Leading International Marathi News Daily

मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

ठाण्याचे नगररत्न ! नगरविकास मंच या संस्थेच्या वतीने कवी अशोक बागवे (साहित्य), जादूगार इंद्रजित (कला), दत्ता चव्हाण (क्रीडा), अविनाश बर्वे (सामाजिक) आणि सरला राव (उद्योग) यांना रविवारी रात्री गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या सोहळ्यात नगररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक दाजी पणशीकर, आमदार विनोद तावडे, डॉ. हिमालय पंतवैद्य, अभिनेत्री वर्षां उसगावकर आणि प्रा. मुरलीधर सायनेकर उपस्थित होते.

क्रिकेट टुर्नामेंटचे गाव..
प्रशांत मोरे

इतर कोणत्याही देशी खेळाच्या तुलनेत भारताच्या कानाकोपऱ्यात अधिक लोकप्रिय असलेले क्रिकेट हे येथील शहरी आणि ग्रामीण क्रीडा संस्कृतीचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे. साधारण दिवाळीपासून एप्रिल-मेपर्यंत विविध ठिकाणी अक्षरश: अहोरात्र क्रिकेटच्या स्पर्धा सुरू असतात. क्रिकेटच्या टुर्नामेंटसमुळे भिवंडी तालुक्यातील एक गाव केवळ मुंबई परिसरातच नव्हे, तर राज्यभर प्रसिद्ध आहे. टेनिस क्रिकेट टुर्नामेंटच्या नेटक्या आयोजनासाठी चौफेर ख्याती असलेल्या या गावाचे नाव- टेमघरपाडा-भादवड. या छोटय़ाशा गावात उभारलेल्या एका सुसज्ज स्टेडियममध्ये मुंबई परिसरातील टेनिस क्रिकेटमधील अव्वल स्पर्धा खेळविल्या जातात

उन्हाळ्यातही ठाणेकरांना मिळणार मुबलक पाणी !
ठाणे /प्रतिनिधी

ठाणे पालिकेची अतिरिक्त पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली असून, येत्या एप्रिलपासून म्हणजेच ऐन उन्हाळ्यापासून ठाणेकरांना दररोज मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. ठाणेकरांची पाण्याची वाढती तहान भागविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेने अतिरिक्त ११० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठय़ाची योजना आखली होती.

ठाणे महापालिकेचा माजी सैनिकांना ‘करमाफी’चा सलाम!
ठाणे/प्रतिनिधी

देशरक्षणार्थ आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या तसेच देशसेवेचे कर्तव्य बजाविणाऱ्या ठाण्यातील माजी सैनिकांना मालमत्ता करात १०० टक्के सवलत देऊन या सैनिकांच्या देशसेवेला सलाम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे.

आयुक्त दालनासमोर अपंगांचे ठिय्या आंदोलन
ठाणे/प्रतिनिधी

अपंग व्यक्तींना स्टॉल बांधण्यासाठी २५ हजार रुपयांचे अनुदान, अंध-अपंगांसाठी स्वतंत्र कक्ष आणि प्रतीक्षा यादीतील लाभार्थीना सामावून घेण्याच्या मागणीसंदर्भात प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासल्याने बृहन्महाराष्ट्र अपंग विकास संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी ठाणे महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. याचे पडसाद सर्वसाधारण सभेतही उमटले. अर्थसंकल्पापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत अपंगाच्या स्टॉलसाठी ७५०० रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला. मात्र त्यात आयुक्तांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याची कुणकुण लागल्याने बृहन्महाराष्ट्र अपंग विकास संघटनेचे प्रदेश संघटक श्रीराम पाटणकर, सचिव युसूफ खान यांच्या नेतृत्वाखाली अपंग व्यक्तींनी आयुक्त नंदकुमार जंत्रे यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आयुक्तांनी त्यांच्या शिष्टमंडळाला दालनात बोलावून २५ हजारांचा प्रस्ताव मंजूर करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर अंध-अपंग स्टॉलवर प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीवर असणाऱ्या अपंग लाभार्थीना त्वरित सामावून परवाना पत्र देणे, अंध-अपंगांचे स्टॉल उभे राहिल्यावर भाडे आकारणे आणि अंध-अपंगासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. शासननिर्णायानुसार अंध-अपंग व्यक्तींसाठी २ कोटी रुपये ३१ मार्चपर्यंत खर्च करणे बंधनकारक आहे. एवढी तरतूद असताना महापालिका प्रशासन खर्च करण्यास तयार नाही.

कल्याण नागरी कृती समितीचे आज पालिकेसमोर धरणे
कल्याण/प्रतिनिधी -
‘आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड हटाव व फडके मैदान बचाव’ या मागणीसाठी मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी कल्याण नागरी कृती समितीतर्फे कल्याण- डोंबिवली पालिकेच्या मुख्यालयासमोर सकाळी अकरा वाजता एक दिवसाचे धरणे धरण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्ष सदानंद फडके, दिलीप काणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या धरणे कार्यक्रमात अ‍ॅड. शांताराम दातार, ज्येष्ठ पत्रकार सोमनाथ पाटील, फणसे, शहरातील जाणकार नागरिक, शाळांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. नागरिकांनी मोठय़ा संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन फडके यांनी केले आहे. मंगळवारीच पालिकेची महासभा असल्याने नगरसेवक, अधिकारी या उपोषणाविषयी काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

‘मागासवर्गीयांकडील ९०० कोटींची कर्जे माफ करावीत’
ठाणे/प्रतिनिधी :
केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट ध्यानात घेऊन कर्जमाफीचा घेतलेला निर्णय योग्य आहे. याच धर्तीवर राज्यात मागासवर्गीयांची असलेली बिकट परिस्थिती पाहता महामंडळांनी आतापर्यंत वितरित केलेले ९०० कोटी रुपयांची कर्जे माफ करावीत, अशी मागणी रिपब्लिकन कामगार नेते प्रकाश बनसोडे यांनी काल येथे मागासवर्गीय कर्मचारी हक्क परिषदेत केली
ते पुढे म्हणाले की, राज्यात सध्या दलितांवर अन्याय, अत्याचार सुरूच असून यास पायबंद बसावा म्हणून लागू करण्यात आलेला अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट हा कायदा तोकडा पडत आहे. त्यात सुधारणा करणे ही काळाची गरज असून यासाठी राज्याने सर्वपक्षीय बैठक बोलवावी व गुन्हेगारांना कठोर शासन होईल असा बदल घडवून आणावा. राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत सुरू केलेली घरकुल योजना ही सर्व जिल्ह्यांना समान प्रतिनिधित्व देणारी असावी, असेही बनसोडे म्हणाले. यावेळी रिपब्लिकन युवा नेते रमेश गायकवाड म्हणाले की, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, परंतु राजकीय आरक्षण मागणी ही अज्ञानी मागणी असून, या गोष्टीस आमचा ठाम विरोध राहील. यासाठी सरकारने ओबीसीच्या आरक्षणास धक्का न लावता निर्णय घेणे उचित ठरेल. यावेळी अ‍ॅड. आनंदराव माने, अ‍ॅड. पंडित लोखंडे, डॉ. प्रशांत साबळे, सुधाकर थोरात, के.व्ही. खरे यांनी मागासवर्गीयांच्या मागण्यांबाबत आपले विचार मांडले.

शेतकऱ्याला अखेर मिळाली नुकसानभरपाई!
शहापूर/वार्ताहर :
तालुक्यातील किन्हवली परिसरातील सोगाव येथील शेतकऱ्यांची दुभती म्हैस वीज वितरणच्या खांबाला चिकटून मृत्युमुखी पडली होती. भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे सदर शेतकऱ्याला वीज वितरण कंपनीकडून १२ हजार ४३० रुपयांची भरपाई मिळाली आहे. सोगाव येथील जीवा गणू हरड या शेतकऱ्याची म्हैस माळरानावर चरत असताना वीजप्रवाह खांबात उतरल्याने तिचा चिकटून मृत्यू झाला होता. दुभती म्हैस गेल्याने सदर शेतकरी संकटात सापडला होता. याबाबत जून महिन्यात ‘ठाणे वृत्तान्त’मध्ये वृत्त येताच आ. संजय केळकर यांनी दखल घेतली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे महावितरण कंपनीने जीवा हरड यांना १२ हजार ४३० रुपयांचा धनादेश दिला आहे.