Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
भवताल
(सविस्तर वृत्त)

छुपे ध्वनिप्रदूषण!

 

ध्वनिप्रदूषण ही वाढत्या शहरीकरणामध्ये प्रामुख्याने भेडसावणारी समस्या. शहरांमध्ये दररोज वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे हवाप्रदूषणाबरोबरच ध्वनिप्रदूषणाचीही भयावह भर पडत आहे. वाहनांच्या संख्येच्या प्रमाणात अत्यंत अपुरे असलेले अरुंद रस्ते, गल्ल्या, बोळ यामुळे होणारी वाहनांची कोंडी हवा प्रदूषण तर करतेच, पण त्याचबरोबर आवाजाचेही प्रदूषण होण्यास हातभार लावते.
ठाणे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत वेगवेगळय़ा वेळी वाहनांची कोंडी दिसून येते. रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या इमारतीमधील घरात अगदी चार-पाच फूट अंतरावरून बोललेलेही ऐकू येणार नाही. ठाण्यात सुमारे चाळीस वर्षांपूर्वी सर्व बाजार गावात म्हणजेच कौपिनेश्वर मंदिर रस्त्यावर एकवटलेला व शहरातील प्रमुख रस्ता गोखले पथावर होता. अवघी चार-सहा दुकाने, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बैठय़ा चाळी व ताडय़ा! ही स्थिती झपाटय़ाने बदलत गेली. मांडवीकर वाडी, गोखलेवाडी, बावीकरवाडी, नाखवा चाळ इत्यादी पाडले जाऊन त्या जागी उभे राहिलेले टोलेजंग टॉवर्स व दुकानांचे साम्राज्य!
हेच शहरात प्रत्येक ठिकाणी दिसते. टॉवर्स व दुकानांमुळे रहदारी बेसुमार वाढली. परिणामी वृद्ध, स्त्रिया, लहान मुले यांनाच नव्हे तर धडधाकट तरुण माणसांसाठीही रस्ता ेओलांडणे जिकिरीचे बनले. येथे टॉवर्सपाठोपाठ कमर्शियल, शॉपिंग प्लाझा, मॉल्स आले. विकसित देशांमध्ये मॉल्स निवासी विभागापासून दूर असतात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाची झळ निवासी स्थानिक रहिवाशांना पोहोचत नाही. आपल्याकडे मात्र औद्योगिक पट्टय़ातील एखादी ‘आजारी’ कंपनी विकत घेऊन औद्योगिक पट्टय़ातच निवासी संकुले बांधली जातात व एखादे मॉलही उभारले जाते. बिल्डर मॉलच्या दर्शनी भागात सर्वत्र चकचकाट करतो. पण मॉलच्या मागची बाजू तेथील रहिवाशांसीठी त्रासदायक ठरते.
इटर्निटी मॉलचे व तेथील इटर्निटी संकुलाचे उदाहरण देता येईल. समोरच्या बाजूला दिवसाचे सर्व प्रहर ओसंडून वाहतील असे पूर्व द्रुतगती मार्ग (हाय-वे) व त्यावरील उड्डाणपूल. दुसरीकडे तितकाच ओसंडून वाहणारा ला. ब. शास्त्री मार्ग. दोन्ही रस्ते प्रचंड ध्वनिप्रदूषण करणारे. हे कमी झाले म्हणून की काय एका बिल्डरने निवासी संकुलाच्या लगतच इटर्निटी मॉल उभारले. मॉलची मागची बाजू मात्र त्याच बिल्डरने बांधलेल्या निवासी संकुलाच्या रहिवाशांना अतिशय त्रासदायक ठरली आहे. मॉलचे प्रचंड जनरेटर सतत आवाज करतात. कधी लोडशेडिंगमुळे वीज गेली म्हणून तर कधी वीजपुरवठा कमी झाला म्हणून चालू असलेल्या या जनरेटर्सचा मोठा आवाज निवासातील रहिवाशांना त्रासदायक ठरतो. तसेच मॉलमधील दुकानांच्या सुमारे चाळीस वातानुकूलित यंत्रांचे पंखेही मॉलच्या मागच्या िभतीवर आहेत. त्यांच्या आवाजाचा त्रासही रहिवाशांनाच. सकाळी नऊच्या सुमारास कानठळय़ा बसविणारा आवाज करत सुरू होतो. तो रात्री एक-दीड वाजेपर्यंत सुरू राहतो. मॉलमधील थिएटरचे शेवटचे शो संपेपर्यंत हे आवाज ऐकणाऱ्यांचे कान, मेंदू बधिर करून रात्री उशिरा बंद होतात.
एवढय़ावरच भागले नाही म्हणून की काय, पण मॉलच्या बाहेर मोकळय़ा जागेत सतत ऑर्केस्ट्रा, रेनडान्स, कोणा कॉलेजचे स्नेहसंमेलन इत्यादी कार्यक्रम सतत केले जातात. ध्वनिप्रदूषण मर्यादेच्या सर्व पातळय़ा ओलांडून अत्यंत मोठय़ा आवाजात सुरू असलेले हे डी.जे. म्युझिक इटर्निटीवासीयांची मोठी डोकेदुखी. घराच्या सर्व काचा बंद करूनही हे आवाज येतच राहतात. विद्यार्थी, आजारी, वृद्ध यांची यत्किंचितही पर्वा न करता मोकळय़ा जागेत, उघडय़ावर सुरू असलेला हा कर्णकर्कश धांगडधिंगा बंद काचांची तावदानेही थरथरवतो. खिडकी चुकून उघडलीच तर आवाजाचे घणाघाती घाव सहन करावे लागतात. ज्या प्रेक्षकांना अशा आवाजाचे, कार्यक्रमाचे वावडे नाही त्यांची सोय बंदिस्त ऑडिटोरियममध्ये खुशाल करून द्यावी. पण उघडय़ावर, आम जनतेला कर्णबधिर करणारे हे कार्यक्रम बिनदिक्कत सुरू असतात. पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही उपयोग होत नाही. कारण उघडच आहे- बिल्डर थोर, रहिवासी पामर! त्यांना कोण दाद देणार? हेच चित्र थोडय़ाफार प्रमाणात अनेक ठिकाणी दिसून येते. ला. ब. शास्त्री मार्गावरील टीपटॉप प्लाझाच्या मागच्या बाजूला राहणारे रहिवासीसुद्धा वातानुकूलित यंत्राच्या पंख्यांच्या आवाजाने त्रासले आहेत. ११५ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात राहताना विकसित देशांप्रमाणे मॉल्स निवासी विभागापासून दूर असावेत, अशी अवास्तव अपेक्षा कोणी करणार नाही. पण किमानपक्षी ज्या मध्यमवर्गीयांनी आयुष्यभराची पुंजी खर्च करून स्वत:चे घरकुल घेतले, त्या घरकुलात त्यांना शांतपणे झोप मिळावी यासाठी -त्याच मध्यमवर्गीयांच्या जिवावर गडगंज नफा कमावणारे- बिल्डर हा त्रास दूर करतील तो सुदिन!
-श्रीमती रजनी अशोक देवधर, ठाणे