Leading International Marathi News Daily

मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

राज्य

संसदेच्या प्रांगणात आज शाहू महाराजांच्या पुतळय़ाचे अनावरण
कोल्हापूर, १६ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी

पददलितांच्या उत्थानासाठी सत्ता पणाला लावणारे महाराष्ट्राचे महान समाज सुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती ब्राँझच्या पुतळ्याचे संसदेच्या प्रांगणात उद्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनावरण होत आहे. लोकसभा सचिवालयाच्या वतीने सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, केंद्रीय मंत्री, कोल्हापूरचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यासह अनेक संसद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी तसेच महाराष्ट्रातून येणारे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दुर्गसाहित्याच्या मेळय़ाने भारावला राजमाची!
अभिजित बेल्हेकर
राजमाची, १६ फेब्रुवारी

तो गड, दोन हजार वर्षे प्राचीन! त्या दूर डोंगररांगांमध्ये, जंगलाच्या गर्द झाडीत गेली कित्येक वर्षे असाच एकुटवाणा दिवस कंठित होता. पण त्याच्या या शक्ती-भक्तीचा धावा करत शेकडो दुर्गवारकऱ्यांनी त्यांची ही पंढरी गाठली आणि ‘दुर्गाच्या या देशी’ फक्त दुर्ग साहित्यावर एका अनोख्या उपक्रमाची नांदी घडली. निमित्त होते पहिल्यावहिल्या दुर्ग साहित्य संमेलनाचे आणि त्याचे पहिले पुष्प गुंफले गेले ते दुर्ग राजमाचीवर!

पर्याय आहेत, पण ते स्वीकारणार का?
अभिजित घोरपडे
पुणे, १६ फेब्रुवारी

राज्यात जास्त संख्येने पोलिसांची भरती करावी लागत असल्याने सध्या प्रशिक्षणाचा कालावधी कमी केल्याचे कारण दिले जात आहे, पण राज्य राखीव दलासारख्या इतर दलांची मदत घेतल्यास परिपूर्ण प्रशिक्षण देणे शक्य आहे. या पर्यायांचा उपयोग करून घेतला जाणार का, हा प्रश्न आहे. प्रशिक्षणाप्रमाणेच इतर साधनांची कमतरता भरून काढण्यासाठी असलेले पर्याय स्वीकारले जाणार का, हाही मुद्दा आहे.

नागठाण्यातील बालगंधर्व स्मारक जागेच्या वादाने रखडले
शीतल पाटील
सांगली, १६ फेब्रुवारी

संगीत रंगमंचावर एखाद्या राजहंसाप्रमाणे वावरणाऱ्या नटश्रेष्ठ नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्वाचे त्यांच्या जन्मगावी म्हणजे नागठाणे येथील स्मारकासाठी राज्य शासनाने सहा महिन्यापूर्वी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पण जागेच्या वादामुळे या स्मारकाच्या उभारणीत अडथळे निर्माण झाल्याने स्मारकाचे काम रखडले आहे.

कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेस लोंढे आणण्याचा धोका- संजय पवार
कोल्हापूर, १६ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी

रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी जाहीर केलेली कोल्हापूर-धनबाद ही एक्स्प्रेस गाडी कोल्हापूरकरांच्या सोयीपेक्षा गैरसोयीची अधिक आहे. या गाडीमुळे कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्याऐवजी लालूंच्या बिहारी बाबूंचे लोंढेच कोल्हापुरात येण्याचा अधिक धोका आहे.

मंगला बनसोडे यांना यंदाचा अनंत माने पुरस्कार जाहीर
कोल्हापूर, १६ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी

येथील लोकमंच चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या अनंत माने पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक सुनील मोदी यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली. लावणी आणि तमाशाच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग काम करणाऱ्या व्यक्तीला प्रतिवर्षी ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक अनंत माने यांच्या नावाने पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.

सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींत अन्याय
१४६२ अधिकारी-कर्मचारी रजेवर
जनसामान्यांना मात्र मनस्तापासह आर्थिक भरूदड
अलिबाग, १६ फेब्रुवारी/ प्रतिनिधी
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सापत्न भावाची वागणूक देण्यात आल्याचा निषेध नोंदवून त्याच्या पुनर्विचाराच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसाचे सामूहीक रजा घेऊन ‘काम बंद आंदोलन’ केले. परिणामी जिल्हाभरात शेकडो जनसामान्यांना या आंदोलनामुळे नाहक मनस्तापसह आर्थिक भरुदडही सहन करावा लागला.

कंधारडोह व प्रचितगडाच्या सफरीसाठी १२ तासांची अनोखी पायपीट!
जितेंद्र पराडकर
संगमेश्वर, १६ फेब्रुवारी

गड-किल्ले चढायचे म्हणजे हवी दुर्दम्य इच्छाशक्ती. शिवाजी महाराजांनी कोकणच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उभारलेले सर्व गड दुर्गम असून या गडावर आजही पूर्वीचे अवशेष पाहायला मिळतात. कोकणातील गडांवर पोहोचल्यानंतर नकळत मन इतिहासात प्रवेश करते; एवढी या गडांची महती आहे. संगमेश्वर येथील तरुणांनी आपल्यामधील इच्छाशक्तीच्या जोरावर दुर्गम प्रचितगड व कंधारडोह ही ऐतिहासिक ठिकाणे १२ तासांच्या पायपिटीनंतर सर केली आणि इतिहासातील थोर पुरुषांच्या धाडसाची व पराक्रमाची एक आगळीवेगळी अनुभूती घेतली.

आकले-कांगणेवाडी येथील लोकांच्या पुनर्वसनात शासकीय कोलदांडा!
धीरज वाटेकर
चिपळूण, १६ फेब्रुवारी

चिपळूण तालुक्यातील आकले-कांगणेवाडी येथील ३५ कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाचे घोंगडे अद्याप भिजत पडले आहे. त्या संदर्भात कोकण आयुक्तांकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. परिणामी शासकीय खात्याने दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे. ग्रामस्थांच्या मूलभूत मानवी हक्कांवरच गदा आल्याने पुन्हा आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाणार आहे.

कर्जत नगराध्यक्षपदी आघाडीचे शरद लाड
कर्जत, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. कर्जत नागरी आघाडीमधील राष्ट्रवादीचे शरद लाड हे शिवसेनेच्या स्मिता हजारे यांचा सात मतांनी पराभव करून निवडून आले, तर आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्मिता मोरे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. नगर परिषदेमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन नगरसेवकांनी मात्र तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन प्राधिकारी पी.डी. निकुंभ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय-भाजप यांनी कर्जत नागरी आघाडी स्थापन केली होती. त्यांना ११, तर शिवसेना-शेकाप यांच्या युतीला चार जागा मिळाल्या. या निवडणुकीत मनसेने स्वबळावर उतरून दोन नगरसेवक निवडून आणले होते. माजी आमदार सुरेश लाड, माजी बांधकाम सभापती पुंडलिक पाटील, माजी नगराध्यक्ष वसंत भोईर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एकनाथ धुळे, शहर अध्यक्ष राजाभाऊ कोठारी यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.माजी आमदार सुरेश लाड यांनी या निवडणुकीत कर्जतकरांनी आघाडीवर जो विश्वास दाखवून कर्जत नगर परिषदेची सत्ता आघाडीच्या हाती दिली आहे, तो सार्थ ठरेल. या निवडणुकीत मतदारांना दिलेली आश्वासने ही आघाडी नक्कीच पूर्ण करेल, अशी आशा व्यक्त करून सर्वसामान्य नागरिकाला नगर परिषदेमध्ये न्याय मिळेल, असे सांगितले.

आजपासून मुंबई-सोलापूर-मुंबई विमानसेवा
सोलापूर, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

‘किंगफिशर एअरलाईन्स’तर्फे उद्या मंगळवारपासून मुंबई-सोलापूर-मुंबई विमानसेवेला प्रत्यक्ष प्रारंभ होणार असून, पहिल्या दिवशीच सोलापूरहून हे विमान प्रवाशांनी पूर्ण भरून मुंबईकडे उड्डाण करणार आहे. मुंबईहून येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे स्वागत सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि अन्य संस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे. गेल्या १० फेब्रुवारी रोजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या विमानसेवेचा औपचारिक उद्घाटन सोहळा सोलापुरात पार पडला. त्यानंतर उद्या दि. १७ रोजी प्रत्यक्ष ही विमानसेवा सुरू होत आहे. मुंबईहून हे विमान सकाळी ११.१५ वाजता निघून सोलापूरला त्याचे आगमन दुपारी १२.४५ वाजता होणार आहे. त्यानंतर तेच विमान दुपारी १.१५ वाजता मुंबईकडे उड्डाण करून मुंबईला दुपारी २.४५ वाजता पोहोचणार आहे. उद्या सुरू होणाऱ्या या विमानसेवेची सोलापूरकरांना मोठी उत्सुकता होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी किंगफिशर एअरलाईन्स कंपनीच्या देशातील इतिहासात एकाच वेळी साठ प्रवाशांचे आरक्षण झाल्याचे सांगण्यात आले. आठवडय़ातून मंगळवार, गुरुवार, शनिवार व रविवार असे चार दिवस ही विमानसेवा चालणार आहे. सोलापूर ते मुंबईसाठी २६७५ रुपये इतके प्रवास भाडे ठेवण्यात आले आहे. ही विमानसेवा पुढे दिल्लीपर्यंत आणि दक्षिणेकडील हैदराबाद व तिरुपतीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही समजते. जिल्हय़ाचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली ही विमानसेवा अखेर उद्या मंगळवारी सुरू होत असल्यामुळे सोलापुरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

महाड नगराध्यक्षपदी संदीप जाधव यांची निवड
महाड, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

महाड नगर परिषदेच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाची निवडणूक होऊन पत्रकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक रिंगणामध्ये जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.जाधव यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर आमदार माणिकराव जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले. आजच्या सभेला उपनगराध्यक्षा प्रणाली महामुणकर, विरोधी पक्षनेते बिपिन महामुणकर, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी भालसिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष निकम, शहर अध्यक्ष सुभाष शिरशिवकर यांच्यासह महाडमधील सर्व पत्रकार उपस्थित होते.प्रा. सूर्यकांत शिलिमकर यांनी आपल्या भाषणात गेल्या दोन वर्षांंच्या नगराध्यक्षपदाच्या काळामध्ये सर्व नगरसेवकांनी आपल्याला चांगले सहकार्य दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. बिपिन महामुणकर यांनी नगराध्यक्ष जाधव यांचे अभिनंदन करताना शहराच्या विकासाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असून, शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरी लवकरात लवकर उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे घनकचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी योग्य निर्णय घेण्यावर त्यांनी भर दिला.

रायगडच्या निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी
अलिबाग, १६ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केलेल्या असतानाच रायगड जिल्हा निवडणूक यंत्रणेनेही जय्यत तयारी सुरू केली आह़े मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘इलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशिन्सची’ तपासणी सध्या रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरू आह़े रायगडमध्ये ३ हजार ८०५ व्होटींग मशिन्स आहेत, त्यांची संपूर्ण तपासणी करून बिनधोक प्रमाणपत्र कंपनी अभियंता देणारे असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणा प्रमुख व उप जिल्हाधिकारी प्रवीण पुरी यांनी दिली.इलेक्ट्रॉनीक व्होटींग मशिन्सद्वारे आजवर रायगडमध्ये झालेल्या मतदानानंतर मतमोजणीच्या वेळी अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत़ मतदान सुरू असताना मध्येच मशीन बंद पडल्याने मतांची मोजणी करता आली नाही, यासह अन्य विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या़ या सर्व तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर आता येऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोणत्याही प्रकारची तक्रार होऊ नये, म्हणून हैद्राबाद येथील इ.सी. कंपनीच्या अभियंत्यांकडून ही तपासणी करून घेण्यात येत आह़े

‘महाराष्ट्रासाठी अभिमान गीत’
रत्नागिरी, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

महाराष्ट्रात हळूहळू कमी होणारे मराठीचे महत्त्व लक्षात घेता, महाराष्ट्राला अवघ्या मराठीला एका अभिमान गीताची गरज आहे. सरळ साध्या बोलीभाषेत असणारे हे अभिमान गीत जनसामान्यांच्या सहकार्याने कोणत्या व्यावसायिक अथवा राजकीय प्रायोजकांशिवाय महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचावे, हेच आमचे ध्येय आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संगीतकार कौशल इनामदार यांनी केले. महाराष्ट्रदिनाच्या दिवशी महाराष्ट्राला एक अभिमान गीत देऊन मराठी भाषेचा अभिमान जागृत ठेवण्याकरिता इनामदार आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याविषयी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तबला वादक मंदार गोगटे आणि आर्ट सर्कलचे नितिन कानविंदे उपस्थित होते. ‘बहु असोत सुंदर संपन्न की महान..’ या आपल्या महाराष्ट्रगीताचा मराठी माणसाला विसर पडू लागला आहे. आपल्या दैनंदिन जीवनातही गरज नसताना मराठी भाषेऐवजी इतर भाषेचा वापरच जास्त केला जातो. जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या १७ भाषांमध्ये मराठीचा १५ वा तर भारतात चौथा क्रमांक असतानाही महाराष्ट्रात मात्र मराठीला दुय्यम स्थान मिळू लागले आहे. यासाठीच घराघरातून मराठीचा अभिमान जागविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे इनामदार यांनी सांगितले.

प्रथमेश लघाटेचा उद्या सत्कार
संगमेश्वर, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

आपल्या सुरेल आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला जिंकणाऱ्या, परंतु लिटल चॅम्पस् स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या ‘कोकण गंधर्व’ प्रथमेश लघाटे याचा माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी भव्य सत्कार करण्यात येणार आहे. माखजन शाळेसह संगमेश्वर तालुका व रत्नागिरी जिल्ह्याचे नाव सर्वदूर पोहोचविण्याचे काम बालवयातच प्रथमेशने केले. लिटल चॅम्पस् स्पर्धा पूर्ण झाल्यावर प्रथमेश नियमित शाळेत येऊ लागला असून, गाण्याप्रमाणे अभ्यासातही त्याची प्रगती उल्लेखनीय आहे. संस्थेचे मानद अध्यक्ष अ‍ॅड. पी.आर. नामजोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सत्कार सोहळ्यामध्ये प्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित विश्वनाथ कान्हेरे व प्रसिद्ध गायिका अर्चना कान्हेरे यांच्या हस्ते प्रथमेशला गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आमदार विनय नातू, माजी अर्थ राज्यमंत्री रवींद्र माने, आमदार रमेश कदम, उदय सामंत, सदानंद चव्हाण, अ‍ॅड. दीपक पटवर्धन, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय प्रबंधक मनोहर मोगल आदी उपस्थित राहणार आहेत. बुधवार, दुपारी २ ते ६ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार असून, त्यानंतर प्रथमेश आपल्या रसिक चाहत्यांसाठी गाण्याचा कार्यक्रम सादर करणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम माखजन इंग्लिश स्कूलमध्ये होणार असून, या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रीधर फणसे, मुख्याध्यापक किशोर पाटकर व सचिव आनंद साठे यांनी केले आहे.