Leading International Marathi News Daily

मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

भवताल

नैसर्गिक सौंदर्याला नख!
नाशिक विकासाच्या वाटेवर धावत असतानाही आल्हाददायक वातावरणाची ओळख टिकवून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शहराप्रमाणेच नाशिक जिल्हय़ाला डोंगरदऱ्यांचा पडलेला वेढा! हा वेढाच येथील हवामान, आरोग्यदायी वातावरण, नैसर्गिक सौंदर्य, हिरवाईचे पांघरूण, झाडं-झुडपं या सगळय़ांचे संगोपन वा संवर्धन करीत आला आहे. त्याच टेकडय़ा व डोंगरावर खाणीवाल्यांचे आक्रमण सुरू झाले आहे. हे कृत्य म्हणजे नाशिकच्या सौंदर्याला नख लावण्याजोगेच म्हणावे लागेल. नाशिकच्या सभोवतालच्या डोंगरांमध्ये पांडवलेणी, चांभारलेणी, त्र्यंबकेश्वर, अंजनेरीचा डोंगर, ब्रह्मगिरी डोंगर हे भौगोलिक अलंकार आहेत. या डोंगरांमुळेच येथील हवामान आल्हाददायक राहू शकले. डोंगरमाथ्यावरच्या वनस्पतींच्या आच्छादनामुळे झीज होण्याची प्रक्रिया सीमित होते. हे डोंगर भुईसपाट करण्याचा सपाटा सुरू असताना पर्यावरणवादी तसेच यंत्रणेतील घटकही अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत.

बांध आणि शोषखड्डे
२७ वर्षांच्या लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यावर पडीक जमिनीचा विकास करून स्वावलंबी होण्याचे स्वप्न साकार करता आले. राज्य सरकारने मला ३० वर्षांपूर्वी सोलापूरला सीलिंगची तीन एकर खडकाळ, पडीक जमीन दिली. जमीन सुजलाम् करून कुटुंबाच्या गरजा भागविण्याचा निश्चय केला. भौगोलिक परिस्थितीची पाहणी करून दगडी बांध तयार करून वाहून जाणारे पाणी-माती अडविण्याचा प्रयत्न सुरू केला. दुष्काळी क्षेत्रातील सोलापूरच्या माळरानावरील जमीन सुपीक करण्याचा मानस होता. शेजारचे शेतीमालकही माजी सैनिक होते. त्यांच्या संमतीने २६-२७ वर्षांपूर्वी विकासाची दिशा ठरविली. माझ्या जमिनीवरून लहान ओढा वाहात होता. हेच माझे बलस्थान आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत त्यातून झुळुझुळु पाणी वाहायचे. त्याचा फायदा घेण्याचे ठरविले.

सागरांमधील ‘डेंजर झोन्स’
जगातील सर्वच महासागर, समुद्र, नद्या, सरोवरे, तलावांमध्ये ‘डेड झोन्स’ वाढत आहेत. पृथ्वीवरील महासागरांमध्ये आजपर्यंत सुमारे २०० डेड झोन्स शोधण्यात आले आहेत. डेड झोन्स म्हणजे जिथली सागरसंपत्ती मृत पावली आहे किंवा त्या ठिकाणाहून दुसरीकडे निघून गेली आहे असे क्षेत्र. जे सागरी सजीव पोहून दुसरीकडे जाऊ शकतात, तेच या मृत सागरी पट्टय़ांपासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतात. पण इतर असंख्य समुद्री जीव मात्र या डेड झोन्समुळे नष्ट होत आहेत. मुख्यत: समुद्रातील माशांवरही याचा परिणाम होतो. केवळ गेल्या दोनच वर्षांमध्ये समुद्री मृत पट्टय़ांमध्ये ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे!

छुपे ध्वनिप्रदूषण!
ध्वनिप्रदूषण ही वाढत्या शहरीकरणामध्ये प्रामुख्याने भेडसावणारी समस्या. शहरांमध्ये दररोज वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे हवाप्रदूषणाबरोबरच ध्वनिप्रदूषणाचीही भयावह भर पडत आहे. वाहनांच्या संख्येच्या प्रमाणात अत्यंत अपुरे असलेले अरुंद रस्ते, गल्ल्या, बोळ यामुळे होणारी वाहनांची कोंडी हवा प्रदूषण तर करतेच, पण त्याचबरोबर आवाजाचेही प्रदूषण होण्यास हातभार लावते. ठाणे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत वेगवेगळय़ा वेळी वाहनांची कोंडी दिसून येते. रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या इमारतीमधील घरात अगदी चार-पाच फूट अंतरावरून बोललेलेही ऐकू येणार नाही. ठाण्यात सुमारे चाळीस वर्षांपूर्वी सर्व बाजार गावात म्हणजेच कौपिनेश्वर मंदिर रस्त्यावर एकवटलेला व शहरातील प्रमुख रस्ता गोखले पथावर होता. अवघी चार-सहा दुकाने, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बैठय़ा चाळी व ताडय़ा! ही स्थिती झपाटय़ाने बदलत गेली.