Leading International Marathi News Daily

मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

व्यक्तिवेध

डॉ. ए. के. तथा अशोककुमार अरोरा यांच्या निधनाने पश्चिम रेल्वेने एक कर्तबगार निवृत्त कर्मचारीच गमावला आहे असे नव्हे, तर दीडशेहून अधिक वर्षांच्या पश्चिम रेल्वेच्या इतिहासाचा डोळस अभ्यासकही गमावला आहे. अरोरा पश्चिम रेल्वेत मोटरमन होते, त्यामुळे प्रत्यक्ष इंजिन चालविण्याशी त्यांचा संबंध होताच, पण चालत्या इंजिनामागचा धावता इतिहासही त्यांना मुखोद्गत होता. तो त्यांनी जसा केवळ नोकरीचा भाग म्हणून जाणून घेतलेला नव्हता, तसाच तो त्यांच्या पीएच.डी.साठीच्या संशोधनाचाही अविभाज्य भाग म्हणून अभ्यासला गेलेला नव्हता; रेल्वे त्यांची सर्वार्थाने जीवनवाहिनी होती, तिच्याविषयीच्या ममत्त्वातून त्यांनी तो अंगिकारलेला होता. अरोरांचा

 

रेल्वेशी संबंध आला तो लहानपणीच. त्यांचे वडील रेल्वेत कॅशियर होते, नोकरीनिमित्ताने ते मुंबईत असत. अरोरा आईबरोबर अजमेरमध्ये रहात. एकुलते एक अपत्य असल्यामुळे लाडावलेपणातून असेल किंवा जात्याच शिक्षणाची आवड नसल्याने असेल, परंतु शालांत परीक्षेत तीनदा अनुत्तीर्ण होण्याची वेळ अरोरांवर आली. चौथ्यांदा परीक्षा द्यायची अरोरांची इच्छा होती, पण वडील तयार नव्हते. ‘अखेरीस एकदाच फी भरा, नापास झालो तर पुढे शिकणार नाही,’ अशी हमी अरोरांनी दिल्यानंतरच वडील फी भरायला तयार झाले. अरोरांनी परीक्षा दिली आणि चौथ्यांदा दिलेल्या परीक्षेत डिस्टिंक्शन मिळवून उत्तीर्ण झाले, गुणवत्ता यादीतही त्यांचा क्रमांक आला. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ७० सालची ती गोष्ट असेल. नालासोपाऱ्याला वडील रहात असत. अरोरा त्यांच्याकडे आले, उल्हासनगरच्या कॉलेजात नाव घातले व रोज नालासोपारा ते उल्हासनगर असा प्रवास सुरू झाला. शिकता शिकता नोकरीही सुरू होती. अरोरा एम.ए. झाले व पीएच.डी.साठीचे संशोधनही झाले. राजपूत-मराठा संबंधांवर अरोरांनी केलेले संशोधन पीएच.डी.साठी स्वीकृतही झाले. १९४७ चा अरोरांचा जन्म. वयाच्या विसाव्या वर्षीच ते अ‍ॅप्रेंटिस मोटरमन म्हणून रेल्वेत नोकरीला लागले. १९७१ पासून स्वतंत्रपणे त्यांनी मोटरमनची कारकीर्द सुरू केली. तब्बल ३१ वर्षांच्या नोकरीनंतर १९९८ मध्ये ते निवृत्त झाले. नोकरीच्याच काळात मिळणारा सगळा वेळ अरोरांनी रेल्वेविषयीच्या संशोधनासाठी खर्च केला. त्यासाठी अफाट वाचन केलं, प्रवास केला. ‘हिस्टरी ऑफ मुंबई सबर्बन रेल्वेज’ (१८५८-१९८५), ‘नेहरू अ‍ॅण्ड इंडियन रेल्वेज’ आणि ‘व्हॉयेज - हिस्टरी ऑफ सीफेर्स मुव्हमेंट इन इंडिया’ (१८९६-१९९६) हे ग्रंथ त्यातून साकारले. अरोरांनी स्वत:च्या ग्रंथांसाठी जसे संशोधन केले तसेच त्यांनी रेल्वेतर्फे प्रसिद्ध होऊ घातलेल्या अन्य अनेक ग्रंथांसाठीही महत्वाचे संदर्भ साहित्य जमा केले. शिवाय पन्नासहून अधिक लेख त्यांनी केवळ रेल्वेवरच लिहिले. रेल्वेच्या नोकरीदरम्यान अरोरांनी युनियनचेही काम केले. त्यानिमित्ताने त्यांना जगभर जाण्याची संधी मिळाली. नॉर्वे, स्वित्र्झलड, अमेरिकेतही ते गेले. एका परिषदेसाठी तुर्कीत गेले असता, तेथील सरकारने त्यांचा शोधनिबंध स्वीकारला. पण त्यावर बोलण्यासाठी सरकारने परवानगी नाकारली. अरोरा बोलत फर्डे. त्यांचे वक्तृत्व केवळ घणाघाती नव्हते तर चक्क हृदयाला हात घालणारे, भावना चेतविणारे असे. पत्रमैत्री हा अरोरांचा आवडीचा छंद. भारतातल्या भारतात जवळपास ३७५ जणांशी त्यांनी पत्रमैत्री केली. ते एक जागतिक रेकॉर्ड ठरले. लिम्का बुकनेही त्यांची नोंद घेतली. इतिहासाशी अरोरांचे मैत्र इतके की त्यांनी मस्तानीवरही लेखन, संशोधन केले आणि एका आगामी चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांच्या संशोधनाची दखलही घेतली गेली. ‘गांधी’ सिनेमाच्या निर्मितीसाठी रिचर्ड अटेन्बरो भारतात आले असताना त्यातल्या रेल्वेविषयक संदर्भासाठी त्यांनी मदत घेतली ती अरोरांची. स्वत: अटेन्बरो १५ दिवस सांताक्रुझला अरोरांच्या घरी तळ ठोकून होते. अशा साऱ्या संदर्भासाठी अरोरांनी कधीही ना कुणाकडून नवा पैसा घेतला, ना श्रेय. अरोरांनी निवृत्तीनंतरच्या आयुष्यात अनेक लोकोपयोगी कामांमध्ये सहभाग घेतला, संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत केली, पुस्तके घेऊन दिली, लेखन तर सुरूच राहिले. त्यांच्या अप्रकाशित साहित्याला प्रकाश लाभावा, आणि रेल्वेचा इतिहास सर्वापुढे यावा हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.