Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

लोकमानस

तुकोबा हे ‘मानव’ आणि ‘देव’ यामधील सेतू

 

महाबळेश्वर येथे होणाऱ्या आगामी मराठी साहित्य संमेलनाचे निर्वाचित अध्यक्ष आनंद यादव यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीत तुकोबांविषयी प्रसिद्ध झालेल्या काही मजकुरावरून सांप्रत साहित्यसृष्टी आणि वारकरी समुदायामध्ये वादाचे मोहोळ उठले आहे. कादंबरीच्या पूर्व भागात असलेला हा मजकूर मी वाचला. तुकोबा आपले किराणा मालाचे दुकान सांभाळीत असताना तीन मुलींशी त्यांचे वागणे थोडे सलगीचे असे, असे आनंद यादव यांनी लिहिले आहे. ‘साहित्यनिर्मितीच्या आधुनिक मापदंडानुसार हे लिखाण झाले,’ असे आनंद यादव यांचे या बाबतीत मत असल्याचे कळले.
खरे म्हणजे तुकोबांच्या काळात मुलींची लग्ने लहान वयातच होत असत. मुली ‘मोठय़ा’ होताना सासरी असत आणि त्या काळात कोणाही सासुरवाशिणीशी सुसंस्कृत घराण्यातील मुलगा असा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नही करणार नाही, हे ध्यानी घेतले पाहिजे. ‘तुकोबांची पत्नी रखमा ही न्हातीधुती झाल्यानंतर तिचे लग्न झाले,’ असे यादव सांगतात. तेही पटणारे नाही; पण या लिखाणाबद्दल आनंद यादव यांनी जाहीर माफी मागितली आहे. कादंबरीच्या सर्व प्रती बाजारातून मागे घेतल्या आहेत, पुढील आवृत्तींचे मुद्रण थांबविले आहे. तेव्हा आता वारकरी मंडळींनी आनंद यादवांनी संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असा धरलेला आग्रह अनाठायी वाटतो.
बालवयात माणसाच्या वागण्यात औत्सुक्यापोटी, तसेच तारुण्याची चाहूल लागल्याने असे वागणे संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुकोबा प्रापंचिक होते, त्यांना मुलेबाळे होती. वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांचे वैकुंठगमन झाले, त्या वेळी त्यांची पत्नी जिजाऊ ही गरोदर होती, असाही उल्लेख सापडतो.
तुकोबा हे ‘मानव’ आणि ‘देव’ यामधील सेतू आहेत. म्हणूनच आपल्याला ते आदर्श आणि जगद्गुरू म्हणून भावतात, जवळचे वाटतात. शिवाय वारकरी सांप्रदाय ज्या विठुरायाचे भक्तिभावनेने भजन, पूजन, चिंतन करतो तो विठुराया म्हणजे भगवान श्रीकृष्णाचेच एक रूप होय आणि यादव कुलभूषण ‘आनंदा’चा कंद देवकीनंदन हा बालवयापासूनच ज्या लीला करीत होता, त्या संतांनी लिहिलेल्या गवळणींमधून आळवणाऱ्या वारकरी बंधूंना अधिक काय सांगावे?
म्हणूनच संतसाहित्याचा एक अभ्यासक, साहित्यसंस्कृती या क्षेत्रातील एक कार्यकर्ता शिवाय एक वडीलधारा महाराष्ट्राभिमानी अशा विविध नात्यांनी मी समस्त वारकरी फडांच्या प्रमुखांना हात जोडून नम्रपणे एक विनंती करू इच्छितो, की आनंद यादव यांनी तुमची माफी मागितली आहे, कादंबरीचे प्रकाशन थांबविले आहे, एवढय़ावर संतुष्ट व्हा आणि त्यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे, या आग्रहाची तलवार म्यान करा.
ताटीच्या अभंगात मुक्ताबाईंनी, ‘विश्व रागें झालें वन्ही। संतें सुखें व्हावें पाणी। शब्दशस्त्रें झाले क्लेश। संतीं मानावा उपदेश।’ असे म्हटले आहे. ‘दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती’ आणि ‘दया क्षमा ज्याचें अंगी। तोचि साधु जाणारा जगी’, असे खुद्द तुकोबांनी म्हटले आहे. तुकोबा, विठुराया आणि मुळात साहित्यिक असलेले सर्व संत यांना स्मरून, वारकऱ्यांनी अधिक ताणू नये, एवढेच सांगावयाचे आहे.
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर, दादर, मुंबई

सर्वोच्च न्यायालयाचा स्वागतार्ह निर्णय
रॅगिंग रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या शिक्षणसंस्थांची मान्यता रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊन एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांत देऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी न्यायालयाने शिक्षणसंस्थांवर टाकली; त्यामुळे महाविद्यालयांत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च नक्कीच दिलासा मिळेल.
दरवर्षी देशभरात हजारो विद्यार्थ्यांना ‘रॅगिंग’ नावाच्या विकृतीला सामोरे जावे लागत आहे. अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याची झळ अधिक पोहोचते. जुन्या विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांवर दाखवलेल्या या दडपशाहीचा परिणाम मानसिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांवर चटकन होतो. हेच विद्यार्थी मग मानसिक विकाराचे बळी होतात, आत्मविश्वास गमावतात, रॅगिंगच्या नावाखाली जो अत्याचार होतो, तो आयुष्यभर यांच्या मनात घर करून राहतो. यातूनच काही जण आत्महत्येला प्रवृत्त होतात.
शहरांतच नव्हे तर ग्रामीण भागातही रॅगिंगचे प्रमाण लक्षणीय आहे. आपल्या महाविद्यालयांत हे प्रकार चालतात याची कल्पना असूनही बरीचशी महाविद्यालये याकडे काणा डोळा करताना दिसतात. सर्वोच्च न्यायालयाने टाकलेल्या जबाबदारीमुळे आता गुंड विद्यार्थ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याशिवाय शिक्षणसंस्थांना गत्यंतर नाही.
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई

गौतम गंभीर : गावसकरची प्रतिकृती!!
कारकीर्दीच्या सुरुवातीस केवळ आक्रमक फलंदाजीमुळे भारतीय क्रिकेट संघाच्या आत-बाहेर असणाऱ्या गौतम गंभीरने नंतर आक्रमण व बचावाचे संतुलन साधत संघातील स्थान पक्के तर केलेच; पण आतापर्यंत त्याने २२ कसोटी सामन्यांत ४९.२७ सरासरीने चार शतके व नऊ अर्धशतकांसह १,८३४ धावा केल्या आहेत. शेवटच्या चार कसोटीत तर त्याने तीन शतके व तीन अर्धशतकांसह तब्बल ९७ धावांच्या सरासरी ७७४ धावा ठोकल्या! एवढय़ाच धावा सुनील गावसकरने त्याच्या पहिल्या चार कसोटी सामन्यांत चार शतके व तीन अर्धशतकांसह १५४ सरासरीने काढल्या होत्या!
मात्र गंभीरच्या धावा तुलनात्मक दृष्टय़ा दर्जेदार गोलंदाज ली-जॉन्सन-फ्लिन्टॉफ-अँडरसन-पानेसर-स्वान हे समोर असताना केल्या गेल्या, तर गावसकरने अशा धावा या डोव्ह-शिलिंगफोर्ड-बॉइस या सुमार दर्जाच्या व इन्शानअली-नोरिगा या नवख्यांच्या फिरकीसमोर केल्या होत्या. अपवाद फक्त गिब्ज-सोबर्सचाच! (यात गावसकरला कमी लेखण्याचा मुळीच हेतू नाही.)
मात्र गावसकरची धडाकेबाज रितीने सुरू झालेली कसोटी कारकीर्द वेगाने घसरली व त्याला नंतरच्या १३ कसोटी सामन्यांत फक्त एक शतक काढता आले. ते फक्त २७ सरासरीनेच त्याला ६९३ धावाच काढता आल्या. त्याची तोपर्यंत १५४ वरून सरासरी घसरत फक्त ४८ वरच आली व ती पुढे अजून २० कसोटय़ांपर्यंत अशीच होती. मग मात्र त्याने पुन्हा धडाक्याने शतके व धावा काढल्या व ५०व्या कसोटीअखेर त्याची कारकीर्द ४,९४७ धावा २० शतके व सरासरी गेली चक्क ५७.५२ वर! येथून पुढे त्याची सरासरी कधीही पन्नासच्या आत आली नाही. त्याच्या कारकीर्दीच्या शेवटची आकडेवारी अशी- १२५ कसोटी, १०,१२२ धावा, सरासरी ५१.१२, ३४ शतके, ४५ अर्धशतके, १०५ झेल. गंभीरचा आताचा फॉर्म पाहता तो सुनील गावसकरची बरोबरी करणे शक्य वाटते. त्यासाठी त्याला सातत्याने खेळावे लागेल.
बी. एस. तोषनीवाल, औरंगाबाद