Leading International Marathi News Daily

मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

विविध

वीरेंद्रकुमार यांच्यामुळे स्मरणात राहणारा प्रणवदांचा अंतरिम अर्थसंकल्प
नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

हंगामी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज लोकसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेल्या हाताचा उल्लेख वगळता चमकदार काहीच नव्हते. देवेगौडांच्या पक्षाचे कालिकतचे खासदार एम. पी. वीरेंद्रकुमार यांना अचानक छातीत दुखू लागल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागल्यामुळे प्रणवदांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प कायमचा स्मरणात राहील.

अवकाश कचऱ्यापासून सावध राहण्याचा विमानचालकांना इशारा
न्यूयॉर्क, १६ फेब्रुवारी/पीटीआय

अमेरिका व रशिया यांच्या अवकाशात नुकत्याच टक्कर झालेल्या दोन उपग्रहांचे अवशेष कोसळण्याची शक्यता असून त्यामुळे विमानांनाही हानी पोहोचण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जगभरातील विमान कंपन्यांच्या पायलटना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर सावधानतेने उड्डाण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

‘तालिबान हा भारत-अमेरिका व पाकिस्तानचा समान शत्रू '
नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी / पी. टी. आय.

भारत-अमेरिका व पाकिस्तान या तीनही देशांचा तालिबान हा समान शत्रू असल्याचे अमेरिकेचे विशेष दूत रिचर्ड होलब्रुक यांनी आज येथे सांगितले. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे विशेष दूत असलेले होलब्रुक यांनी आज येथे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन आणि परराष्ट्र सचिव शीवशंकर मेनन यांची भेट घेतली. या उपखंडात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी भारतीय नेत्यांची मते त्यांनी समजावून घेतली आणि आपल्या भेटीचे प्रयोजन विषद केले.

चिनी अभियंत्याच्या बदल्यात सोडले डझनभर तालिबान्यांना!
इस्लामाबाद, १६ फेब्रुवारी/पी.टी.आय.

तालिबान अतिरेक्यांनी अपहृत केलेल्या एका चिनी अभियंत्याची सुटका करण्यासाठी पाकिस्तानने तब्बल डझनभर तालिबान्यांना तुरुंगातून सोडून दिले आहे. तालिबान्यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी या अभियंत्याचे अपहरण केले होते. या साऱ्या नाटय़ाबद्दल पाकिस्तानातील सरकारी यंत्रणांची आळीमिळी गुपचिळी असली तर ‘द न्यूज’ या वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने द न्यूजने हे वृत्त दिले आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी लवकरच चीनच्या भेटीवर जाणार आहेत. त्यांच्या या भेटीआधी या अभियंत्याची मुक्तता व्हावी यासाठी सरकारी यंत्रणांनी कंबर कसली होती. आता झरदारी या अभियंत्याला सोबत घेऊनच चीनला जातील आणि चीनला ही ‘भेट’ सादर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बसपा आमदाराच्या खुन्याला अटक
अलाहाबाद, १६ फेब्रुवारी / पी. टी. आय.

बसपाचे आमदार राजू पाल याच्या खुनी कॉन्ट्रॅक्ट किलर गुरफान याला अलाहाबाद पोलिसांनी अटक केली. तुरुंगात असलेला खासदार अतिक अहमद याच्या टोळीतील शार्प शूटर गुरफान हा अलाहाबाद शहरातून निसटून जात असता पोलिसांनी त्याला काल सायंकाळी पकडले. त्याच्याकडून एक रायफलही जप्त करण्यात आली आहे. शहागंजच्या पोलीस ठाण्याचे एक अधिकारी एन. एस. परिहार यांनी सांगितले, की गुरफान हा पोलिसांना अनेक गुन्ह्य़ांत हवा होता. गुरफान आणि खासदार अतिक अहमद याचा भाऊ खालिद आझिम ऊर्फ अश्रफ हे दोघे राजू पाल यांच्या हत्या कटातील मुख्य आरोपी होते. २५ जानेवारी २००५ रोजी आमदार पाल हे आपल्या घरी जात असता त्यांच्यावर गुरफान याने गोळीबार केला, त्यात पाल यांचा मृत्यू झाला.

तामिळ वाघांनी शस्त्रे खाली ठेवल्यास भारत हस्तक्षेप करील - चिदम्बरम
चेन्नई, १६ फेब्रुवारी/पी.टी.आय.

श्रीलंकेतील धुमश्चक्री थांबवायची असेल तर प्रथम तामिळ वाघांनी शस्त्रे खाली ठेवावीत. मग भारत तेथे हस्तक्षेप करील, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी येथे केले.
काँग्रेस पक्षातर्फे या विषयावर काल सायंकाळी एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत बोलताना चिदम्बरम म्हणाले की, आमची (काँग्रेसची) भूमिका स्पष्ट आहे. एलटीटीई ही सशस्त्र अतिरेकी संघटना आहे. आपण शस्त्रे खाली ठेवून चर्चा करण्यास तयार आहोत, असे त्यांनी जाहीर केले पाहिजे. त्याच वेळी श्रीलंकेच्या सरकारनेही आपले लष्करी आक्रमण थांबविले पाहिजे.
तामिळ वाघांनी शस्त्रे खाली ठेवली आणि चर्चेची तयारी दाखविली तर भारत सरकार निश्चितपणे तामिळ वाघ आणि श्रीलंका सरकार यांच्यात संवाद साधण्यासाठी प्रयत्न करील, असे त्यांनी स्पष्ट केले. श्रीलंकेतील सुमारे ४० लाख तामिळ भाषकांसाठी एखादा चांगला उपाय निघू शकेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

दार्जिलिंगमध्ये जाळपोळ
सिलिगुडी, १६ फेब्रुवारी / पी. टी. आय.

अखिल भारतीय गोरखा लीगचे प्रमुख मदन तामांग यांच्या दोन मोटारी काल काही अज्ञात लोकांनी जाळून टाकल्या. पोलीस अधीक्षक राहुल श्रीवास्तव यांनी सांगितले, की लादेनला रोड भागात काल रात्री झालेल्या जाळपोळीच्या घटनेत अ. भा. गोरखा लीगच्या कार्यालयासमोर असलेल्या पक्षाच्या दोन मोटारींना जमावाने आग लावली.