुत्राचा वापर केल्यास जीवनात हमखास यशस्वी होता येते, असे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे, वाणिज्य विभागप्रमुख पी. आर. मोरे, प्रा. जे. के. साळी यांच्यासह विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एस. पाटील यांनी केले.