Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
भवताल
(सविस्तर वृत्त)

बांध आणि शोषखड्डे

 

२७ वर्षांच्या लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यावर पडीक जमिनीचा विकास करून स्वावलंबी होण्याचे स्वप्न साकार करता आले. राज्य सरकारने मला ३० वर्षांपूर्वी सोलापूरला सीलिंगची तीन एकर खडकाळ, पडीक जमीन दिली. जमीन सुजलाम् करून कुटुंबाच्या गरजा भागविण्याचा निश्चय केला. भौगोलिक परिस्थितीची पाहणी करून दगडी बांध तयार करून वाहून जाणारे पाणी-माती अडविण्याचा प्रयत्न सुरू केला. दुष्काळी क्षेत्रातील सोलापूरच्या माळरानावरील जमीन सुपीक करण्याचा मानस होता. शेजारचे शेतीमालकही माजी सैनिक होते. त्यांच्या संमतीने २६-२७ वर्षांपूर्वी विकासाची दिशा ठरविली. माझ्या जमिनीवरून लहान ओढा वाहात होता. हेच माझे बलस्थान आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत त्यातून झुळुझुळु पाणी वाहायचे. त्याचा फायदा घेण्याचे ठरविले.
पूर्वेकडून वाहत येणाऱ्या ओढय़ावर शेजाऱ्यांच्या मदतीने प्रत्येकी ५० फुटांवर दगडी बांध घातले. ओढय़ामधून उताराकडे वाहत जाणारे पाणी अडविण्याकरिता दगडी बांध मजबूत केले. बांधाच्या वरच्या बाजूला शोषखड्डा करून पाण्यासोबत वाहत जाणारी माती अडवली. खडकाळ जमीन असल्याने ६ फूट रुंद, ४ फूट खोल आणि ६ फूट लांब असा शोषखड्डा तयार केला. असे तीन शोषखड्डे केले. सुमारे ४५ एकरांचे कमांड क्षेत्र पाहून पाण्याची व्याप्ती, वेग आणि प्रवाह पाहून चार फूट उंच दगडी बांध तयार केले. सुरुवातीला वेगाने वाहणारे पाणी लहान दगडांनाही सोबत घेऊन जात होते. शेतातील ओढय़ातच विहीर खणली. २० फूट बाय २० फूट आणि २० फूट खोल खडकात पाझर सुरू झाले. विहिरीच्या पूर्वेला वरच्या बाजूला लहान जलशोषखड्डे केले. दगडी बांध आणि त्यावरच्या शोषखड्डय़ात पावसाळय़ामध्ये पाणी साचू लागले. सुरुवातीचे एक-दोन पाऊस पडून गेल्यावर पाणी साचू लागले.
पाण्याचा वापर बोर, सीताफळ, आंबा तसेच, खरीप-रब्बी पिकांना करीत राहिलो. दहा वर्षांचा काळ लोटला. पाण्याची उणीव भासू लागली म्हणून विहीर पाच फूट खोल करून घेतली आणि वरच्या बांधालगतचा शोषखड्डा खोल करून त्यात वाळू भरून घेतली. ८० फूट ओढय़ाचे नाला पसरटी करणे करून नाल्याला बाहय़ वळण दिले जेणेकरून ओढय़ाचा भूमिगत जलस्रोत विहिरीत, पाझरत राहावा अशी व्यवस्था निर्माण झाली. पावसाचे पाणी ओढय़ात वाहू लागले, की दगडातून विहिरीत धबधब्याप्रमाणे पाणी पडत असलेले दिसते. नाल्याच्या मजबुतीकरणाकरिता दोन्ही बाजूंनी जैविक बांध तयार केले आहेत.
नाल्यातले दगडी बांध मजबूत राहावे म्हणून जैविक बांध गवतवाढ होऊ देतो. सुबाभूळ, निरगुडी वनएरंडाची झुडपं राखून ठेवली आहेत. पावसाच्या पाण्यासोबत वाहत येणारी माती शोषखड्डय़ात थांबते आणि नाल्यात पसरते त्यामुळे गवताची वाढ चांगली होते. त्या वाढलेल्या गवतामुळे पावसाचे पाणी नैसर्गिकरीत्या स्वच्छ होऊन खाली जाते. शेवटच्या शोषखड्डय़ात वाळू असल्याने पाणी वाहणारे शुद्ध होऊन विहिरीकडे येते. तसेच तळय़ाकडेही जाते. शोषखड्डय़ातील साचलेली माती व कचरा खतरूपाने वापरून वृक्षसंर्वधनासाठी उपयोगात आणला जातो.
पाणी अडविण्यासाठी, साठविण्यासाठी केलेली बांधबंदिस्ती टिकून राहावी म्हणून दुरुस्ती-देखभाल निरंतर करीत राहावे लागते. विहिरीमध्ये उन्हाळय़ातसुद्धा १० फूट खोल पाणी असते. तीनइंची विद्युत पंप सलग साडेचार तास चालतो. उन्हाळय़ातही रोज इतके पाणी मिळते. जलसंधारणाचे उपचार आणि विहीर पुनर्भरण प्रक्रिया केल्यामुळे पाणी प्रदूषित होत नाही आणि शेतात लागवड केलेल्या वनस्पतीचे भरणपोषण होते. उपलब्ध पाणी फळझाडांना ठिबक सिंचनाने दिले आहे. संपूर्ण शेताचे बांध वनभिंतीने सुशोभित केले आहेत. शेतात आंब्याची १५ झाडे, चिंचेची ६५, सीताफळाची ६५, बोरांची ५०, शेवग्याची १०, चिकूची ५, पेरूची ५, रामफळाची ५ आणि नारळाची ४० झाडे आहेत. इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र सुभेदार बाबुराव पेटकर सांगतात, थोडय़ाशा उताराची जमीन असल्याने शेतात मातीचे थर, तयार होत गेले. मशागत पाणी मुरविण्याच्या पद्धतीने करून सरीतले पाणी सरीत जिरवतो. फळझाडांना प्रत्येकी सूक्ष्म पाणलोट करून ठिबक वापर पालापाचोळा मल्चिंग केले आहे. फळझाडाचे Root zone पाहून उतारावर चारी तयार केल्या आहेत. पावसाचे पाणी सोन्यावाणी समजून वेळ न दवडता नियोजन केले तर दुसरी हरितक्रांती यशस्वी होईल. ‘पाणी कमवा पाणी वापरा’ हा मंत्र मला अमलात आणता आला याचा सार्थ अभिमान आहे.
(पेटकर यांच्या संपर्काचा क्रमांक- ९८२३८४२८४४)