Leading International Marathi News Daily

मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

शिवसेनेच्या वतीने शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सोमवारी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी उपस्थित जनसमुदाय व श्री. ठाकरे.

काँग्रेसच्या दळभद्री सत्तेला उखडून टाका - उद्धव ठाकरे
शिक्रापूर, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

वीज, पाणी पुरविण्यात तसेच जनतेची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसच्या दळभद्री सत्तेला जनतेने उखडून टाकावे, असे आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
शिवसेनेच्या वतीने शिक्रापूर (ता. शिरूर) येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ठाकरे बोलत होते.

महसूल अधिकाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यभर ‘काम बंद’
पुण्यात साडेपाच हजार दाखले खोळंबले

पुणे, १६ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोगात अन्याय झाल्याच्या निषेधार्थ राज्यातील महसूल अधिकाऱ्यांनी आज ‘सामूहिक रजा’ आंदोलन केल्यामुळे महसुली कामे पूर्णपणे ठप्प झाली. महसूल अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयांचा कारभार चालविण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रसंग आहे. या आंदोलनामुळे महसुली कामे थांबल्याने जिल्हा प्रशासनाला पुण्यासह काही ठिकाणी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.या आंदोलनाची राज्य सरकारने गंभीर दखल न घेतल्यास येत्या १८ फेब्रुवारीपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा महसूल महासंघ कृती समितीने दिला आहे.

डॉक्टर-रुग्णातील ‘भावनिक ओलावा’ औषधालाही शिल्लक नाही?
मुस्तफा आतार, पुणे, १६ फे ब्रुवारी

‘कितीदा तुम्हाला सांगितले रावसाहेब ‘पथ्ये’ पाळा.. पण तुम्ही मात्र ‘हट्टी’ बुवा..’, ‘काय हो, तुम्हाला इतका त्रास होतोय; विश्रांती घ्या, वेळेवर औषध घ्या असे कितीदा तरी बजावले.. तुम्ही डॉक्टरांचे ऐकाल तर शप्पथ.. त्रास झाला की मग डॉक्टरांना बोलवायला ‘धनी’ला धाडता..’!! .. हे संभाषण कुणा पती-पत्नीचे वा दुकानदाराचे मुळीच नाही. ‘फॅमिली डॉक्टर’ संकल्पनेशी समरस झालेल्या डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील हा संवाद. सामाजिक स्थित्यंतर आणि व्यावसायिक दृिष्टकोनामुळे दोघांतील डॉक्टर-रुग्ण यापेक्षा पुढच्या नात्यातील भावनिक ओलावाही आता लोप पावतोय..

पिंपरीत मनसे कार्यकर्त्यांनी जकातचोरी पकडून दिली
पिंपरी, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

जवळपास ६५० तेलाचे डबे असलेला लातूर येथील ट्रक जकात चुकवून चालला असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज पकडून िपपरी पालिकेच्या हवाली केला. सुमारे साडेचार लाख रुपये किमतीच्या मालावर पालिकेने ५५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

मेडिकल सपोर्ट ग्रुपचा औषध मदतीचा उपक्रम
पुणे, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

मेडिकल सपोर्ट ग्रुप या संस्थेच्या पुढाकारातून घरोघरी शिल्लक असलेली परंतु मुदत न संपलेली औषधे गोळा करून गरजू व गरीब रुग्ण व वृद्धाश्रमातील नागरिकांना मोफत पुरविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. आजपर्यंत विविध रुग्णालये आणि ग्रामीण भागातील गरजूंपर्यंत गेल्या सहा महिन्यांत एक लाख पंधरा हजार रुपयांची औषधे मोफत पुरविण्यात आली आहेत. ‘स्नेह सेवा’ या संस्थेच्या ‘औषध पेढी’ या उपक्रमांतर्गत आजपर्यंत नऊ लाख रुपयांची औषधे जमा करण्यात आली आहेत. त्यासाठी कोथरूड परिसरातील वीस डॉक्टर्स आणि संस्थेच्या बावीस स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले आहेत. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून जमा झालेली औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या रुग्णांपर्यंत पोहोचविण्याची इच्छा असलेल्या संस्थांनी मेडिकल सपोर्ट ग्रुपशी ९८२२०१९२४८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रभाकर जावडेकर यांनी केले आहे.

बेपत्ता वकील उमेश बोराटे यांचा अद्याप तपास नाही
पुणे, १६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

हडपसर येथील मगरपट्टा सिटीमधून बेपत्ता झालेल्या अ‍ॅड. उमेश बोराटे यांचा शोध घेण्यास हडपसर पोलिसांना नऊ महिन्यांनंतरही अपयश आले आहे. उमेश यांचे वडील व नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश बोराटे यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे ही तक्रार केली आहे. अ‍ॅड. उमेश बोराटे हे मागील वर्षी पंधरा मे रोजी काही कारणांवरून रागावून घरातून निघून गेले होते. एमएच १२. सी.क्यू, १८३७ या क्रमांकाच्या ‘हिरोहोंडा पॅशन प्लस’ या दुचाकीवरून ते निघून गेले. त्यानंतर त्यांचे वडील अ‍ॅड. सुरेश बोराटे यांनी याबाबत हडपसर पोलिसांकडे उमेश बेपत्ता झाल्याविषयी तक्रार दिली. मात्र, ही तक्रार दाखल झाल्यानंतर नऊ महिने उलटल्यावरही उमेश यांचा शोध लावण्यात हडपसर पोलिसांना अपयश आले आहे, अशी तक्रार सुरेश बोराटे यांनी केली आहे. उमेश याच्यासह त्याच्या दुचाकीचा शोध लवकरात लवकर लावावा, अशी विनंती अ‍ॅड. सुरेश बोराटे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

गुन्हेगार धनंजय क्षीरसागर पाच जिल्ह्य़ांतून तडीपार
पुणे, १६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार धनंजय जालिंदर क्षीरसागर (वय ३२, रा. राजीव गांधीनगर झोपडपट्टी, जुना तोफखाना) याला पुण्यासह पाच जिल्ह्य़ातून तडीपार करण्यात आले.
पोलिसांच्या परिमंडळ एकचे उपायुक्त रघुनाथ खैरे यांनी क्षीरसागर याच्या तडीपारीचे आदेश दिले. येरवडा, डेक्कन व फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरुद्ध चोरी व दरोडय़ासारखे गुन्हे दाखल आहेत. पुणे जिल्ह्य़ात क्षीरसागर दिसल्यास नागरिकांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला १०० क्रमांकावर अथवा शिवाजीनगर पोलीस ठाण्याला २५५३६२६३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक राहुलकुमार येवले यांनी केले आहे.

सुरेशचंद्र वारघडे यांना डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार
पुणे, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

पर्यावरण लेखक सुरेशचंद्र वारघडे यांच्या ‘पर्यावरण रक्षण शिक्षण व ग्रामविकासाचे प्रयोग’ या पुस्तकास डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख स्मृती कृषी कार्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
अमरावती येथील स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे चॅरिटेबल ट्रस्ट, राज्यस्तरीय ग्रंथगौरव पुरस्कार समितीच्या वतीने वारघडे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या गुरुवारी (दि. १९) अमरावती येथे केरळचे राज्यपाल रा. सु. गवई यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘पत्रकारिता मार्गदर्शक’च्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
पुणे, १६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी लिखित व पुणे विद्यार्थी गृह प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘पत्रकारिता मार्गदर्शक’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन १८ फेब्रुवारीला होणार आहे.
केसरीवाडय़ातील लोकमान्य सभागृहामध्ये सायंकाळी ६ वाजता टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ‘सकाळ’चे संपादक यमाजी मालकर हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

वीज बिल भरणा केंद्राचे भेकराईनगरमध्ये उद्घाटन
हडपसर, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

पारदर्शक कारभार, तत्पर सेवा देऊन ग्रामीण भागातील पतसंस्थेने शहरामधील ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. भविष्यातही ग्राहकांशी अशीच बांधिलकी कायम ठेवून कामकाज चालू राहील, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे यांनी व्यक्त केला. भेकराईनगर येथील कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित या शाखेमध्ये अधिकृत वीज बिल भरणा केंद्राचे उद्घाटन वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्रीहरी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानावरून इंगळे बोलत होते. संस्थेच्या जेजुरी, सासवड, सुपा, भेकराईनगर आणि मार्केट यार्ड अशा पाच शाखा असून, मुख्य शाखा जेजुरी येथे आहे. संस्थेचे भागभांडवल १ कोटी ५१ लाख ८२ हजार २०० रुपये असून, संस्थेकडे ९ लाख ८४ हजार ९५ हजार ७७२ ठेवी असल्याचे या वेळी इंगळे यांनी सांगितले.

साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध
पुणे, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने सांगली जिल्ह्य़ातील खरात यांच्या आटपाडी या जन्मगावी प्रतिष्ठानास जागा उपलब्ध करून दिली आहे. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला खरात यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी उपाध्यक्ष डॉ. रवींद्र खरात, विलास खरात उपस्थित होते. राज्य शासनाने स्मारकासाठी जागा दिल्याचे नुकतेच पत्राने कळविले आहे. त्यामुळे खरात यांच्या स्मृती जतन करण्याचे काम त्यांच्या जन्मगावी होणार असून, त्यामध्ये विविध क्षेत्रांतील व्यक्ती सहभागी होतील. २००५ पासून स्मारकासाठी जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. यासाठी महसूलमंत्री पतंगराव कदम यांनी सहकार्य केले, असे खरात यांनी सांगितले.