Leading International Marathi News Daily

मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

लोकसभा की राज्यसभा; सुरेश जैन यांच्यापुढे प्रश्न
वार्ताहर / जळगाव

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेशकर्ते झालेले सुरेश जैन हे निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले राजकीय अस्तित्व अबाधित राखण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणार असे वाटत असले तरी त्यांचा हा पक्ष बदल मागील दाराने राज्यसभेत जाण्यासाठी असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. जागा वाटपात जळगाव मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला येईल किंवा नाही, तसेच विरोधकांची वाढती डोकेदुखी लक्षात घेऊन जैन हे राज्यसभेचा मार्ग अनुसरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्य़ातील बडे राजकीय प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश जैन यांनी आजपर्यंत पराभव कधी पाहिलेला नाही. प्रत्येक वेळी त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन पक्ष बदलत जैन यांनी यश पदरात पाडून घेतले आहे. काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा विविध राजकीय पक्षांकडून निवडणुका लढवत तब्बल आठ वेळा त्यांनी विजय संपादन केला आहे. गतवेळी म्हणजे २००४ मधील विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत लढवल्यावर दोनच वर्षांत पक्षाशी त्यांचे संबंध बिघडले. भाजप व शिवसेनेशी जवळीक साधत जैन यांनी पक्षविरोधी कारवाया सुरू केल्या. जळगाव महापालिकेचा अपवाद वगळता जिल्हा बँक व जिल्ह्य़ातील बाजार समितीच्या निवडणुका त्यांनी युतीसोबत लढल्या.

धुळे सरकारी नोकर बँक निवडणुकीसाठी ७३ जण रिंगणात
वार्ताहर / धुळे

नंदुरबार जिल्हा सरकारी नोकर सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी पुढे सरसावलेल्या एकूण उमेदवारांपैकी १०५ जणांनी अखेर माघार घेतली. २२ जागांसाठी एक मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकीच्या रिंगणात आता ७३ जण आहेत. प्रगती, लोकहीताय आणि विकास हे तीन पॅनलही निवडणूक लढवित असून निवडणुकीच्या निमित्ताने बँक व्यवस्थापनातील त्रुटी, गैरव्यवहार चव्हाटय़ावर येवू लागले आहेत. जिल्हा उपनिबंधक एच. के. ठाकूर यांची या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. या बँकेचे धुळे, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर हे कार्यक्षेत्र आहे. या पाच जिल्ह्य़ात २३ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मतदारसंघ निहाय जागा आणि कंसात रिंगणातील उमेदवारांची संख्या अशी : सर्वसाधारण मतदार संघातील १५ जागांसाठी (४३), अनुसूचित जाती १ (७), अनुसूचित जमाती १ (५), भटक्या विमुक्त जाती १ (४), इतर मागासप्रवर्ग १ (३) आणि महिला राखीव मतदारसंघातील तीन जागांसाठी (११) उमेदवार रिंगणात आहेत. असे २२ जागांसाठी एकूण ७३ उमेदवारही निवडणूक लढवित आहेत. सर्वसाधारण गटाच्या एकूण १५ जागांसाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ात १२ आणि जळगाव, नगर, नाशिक जिल्ह्य़ात प्रत्येकी एक अशा जागांचा समावेश आहे. अनुसूचित जातीची एक, अनुसूचित जमाती, आर्थिक दुर्बल घटक, भटक्या विमुक्त जाती जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग प्रत्येकी एक तर महिलांसाठी तीन जागा राखीव आहेत. गटनेते चंद्रकांत देसले यांनी प्रगती पॅनलच्या केलेल्या घोषणेनुसार या पॅनलतर्फे विद्यमान संचालक मंडळातील दहा व एक स्वीकृत संचालकांची नावे उमेदवारांमध्ये समाविष्ट आहेत. विद्यमान अध्यक्ष देसले, संजय कुंवर, डी. बी. पाटील या माजी अध्यक्षांसह उपाध्यक्ष अशोक पवार, सुरेश माळी व शोभा पवार यांचा समावेश आहे. पाचही जिल्ह्य़ातील सभासदांच्या सोयीच्या दृष्टीने सर्वसमावेशक उमेदवार दिल्याचा दावा चंद्रकांत देसले यांनी केला आहे तर बँकेच्या कारभारात संगणक खरेदीपासून ते थेट कर्ज वितरणापर्यंतच्या प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप लोकहिताय पॅनलचे प्रमुख रवींद्र खैरनार यांनी केला आहे. या निवडणुकीनिमित्त बँकेच्या कामकाजातील वेगवेगळी माहिती आरोआपच सभासदांना मिळू लागली आहे. सर्वच जागांवर होणाऱ्या या तिरंगी लढतीत कोण ते पॅनल बाजी मारते, कुणाला सभासद नाकारतात का तीनीही पॅनलमधील उमेदवारांना कशारितीने ते प्राधान्य देतात, ते येणारा काळच ठरवेल. एक मार्च रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान मतदान होईल तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठपासून मत मोजणीला सुरूवात होणार आहे.

खर्डे गावात तळीरामांच्या मुंडनाचे सत्र
आसपासच्या गावातून चोरून लपून दारू पिऊन गावात आलेल्या तीन ते चार जणांना आतापर्यंत शिक्षा.
वार्ताहर / देवळा

तालुक्यातील खर्डी येथील ग्रामसभेत अवैध गावठी दारू विक्रीच्या बंदीचा ठराव झाल्यानंतर आता या गावाने त्यापुढचे पाऊल टाकत आजूबाजूच्या गावातून दारू पिऊन येणाऱ्यांचे मुंडन करण्याचे सत्र खर्डे गावात सुरू झाले आहे. या प्रकाराने खर्डे गावातील तळीरामांची चांगलीच पंचाईत झाली असून परिसरात सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे. तालुक्यातील खर्डे येथे गेल्या २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत गावातील एका ठिकाणाहून होणारी अवैध गावठी दारू विक्री बंद करण्याचा ठराव करण्यात आला. गावातील या अवैध गावठी दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेक वेळा कमिटय़ा स्थापन करण्यात आल्या परंतु दारू विक्री व पिणाऱ्यांवर त्याचा कोणताही परिणाम दिसून येत नसल्याने ग्रामसभेत ठराव होवून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच परिपाक म्हणून सध्या गावात दारुबंदी झाली आहे. तरीही काही जण आसपासच्या गावातून चोरून लपून दारू पिऊन गावात येत असल्याचे समजल्यावर आता या तळीरामांची गावाच्या चौकात चप्पी करण्याची मोहीम उघडण्यात आली आहे. आतापर्यंत तीन ते चार जणांना अशाप्रकारे शिक्षा करण्यात आली असून परिसरात तो चर्चेचा विषय बनला आहे.