Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
भवताल
(सविस्तर वृत्त)

नैसर्गिक सौंदर्याला नख!

 

नाशिक विकासाच्या वाटेवर धावत असतानाही आल्हाददायक वातावरणाची ओळख टिकवून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शहराप्रमाणेच नाशिक जिल्हय़ाला डोंगरदऱ्यांचा पडलेला वेढा! हा वेढाच येथील हवामान, आरोग्यदायी वातावरण, नैसर्गिक सौंदर्य, हिरवाईचे पांघरूण, झाडं-झुडपं या सगळय़ांचे संगोपन वा संवर्धन करीत आला आहे. त्याच टेकडय़ा व डोंगरावर खाणीवाल्यांचे आक्रमण सुरू झाले आहे. हे कृत्य म्हणजे नाशिकच्या सौंदर्याला नख लावण्याजोगेच म्हणावे लागेल.
नाशिकच्या सभोवतालच्या डोंगरांमध्ये पांडवलेणी, चांभारलेणी, त्र्यंबकेश्वर, अंजनेरीचा डोंगर, ब्रह्मगिरी डोंगर हे भौगोलिक अलंकार आहेत. या डोंगरांमुळेच येथील हवामान आल्हाददायक राहू शकले. डोंगरमाथ्यावरच्या वनस्पतींच्या आच्छादनामुळे झीज होण्याची प्रक्रिया सीमित होते. हे डोंगर भुईसपाट करण्याचा सपाटा सुरू असताना पर्यावरणवादी तसेच यंत्रणेतील घटकही अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत.
शहरातील बांधकामांमध्ये वाढ होत आहे. शहरातील व बाहेरून जाणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरण वा सहापदरीकरण वेगात सुरू आहे. त्यामुळे खनिजसंपत्ती पर्यायाने खडी, माती, वाळू, मुरूम, दगड यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिक सभोवतालचे डोंगर व टेकडय़ा पोखरल्या जात आहेत. सर्वाधिक क्लेशदायक बाब म्हणजे नाशिकचे नाक म्हणून ओळख असणारी पांडवलेणी आणि त्याच्या समोरची डोंगराची सबंध रांग गेल्या काही वर्षांपासून उत्खननाद्वारे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. मुंबई मार्गे नाशिकमध्ये दाखल होताना कुणालाही सर्वप्रथम याच डोंगररांगांमधून प्रवेश करावा लागतो. नाशिकची ही ‘नैसर्गिक वेस’ आता ढासळत चालली आहे. डोंगर पोखरून खडी करण्याचा उद्योग वेगाने सुरू आहे. त्याकडे स्थानिक पातळीवरील किंवा मुंबई-पुण्यातील एकाही पर्यावरणवादी संस्थेचे लक्ष गेले नाही, ही आश्चर्याची बाब आहे.
डोंगर वा टेकडय़ांमुळेच नाशिकचे हवामान हे आजही आल्हाददायी आहे. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६९७ मिलिमीटर, सरासरी कमाल तापमान ३१.१ अंश सेल्सिअस, तर किमान सरासरी तापमान १६.९ अंश असते. चहूबाजूला डोंगररांगा आणि गोदावरी नदीचे सान्निध्य यामुळेच मुख्यत्वे नाशिकचे वातावरण चांगले राहिले आहे. भूगोलाचे अभ्यासक व सेवानिवृत्त प्राध्यापक एम. जी. कुलकर्णी यांच्या मते हीच नाशिकची वैशिष्टय़े म्हणता येतील. नाशिकमध्ये सहय़ाद्री पर्वताची रांग उत्तर-दक्षिण दिशेने पसरलेली असून, त्याच क्रमाने सहय़ाद्रीची उंची हळूहळू कमी होत जाते. या मुख्य रांगेला जोडणाऱ्या अनेक उपरांगा आहेत. त्यात प्रामुख्याने सालबारी रांग, सातमाळा रांग आणि सहय़ाद्री रांग यांचा अंतर्भाव होतो. याच रागांमध्ये अनेक किल्ले आहेत. महाराष्ट्राचे वैशिष्टय़ असलेला बेसॉल्ट व त्यातील वैशिष्टय़पूर्ण खनिजे येथे पाहायला मिळतात. येथील वैशिष्टय़पूर्ण हवामानामुळे बेसॉल्ट खडकाची रासायनिक झीज होऊन काही ठिकाणी बॉक्साईटसारखी लोहाची खनिजे तयार होत असल्याचे दिसते. पिकास उपयुक्त काळी मृदा येथील बेसाइट या खडकापासून तयार होत असल्यामुळेच नाशिकच्या शेतीव्यवसायाला भराभराट येऊ शकली.
नाशिकची ही नैसर्गिक व भौगोलिक पाश्र्वभूमी लक्षात घेता सभोवतालचे डोंगर वा टेकडय़ा यांची जपणूक करणे काळाची गरज बनली आहे. प्रा. कुलकर्णी यांच्या मतानुसारदेखील, किमान नाशिकच्या भौगोलिक हितासाठी या टेकडय़ांची सुरक्षितता व जपणूक करणे हे प्रत्येक निसर्गप्रेमी नागरिकाचे कर्तव्य आहे. या नैसर्गिक अलंकारावर कोणत्याही प्रकारचे मानवी आक्रमण करणे म्हणजे मूक निसर्गावर अत्याचार करण्यासारखेच आहे. पण या बाबींकडे काणाडोळा करीत नाशिक, अंजनेरी वा त्र्यंबकेश्वर परिसरातील डोंगर व टेकडय़ा नेस्तनाबूत करण्याचे काम बिनदिक्कत सुरू असून जेथे बांधकामासाठी मर्यादा आहेत, तेथे नियमांचे सर्रास उल्लंघन करून बांधकामे उभी केली जात आहेत. राष्ट्रीय व राज्य महामार्ग अथवा मानवी वसाहतीनजीक क्रशर चालवून पर्यावरणाचा ऱ्हास करू नये म्हणूनही कायदेशीर बंधने आहेत. पण या सर्वाचे उल्लंघन तेवढय़ाच बेमुर्वतखोरपणे होत असल्यामुळे नाशिकच्या नैसर्गिक सौंदर्याला नख लावण्याचाच हा अश्लाघ्य प्रकार आहे.
pawarjp@gmail.com