Leading International Marathi News Daily

मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

क्रीडा

भारतीय क्रिकेटपटूंना अद्याप बक्षिसाची प्रतीक्षा!
ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ष लोटले
विनायक दळवी
मुंबई, १६ फेब्रुवारी

कोणत्याही झुंजीचे आकर्षण असते नंतर मिळणारी बक्षिसी! दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी करंडकासाठी, विजेतेपदासाठी, नावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि पुरस्काराच्या प्रचंड रकमेसाठी स्वत:ला मैदानावर झोकून देत असतात. सर्वस्व पणास लावत असतात. प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियासारखा असेल आणि खेळ क्रिकेटचा असेल तर मग पाहायलाच नको. ही झुंज ऑस्ट्रेलियात, म्हणजे वाघाच्या गुहेतच. गतसाली या वाघाच्या गुहेत जाऊनच भारतीय क्रिकेट संघाने बलाढय़ ऑस्ट्रेलियाला तिरंगी मालिकेत लोळविले. विश्वचषक विजयाइतका आनंद त्या वेळी तमाम भारतीयांना झाला. भारतीय क्रिकेट बोर्डाने तर प्रत्येक भारतीय खेळाडूला ५८ लाखांची बक्षिसी समारंभपूर्वक दिली.

मुंबईचा सलग दुसरा पराभव; गुजरातच्या ठक्करची ८७ धावांची नाबाद खेळी
राजकोट, १६ फेब्रुवारी / पीटीआय

मधल्या फळीतील फलंदाज भाविक ठक्करने केलेल्या नाबाद ८७ धावांमुळे गुजरातने विजय हजारे चषक पश्चिम विभागीय एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत मुंबईवर तीन विकेट्सनी मात केली. मुंबईचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव होता. पहिल्या सामन्यात बडोद्याने मुंबईला मात दिली होती. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना केलेल्या २२२ धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. प्रियांक पंचाल (२२), जेसल कारिया (१७) आणि कर्णधार पार्थिव पटेल (१३) हे लवकर माघारी परतले.

गतलौकिकासाठी बलाढय़ संघांविरुद्ध खेळायला हवे -गिल
नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी / पीटीआय

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय हॉकी संघ तेथील राज्य संघांविरुद्ध चमकदार कामगिरी करत आहे. पण, या कामगिरीचा भारतीय संघाला विशेष फायदा होईल असे वाटत नाही, असे मत बराखास्त भारतीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष केपीएस गिल यांनी व्यक्त केले. कमकुवत संघाविरुद्ध मोठय़ा गोल फरकाने विजय मिळवण्याचा सिनियर संघाला कधीच फायदा होत नाही. जर भारतीय संघाला गतलौकिक प्राप्त करायचा असेल तर त्यांनी नेहमी बलाढय़ संघाविरुद्ध खेळायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

नंबर वनवर पोहोचण्याचे दडपण आफ्रिकेवर - पॉन्टिंग
सिडनी, १६ फेब्रुवारी/ पीटीआय

आगामी कसोटी मालिकेमध्ये दक्षिण आफ्रि केचा संघ नंबर वनवर पोहाचण्यासाठी प्रयत्नशील असून त्याचेच दडपण त्यांच्यावर जास्त असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले आहे. गॅ्रमी स्मिथच्या दक्षिण आफ्रिकन संघाने मायदेशात ऑस्ट्रेलियाचा २-१ असा धुव्वा उडविला होता. दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियापेक्षा पाच गुणांनी पिछाडीवर असून घरच्या मैदानावर २६ फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिके मध्ये अव्वल स्थानावर पोहोचण्याचे त्यांचे मनसुबे असतील.

ह्य़ुजेसला लँगरचा कानमंत्र
मेलबर्न, १६ सप्टेंबर / पी. टी. आय.

आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ऑस्ट्रेलियन संघात पदार्पण करण्यास सिद्ध झालेल्या फिलिप ह्य़ुजेसने पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलियाचा सार्वकालीन सर्वोत्तम सलामीवीर जस्टीन लँगरकडून ‘टिप्स’ घेतल्या. २६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याला कसे सामोरे जायचे यासाठी ह्य़ुजेसने लँगरकडून कानमंत्र घेतला. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांकडून होणाऱ्या संभाव्य शारीरिक व शाब्दिक आक्रमणाची कल्पना लँगरने त्याला दिली.

स्ट्रॉसचे झुंजार शतक; इंग्लंडची दमदार सुरुवात
सेंट जॉन्स, अँटिगा, १६ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसने कर्णधाराला साजेशी खेळी करताना सबिना पार्कच्या कटू स्मृतींना तिलांजली तर दिलीच शिवाय अँटिगा रिक्रिएशन मैदानावर झटपट आयोजित करण्यात आलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहुण्या इंग्लंडला वर्चस्वही गाजवून दिले. अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसने (१६९) झळकावलेले कारकिर्दीतले १५वे कसोटी शतक पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत १-० ने पिछाडीवर असलेल्या इंग्लंड संघासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.

जयवर्धनेला निराप देण्यासाठी श्रीलंकेचा संघ उत्सुक
कराची, १६ फेब्रवारी/ एएफपी

पाकिस्तान विरूद्धच्या आगामी कसोटी मालिकेनंतर महेला जयवर्धने हा कर्णधारपद सोडणार असल्याने त्याला गोड निरोप देण्यासाठी श्रीलंकेचा संघ उत्सुक असल्याचे अष्टपैलू क्रि केटपटू थिलान समरवीरा याने आज सांगितले आहे.महेला आगामी मालिकेनंतर कर्णधारपद सोडणार असून श्रीलंकेचा संघ त्याला गोड निरोप देण्यासाठी उत्सुक आहे, असे समरवीराने पत्रकारांना सांगितले. तो पुढे म्हणाला की, एक कर्णधार म्हणून प्रत्येकाला त्याचे विक्रम माहीत असून त्याला गोड निरोप मिळायलाच हवा.

श्रीलंका व पाकिस्तानच्या खेळाडूंना आयसीसीच्या सूचना
दुबई, १६ फेब्रुवारी / पीटीआय

जागतिक उत्तेजक औषध सेवन प्रतिबंध समितीने (वाडा) या वर्षांपासून जारी केलेल्या नवीन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना श्रीलंका व पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिल्या आहेत. वाडाचे व्यवस्थापक लोरिंडा रग्लस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला श्रीलंकन व पाकिस्तानच्या खेळाडूंनीसुद्धा हजेरी लावली होती.

कबड्डी : साई डिजिटल- चेंबूर क्रीडा केंद्र अजिंक्य
मुंबई, १६ फेब्रुवारी / क्री. प्र.

साई डिजिटल प्लॅनेट, चेंबूर क्रीडा केंद्र आणि रेल्वे महिला पोलीस यांनी आकार फाऊंडेशन आणि मनसे आयोजित कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे व्यावसायिक, प्रथम श्रेणी व महिला गटात अजिंक्यपद पटकावले. विक्रोळीच्या कन्नमवार नगरातील बाल गंधर्व मैदानात झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत साई डिजिटलने सुरुवातीच्या पिछाडीनंतरही मायक्रो फायनान्सला १२-९ असे हरविले. सामन्याच्या अंतिम क्षणांमध्ये नीलेश उगले व रामचंद्र हलदर यांच्या उत्कृष्ट खेळामुळे मायक्रो फायनान्सने ९-८ अशी आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या मिनिटाला कुमार नाईकने एका चढाईत तीन प्रतिस्पर्धी बाद करून अखेर साई डिजिटलला विजयी केले. हृषीकेश म्हामुणकर व आतीष सावंत यांचीही त्याला चांगली साथ लाभली.

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ९६४.४२ कोटींची तरतूद
नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी / पीटीआय

केंद्र सरकारने आज सादर केलेल्या आपल्या अंतरिम अर्थसंकल्पात २०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ९६४.४२ कोटींची तरतूद केली आहे. या तरतुदीत स्टेडियम्सचे नूतनीकरण, खेळाडूंचे प्रशिक्षण, क्रीडांगणांची डागडुजी अशा विविध गोष्टींचा समावेश आहे.त्याशिवाय, या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या १५९३ कोटी रुपयांच्या तुलनेत क्रीडा व युवक कल्याणासाठी १७६४ कोटी रुपयांचे तरतूद करण्यात येणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तरतूद केलेल्या रकमेतील ६०० कोटी रुपये भारतीय क्रीडा प्राधिकरणाला स्टेडियम्सच्या निव्वळ नूतनीकरणासाठी तर १०० कोटी रुपये संघांच्या तयारीसाठी देण्यात आले आहेत. ६० कोटी रुपये क्रीडांगणाच्या डागडुजीसाठी तर १९४.४२ कोटी रुपये भारतीय क्रीडा प्राधिकरण, अखिल भारतीय टेनिस महासंघ व भारतीय ऑलिम्पिक संघटना यांना देण्यात येणार आहेत. उत्तेजकविरोधी मोहीम अधिक सक्षम करण्यासाठी १६.७५ कोटींचीही स्वतंत्र तरतूद केली गेली आहे.

..तर राजस्थानातील आयपीएल सामने अन्यत्र खेळवू - मोदींचा इशारा
मुंबई, १६ फेब्रुवारी/ क्री. प्र.

राजस्थान क्रिकेट संघटनेतील मतभेद चव्हाटय़ावर आल्याने वैतागलेल्या ललित मोदी यांनी जयपूर येथे होणारा इंडियन प्रीमियर लीगचा सामना अन्यत्र हलविण्याचा इशारा दिला आहे. तर राजस्थानातील काँग्रेसच्या नेत्यांनी हे सामने अन्यत्र हलविण्याचा अधिकार मोदींना नाही, अशा शब्दांत विरोध दर्शविला आहे.इंडियन प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोदी यांच्याविरोधात राजस्थान क्रिकेट संघटनेतील काही मंडळींनी पोलीस ठाण्यात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे.मोदी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, इंडियन प्रीमियर लीगचे सामने कोठे ठेवावेत याचा अधिकार इंडियन प्रीमियर लीगच्या कार्यकारी मंडळाने मला दिला आहे. या अधिकारानुसार जयपूर येथे होणारा आयपीएलचा सामना अन्यत्र हलविणे हा एक पर्याय माझ्या विचाराधीन आहे. आम्ही अन्य ठिकाणांचा विचार चालूही केला आहे. जयपूर शहरात गेल्या वर्षी झालेल्या बॉंबस्फोटात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांसाठी मुख्यमंत्री निधीत सहा कोटी रु. जमा करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते. मात्र ते जमा न केल्याने त्य़ांच्याविरुद्ध जयपूर पोलीस ठाण्यात रविवारी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. नागरिक मोर्चा नावाच्या स्वयंसेवी संघटनेने मोदी यांच्याविरुद्ध हा एफआयआर दाखल केला आहे.बोपण्णा-निमेनिनला उपविजेतेपद
नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी / पीटीआय

रोहन बोपण्णा व त्याचा सहकारी जार्को निमेनिन यांना सॅप ओपन टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जर्मनीच्या टॉमी हास व राडेक स्टेपानेक यांच्याविरुद्ध त्यांना २-६, ३-६ असा पराभव पत्करावा लागला. बोपण्णा व निमेनिन जोडीने उपान्त्यपूर्व फेरीत बॉब आणि माइक या ब्रायन बंधूंचा प्रमुख अडसर दूर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तेव्हा या दोघांकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते. पण अंतिम फेरीत त्यांचा प्रतिकार तोकडा ठरला. अवघ्या ५० मिनिटांतच त्यांनी प्रतिस्पध्र्यापुढे हात टेकले.हास आणि स्टेपानेक यांनी मिळालेल्या चारही ब्रेकपॉइंट्सवर गुण वसूल केले. बोपण्णा व निमेनिन यांना उपविजेतेपदामुळे १५० एटीपी गुण मिळाले तर १५ हजार ८०० डॉलरचे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीसही मिळाले.

इसिनबायेव्हाचा नवा इन्डोअर विश्वविक्रम
डोनेट्स्क (युक्रेन), १६ फेब्रुवारी / एएफपी

रशियाची आघाडीची पोल व्हॉल्टपटू येलेना इसिनबायेव्हा हिने इन्डोअर विश्व पोल व्हॉल्ट स्पर्धेत पाच मीटरची नोंद करीत नवा विश्वविक्रम घडविला. प्रतिवर्षी खेळविल्या जाणाऱ्या सर्जी बुबका याच्या नावाने खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेत येलेनाने आपला यापूर्वीचा ४.९५ मीटरचा विक्रम मोडीत काढून नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. गेली सहा वर्षे ती नवे विश्वविक्रम या स्पर्धेअंतर्गत घडवित आली आहे आणि त्याची पुनरावृत्ती तिने यावर्षीही केली. इसिनबायेव्हाने स्पर्धेनंतर सांगितले की, या स्पर्धेत मला दोन विक्रम करायचे होते. एक म्हणजे गतवर्षीचा ४.९५मीटरचा विक्रम मोडीत काढायचा होता आणि पाच मीटरचा नवा विक्रम प्रस्थापित करायचा होता. ही दोन्ही उद्दिष्टे साध्य झाली.

सानियाची क्रमवारीत सुधारणा अव्वल शंभर टेनिसपटूंमध्ये स्थान
नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी / पीटीआय

पटाया ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरी गाठणाऱ्या सानिया मिर्झाने जागतिक महिला टेनिस क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल शंभर टेनिसपटूंमध्ये स्थान मिळवले आहे. या स्पर्धेतील कामगिरीमुळे सानियाने मानांकनात ३९ स्थानाने प्रगती केली असून आज जाहीर झालेल्या क्रमवारीत ती ८७व्या स्थानावर आहे. महिला दुहेरीत उपांत्य फेरी गाठणाऱ्या सानियाला क्रमवारीत सात स्थानांचा फायदा झाला असून दुहेरीच्या क्रमवारीत सानिया ६३व्या स्थानावर आहे.मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे २००८च्या मोसमात अनेक स्पर्धाना मुकावे लागलेल्या सानियाची क्रमवारीत घसरण झाली होती. या स्पर्धेपूर्वी सानिया क्रमवारीत १२६व्या स्थानावर होती. सॅप ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत अंतिम फेरी गाठणाऱ्या रोहन बोपण्णाला क्रमवारीत सात स्थानांचा फायदा झाला असून तो ७८व्या स्थानावर आहे. दरम्यान, वर्ल्ड टेनिस स्पर्धेत दुहेरीत अंतिम फेरी गाठणारा लिएंडर पेस सातव्या स्थानावर तर महेश भूपती पाचव्या स्थानावर कायम आहे.

महाराष्ट्राची सौराष्ट्रवर मात
राजकोट, १६ फेब्रुवारी / पीटीआय

कर्णधार हर्षद खडीवाले याने ६३ धावांची झुंजार खेळी करून रणजी एकदिवसीय सामन्यांच्या विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राला सलग दुसरा विजय मिळवून दिला. महाराष्ट्राने गतविजेत्या सौराष्ट्रला सहा विकेट्सनी पराभूत केले. खडीवालेला केदार जाधव (५८), अंकित बावणे व अझर अन्सारी यांची साथ लाभली. सौराष्ट्रच्या २१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राची सुरुवात निराशाजनक झाली. पण खडीवालेने केदार जाधवसह तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करून महाराष्ट्राच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
संक्षिप्त धावफलक - सौराष्ट्र २१४ (रवींद्र जडेजा ७०, संदीप जोबनपुत्र ३१, अमद फलाह ३ /२९) पराभूत वि. महाराष्ट्र (खडीवाले ६३, केदार जाधव ५८, बावणे नाबाद ४१, अन्सारी नाबाद ३८, बालकृष्ण जडेजा २-४६.)

विकी बनकर मोहोळ केसरीचा मानकरी
पुणे, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

गोकुळ वस्ताद तालीमच्या विकी बनकर याने औंध व्यायामशाळेच्या साईनाथ रानवडे याला अवघ्या ३० सेकंदात झोळी डावावर अस्मान दाखविले व मामासाहेब प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मोहोळ केसरीचा मान मिळविला.शिवाजी स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत बनकर याला चांदीची गदा व १५ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. मोहोळ केसरीपदाची लढत एकतर्फी झाली. कुस्ती सुरू झाल्यानंतर त्याने एकेरी पट काढून रानवडे याला खाली घेतले व पाठोपाठ निमिषार्धात झोळी डाव टाकून आस्मान दाखविले. माजी महाराष््रठ केसरी कै. हिरामण बनकर यांचा विकी हा मुलगा असून तो रुस्तम-ए-हिंदू हरिषंद्र बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.महिलांच्या ६० ते ७० किलो गटात क्रीडा प्रबोधिनीच्या स्मिता मापारी हिने विजेतेपद मिळविताना आळंदी व्यायामशाळेच्या अश्विनी बोराडेला चुरशीच्या लढतीनंतर ४-२ असे हरविले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी खासदार विदुरा नवले, अशोक मोहोळ, युनिव्हर्सल उद्योग समूहाचे संचालक रोहिदास मोरे उपस्थित होते. गटवार निकाल-कुमार-२२ किलो-१.सुहास शितोळे, २.सौरभ मते, ३० किलो-१.शुभम जगताप,२.अनिकेत लिमण, ४२ किलो-१. सचिन सावंत, २. अमर मते.

योग स्पर्धेचे आयोजन
मुंबई, १६ फेब्रुवारी / क्री. प्र.

मुंबई जिल्हा योग संघटनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये योगविद्येचा प्रसार व प्रचार करण्यासाठी योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी रोजी महात्मा फुले सभागृह, ना. म. जोशी मार्ग येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी चंद्रकांत पाटील ९८६९१०४८९१, ओमप्रकाश जोशी ९८६९६४७६५० यांच्याशी संपर्क साधावा अथवा स्पर्धेच्या दिवशी सकाळी ८ वाजता उपस्थित राहावे.

व्यथित रिचर्ड्स म्हणतात
सामन्याच्या आयोजनापूर्वी माझा सल्ला घ्या!
लंडन, १६ फेब्रुवारी / पीटीआय

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीत मैदानाच्या वाईट स्थितीमुळे झालेल्या गोंधळामुळे व्यथित झालेल्या सर व्हिव रिचर्ड्स यांनी या स्टेडियमवर भविष्यात होणाऱ्या कोणत्याही सामन्यापूर्वी आपला सल्ला घेण्याची मागणी केली आहे. अँटिगातील सर व्हिवियन रिचर्ड्स स्टेडियमवरील हा सामना अवघे १० चेंडू टाकल्यानंतर रद्द करावा लागला होता. त्यामुळे रिचर्ड्स यांना प्रचंड दु:ख झाले व भविष्यात असे होऊ नये यासाठी आपल्याला विचारणा करावी, असे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, येथे कोणताही सामना आयोजित करण्यापूर्वी आपल्याशी चर्चा व्हायला हवी. मला या मैदानाची चांगली माहिती आहे आणि खेळण्यास ते योग्य आहे अथवा नाही, हे मी अधिकारवाणीने सांगू शकतो.