Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
भवताल
(सविस्तर वृत्त)

सागरांमधील ‘डेंजर झोन्स’

 

जगातील सर्वच महासागर, समुद्र, नद्या, सरोवरे, तलावांमध्ये ‘डेड झोन्स’ वाढत आहेत. पृथ्वीवरील महासागरांमध्ये आजपर्यंत सुमारे २०० डेड झोन्स शोधण्यात आले आहेत. डेड झोन्स म्हणजे जिथली सागरसंपत्ती मृत पावली आहे किंवा त्या ठिकाणाहून दुसरीकडे निघून गेली आहे असे क्षेत्र. जे सागरी सजीव पोहून दुसरीकडे जाऊ शकतात, तेच या मृत सागरी पट्टय़ांपासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतात. पण इतर असंख्य समुद्री जीव मात्र या डेड झोन्समुळे नष्ट होत आहेत. मुख्यत: समुद्रातील माशांवरही याचा परिणाम होतो. केवळ गेल्या दोनच वर्षांमध्ये समुद्री मृत पट्टय़ांमध्ये ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे!
पाण्याचे खूप मोठय़ा प्रमाणात रासायनिक प्रदूषण झाल्यावर पाण्यातील नायट्रोजन, फॉस्फरसच्या प्रमाणात वाढ होते. शेतीत वापरली जाणारी रासायनिक खते पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे पाण्याच्या दिशेने वाहून जातात. मग ती पाण्याच्या नैसर्गिक साठय़ांमध्ये मिसळतात. जीवाश्म इंधनांचे ज्वलन, रासायनिक खतांचा प्रचंड वापर व शेतीतील इतर रसायने व मानवी हालचालींच्या असंख्य ज्ञात व अज्ञात कारणांमुळे जमिनीवरील नायट्रोजन, फॉस्फरसयुक्त रसायने जलस्रोतांमध्ये मिसळतात.
पाण्यातील या विशिष्ट रसायनांचे, प्रदूषकांचे प्रमाण वाढले, की त्या पाण्यात ठरावीक प्रकारची शेवाळी फोफावतात. यालाच Algal Bloom म्हणतात. एकदा का या शेवाळय़ाने पाण्याचा ताबा घेतला, की इतर सजीवांचे पाण्यातील अस्तित्व धोक्यात येते. शेवाळे, फायटोप्लँकटॉन्स पाण्यात कालांतराने मरण पावतात व तळाशी साठतात. त्यावर काही विशिष्ट जिवाणू वाढतात. शेवाळे व हे जिवाणू पाण्यातील विरघळलेला जास्तीत जास्त प्राणवायू वापरतात. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी होते. परिणामी, प्राणवायूअभावी व खायला न मिळाल्याने माशांसारखे इतर सजीव मरण पावतात.
समुद्राप्रमाणे नद्या, तळी व धरणांमध्येसुद्धा ही प्रक्रिया घडते. पृष्ठभागावर दाट हिरवे शेवाळे पसरल्याने पाण्यात तळापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही. त्याचा पाण्यातील सर्व जलचरांच्या सहजीवनावर परिणाम होतो आणि जलचक्रही बिघडते. कालांतराने हे शेवाळे वाढत जाऊन अनेक लहानमोठी तळी, सरोवरे, दलदलीच्या जागांना नष्ट करते. हेच जर समुद्रामध्ये, महासागरांमध्ये झाले, तर उत्पादनशून्य डेड झोन्स तयार होतात. याचा परिणाम त्या भागात मासेमारी करून गुजराण करणाऱ्या लोकांवरही निश्चितच होतो.
एकदा मेलेले तळे, सरोवर परत जिवंत करणे अतिशय कठीण बाब असते व खर्चिक असते. २०३० सालापर्यंत पाण्याच्या रासायनिक प्रदूषणामुळे पाण्यातील नायट्रोजनचे प्रमाण १४ टक्क्यांनी वाढणार आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मानवाने केलेल्या रासायनिक प्रदूषणामुळे निसर्गातील फॉस्फरसच्या प्रमाणात चौपट वाढ झाली आहे. हीच रसायने पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन ‘डेंजर’ डेड झोन्स निर्माण करतात.
सध्या हे डेड झोन्स भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत हिंदी महासागरात, फिनलँड, ब्रिटन, घाना, ग्रीस, ऊरुग्वे, उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका येथे मोठय़ा संख्येने सापडत आहेत. ऋतुमानानुसार, पाण्याच्या तापमान व प्रवाहांनुसार, समुद्रतळाच्या भूगर्भीय हालचालींनुसार हे डेड झोन्स सरकतात, बदलतात. उत्तर अमेरिकेतील महासागरातील एक डेड झोन चक्क न्यू जर्सी या राज्यापेक्षाही मोठा असल्याचे लक्षात आले आहे!
अशाच प्रकारची एक क्रिया आहे- युट्रॉफिकेशन म्हणजेच पाण्यातील कोणत्याही एका घटकाची अमर्याद वाढ होणे. ही वाढ रासायनिक प्रदूषकांमुळे होते. त्यास असंख्य कारणे असू शकतात. पाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरसचे प्रमाणाबाहेर वाढलेले प्रमाण यास कारणीभूत ठरते व त्यामुळेच प्रचंड प्रमाणात शेवाळसदृश वाढ पाण्याच्या पृष्ठभागावर होऊन ‘अल्गल ब्लूम’ होत असतो व त्यामुळे डेड झोन्स वाढू लागतात.. पाण्यातील परिसंस्थेला त्याचा फटका बसतो.
गेल्या पन्नास वर्षांत झालेल्या प्रदूषणामुळे आशिया खंडातील ५४ टक्के तळी, युरोपातील ५३ टक्के तळी, उत्तर अमेरिकेतील ४८ टक्के, दक्षिण अमेरिकेतील ४१ टक्के व आफ्रिकेतील २८ टक्के युट्रॉफिक आहेत, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कित्येक लहानमोठे पाणीसाठे केव्हाच बुजले गेले आहेत व आता महासागरांनाही डेड झोन्सच्या रूपात युट्रॉफिकेशनचे नुकसान सोसावे लागत आहे.
prachi333@hotmail.com