Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

अलोट गर्दी, कलाकारांची वानवा अन् राजकारण्यांचं वर्चस्व!
बीडसारख्या पायाभूत सोयीसुविधांचा अभाव असलेल्या गावात अ. भा. मराठी नाटय़संमेलनासारख्या प्रचंड खर्चिक व जबरदस्त संघटनकौशल्याची मागणी करणाऱ्या भव्यदिव्य सोहळ्याचं आयोजन करायचं; तेही सर्व प्रकारच्या कमतरतांवर मात करून- हे शिवधनुष्य पेलण्याइतकंच महाकर्मकठीण काम! परंतु बीडचं राजकारण तसंच समाजकारणात एक बडं प्रस्थ असलेल्या क्षीरसागर कुटुंबीयांनी हे आव्हान स्वीकारून ते कमालीच्या पल्याड यशस्वी करून दाखवलं. इतकंच नव्हे, तर ‘आजवरचं सर्वात आदर्श, दृष्ट लागण्याजोगं आणि देखणं संमेलन’ अशी खुली दाद ऊर्जामंत्री सुनील तटकरे आणि नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह उपस्थित रसिकांकडून मिळविली आणि आपल्या कार्यक्षमतेची पावती संमेलनातच वसूल केली. त्याचवेळी, ‘आगामी निवडणुकीत संमेलनाचे स्वागताध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्यावर राजकीय जबाबदारी सोपविल्यास ते तीही यशस्वीरीत्या पार पाडतील,’ अशी भलामण दस्तुरखुद्द विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांनीच केल्यानं संमेलनाच्या आयोजनामागील त्यांचा अंतस्थ हेतूही साध्य झाला. ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनीही मग मुंडे यांच्या या विधानावर त्यांना कात्रीत पकडून, ‘मुंडे यांनी याकामी क्षीरसागर यांना योग्य ते ‘सहकार्य’ करावं,’ असं जाहीर आवाहन केलं. या सर्व ‘शुभशकुनी’ घटनांमुळे संमेलन घेण्यामागील आपलं ईप्सित साध्य झाल्यानं क्षीरसागर कुटुंबही खूश झालं नसतं तरच नवल!

‘पोलर विज्ञान’ आणि भारत
हंगामी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी सादर केलेल्या अंतरीम अर्थसंकल्पात ‘पोलर विज्ञान संशोधना’साठी भरीव तरतूद केली आहे. यामुळे गेली अडीच दशकांहून अधिक काळ या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना दिलासा मिळाला आहे.
‘पोलर विज्ञान संशोधन’ म्हणजे ‘ध्रूव विज्ञान संशोधन’. म्हणजे नेमके काय? असा अनेकांना प्रश्न पडेल. ‘पोलर विज्ञान संशोधन’ हे ध्रूवांवर राहून केलेला अभ्यास होय. दक्षिण ध्रूवावरिल अंटार्टीका खंडात या विषयावर जोरदार संशोधन सुरु आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या संशोधनात भारताने खारीचा वाटा उचलला आहे. दिवसें दिवस वातावरणात होत जाणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी दक्षिण ध्रूवावर ‘पोलर विज्ञान संशोधन केंद्र’ उभारण्यात आले आहे. या ठीकाणी भारतातचे ‘मैत्री’ नावाचे संशोधन केंद्र आहे. हे केंद्र गोवा येथील ‘नॅशनल सेंटर फॉर अंटाक्र्टीक अॅण्ड ओशन रिसर्च’ येथून नियंत्रित केले जाते. ‘मैत्री’ या केंद्राची स्थापना १९८९ मध्ये झाली असून यापूर्वी १९८३ ते १९८९ या काळात ‘दक्षिण गंगोत्री’ या नावाचे ‘पोलर विज्ञान संशोधन’ केंद्र या भागात कार्यरत होते. १९८१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या प्रकल्पात भारताचा सहभाग निश्चित केला होता. ‘पोलर विज्ञान संशोधन’ प्रकल्प अंटाक्र्टीकरिसर्च प्रकल्प म्हणूनही ओळखला जातो. या संशोधनामध्ये भारताबरोबरच संयुक्त राष्टे, जर्मनी, इटली, फ्रान्स हे देश देखिल सहभागी आहेत.
पूर्व अंटार्टीकामध्ये असलेल्या भारताच्या ‘मैत्री’ या केंद्र विविध देशांतील १५०० वैज्ञानिक, तंत्रज्ञ ‘पोलर विज्ञान संशोधन’ चा अभ्यास करण्यासाठीचे व्यासपीठ ठरले आहे. गोवा येथील ‘नॅशनल सेंटर फॉर अंटाक्र्टीकअॅण्ड ओशन रिसर्च’ ही देशातील एकमेव अशी संस्था आहे की जी पूर्ण वेळ अंटार्टीका संशोधन कार्यासाठी कार्यरत आहे. येथे ७८७ वैज्ञानिक, तंत्रज्ञ अंटाक्र्टीकप्रांतातील ग्रीन हाऊस, टेली सिमिक, मैत्री मधील कायम स्वरुपी जीपीएस टॅकिंग सिस्टीम, क्रेक प्रोपेगेशन ऑफ आइस शीट आदी प्रकल्पांवर नियंत्रण करण्यासाठी काम करत असतात. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे डिसेंबर २००५ मध्ये भारताच्या पुढाकाराने दक्षिण ध्रूवाकडील महासागरात सोडण्यात आलेली ‘ओराव्ही सागरकन्या’ ही संशोधन नौका. या नौकेमध्ये दोन विद्यार्थी आणि एक वैज्ञानिक यांच्या सहाय्याने विशेष संशोधन केंद्र सुरु करण्यात आले आहे. ‘पोलर विज्ञान संशोधन’ केंद्रांमध्ये गेल्या अडीच दशकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण संशोधन पूर्ण झाले आहेत तर अनेक संशोधनांवर अभ्यास सुरु आहे. येथील ‘ओशन ऑब्झर्वेशन अॅण्ड इन्फॉरमेशन सव्र्हिसे’ अंतर्गत वातावरणातील बदल, सागरी वातावरण आदी विषयांचा अभ्यास केला जातो. दक्षिण ध्रूवावरील भौगोलिक परिस्थिती या अभ्यासासाठी अनुकूल असल्याने वैज्ञानिकांना तेथे विविध प्रयोग करणे सोपे जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या भागांतर्गत वैज्ञानिकांनी महासागरातील वातातवणाचा अभ्यास करणारे मोठय़ा स्वरुपातील कोस्टल मॉडेल तयार करण्यात आले आहे. उपग्रहांच्या रेडीएशनचा प्रभाव कमी होण्यसाठी एक विशिष्ट प्रकारचे अल्गॉरीदम तयार करण्यात आले असून महासागरातील सामान्य वावरांबाबत माहिती देणारी सेवाही या विभागातर्फे सुरु करण्यात आली आहे. या शिवाय येथे कार्यरत असलेल्या विविध विभागांतर्फे अनेकविध नवीन संशोधनांचा अभ्यास सुरु आहे. या संशोधनात मुख्यत :वातावरणातील बदल, समुद्री मार्गे होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती नियंत्रण या विषयांचा प्रामुख्याने समावेश आहे. २००७-२००८ हे वर्ष ‘पोलर विज्ञान संशोधन’ वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. या वर्षांत सर्व सहभागी देशांकडून या प्रकल्पाला भरीव हातभार लावण्यात आला आहे. या प्रकल्पात येत असलेल्या नव्या माहितीच्या आधाऱ्या आपण नवे तंत्रज्ञान विकसित करुन येत्या काळात भेडसावणाऱ्या समुद्राच्या प्रदुषणावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.
येत्या काळात उत्तर ध्रूवावरील आर्टीक खंडातही अशा प्रकारचे विज्ञान केंद्र उभारण्यात येणार असल्याचे भारतीय भू विज्ञान केंद्रातर्फे संगण्यात आले होते. उत्तर ध्रूवावरील वातावरण आणि भारतात पडणारा पाऊस यांच्यात हवामान शास्त्रानुसार जवळचा संबंध असल्याने येथील ‘पोलर विज्ञान संशोधन’ केंद्र भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. या बाबींचा विचार करुन २००८च्या अखेरीत आर्टीक प्रांतात ‘हिमाद्री’ नावाचे ‘पोलर विज्ञान संशोधन’ केंद्र सुरु करण्यात आले आहे. भारताचे हे पहिले स्वतंत्र ‘पोलर विज्ञान संशोधन’ केंद्र ठरले आहे. ‘पोलर विज्ञान संशोधन’ हे भू विज्ञान क्षेत्रातील मोठी क्रांती ठरली असून येत्या काळात त्या संशोधनाचा दैनंदिन जीवनातही फायदा होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नीरज पंडित
nirajpandit@in.com