Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणुकीवर डोळा ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प
विरोधकांचे टीकास्त्र
नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी / पी.टी.आय.

 

अंतरिम अर्थसंकल्प लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून सादर करण्यात आला असून मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केला आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. अर्थसंकल्प निराशाजनक असून यात जनसामान्यांशी निगडीत कोणत्याही मुद्यांना स्पर्श करण्यात आलेला नाही, असेही विरोधकांनी म्हटले आहे.
भाजप नेते अरुण जेटली म्हणाले, सत्यमच्या ताळेबंदासारखा हा प्रकार आहे. वस्तुस्थितीचा विचार न करता स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या सरकारने हा पोकळ अर्थसंकल्प सादर करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. अत्यंत गंभीर आर्थिक समस्यांना भारतच नव्हे तर सारे जग तोंड देत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून बेरोजगारीच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाची तर सरकारने दखलही घेतलेली नाही.
भाजपचे विनय कटियार म्हणाले, सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली अनास्था या अर्थसंकल्पाने उघड झाली आहे. माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्या वृंदा करात म्हणाल्या, हा अर्थसंकल्प नसून निवडणूक जाहीरनामा आहे. मंदीचा फटका बसूनही केवळ निवडणूक अर्थसंकल्प सादर करण्याच्या प्रयत्नात या महत्त्वाच्या मुद्याकडे साफ कानाडोळा करण्यात आला आहे.
भाकप नेते गुरुदास दासगुप्ता यांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्यावर संसदेतील पहिले निवडणूक भाषण केल्याची टीका केली. कामत म्हणाले, प्रणव मुखर्जी यांनी जनतेला आश्वासनांचे गाजर दाखवले आहे. आजचे बजेट म्हणजे कोणत्याही वस्तुस्थितीशी संबंध नसलेले ‘इलेक्शन बजेट’ आहे. भारतीय जनतेच्या मूलभूत समस्यांशी युपीए सरकारला काहीही देणेघेणे नसल्याचेच हे द्योतक आहे. काँग्रेसचे निवडणूक चिन्ह पंजा आहे. अर्थमंत्र्यांनी कोणतेही भान न बाळगता याचा उल्लेख अर्थसंकल्पीय भाषणात करण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याची टीका दासगुप्ता यांनी केली.
भाकप नेते डी. राजा म्हणाले, आम जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारा हा अर्थसंकल्प आहे. यात देशाच्या अर्थव्यवस्थेचे कोणतेही चित्र स्पष्ट होत नाही. मुख्य समस्यांना हात घालण्यात आलेला नाही.
राज्यसभा सदस्य व ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनीही अर्थसंकल्पात ठोस असे काहीही नसल्याची नाराजी प्रकट केली. उद्योगक्षेत्र आणि अर्थ क्षेत्राला अर्थसंकल्पाने नैराश्येची भेट दिली आहे.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा म्हणाले, युपीने किमान समान कार्यक्रमात दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता या अर्थसंकल्पाने केलेली नाही.