Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

लोकोत्सवात हेलिकॉप्टरमधून शाहूंच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी
करवीरनगरी शाहूमय
कोल्हापूर, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

पुरोगामी विचारांचा आणि सामाजिक न्यायाचा समृद्ध वारसा मागे ठेवून गेलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण नवी दिल्ली येथील लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेल्या संसदेच्या प्रांगणात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या हस्ते होत असताना छत्रपती शाहू महाराजांच्या कर्मभूमीत आज आनंद आणि उत्साहाला उधाण आले होते. अवघे कोल्हापूर शाहूमय झाले होते. भव्य शोभायात्रा, हेलिकॉप्टरमधून दसरा चौकातील शाहूंच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी आणि शाहूंच्या जयघोषात तमाम करवीरवासीयांनी समतेच्या या राजाला आज अभिवादन केले. खऱ्या अर्थाने आज कोल्हापुरात लोकोत्सवच साजरा करण्यात आला.

धर्म व जात न मानणारी मानवताच श्रेष्ठ- धर्माधिकारी
कोल्हापूर, १७ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी

धर्म आणि जात यांना न मानणारी मानवता हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. या मूल्याचीच भारतवर्षांला गरज असून राष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने या मूल्याचे आचरण केले पाहिजे, असे आवाहन देशविदेशातील लाखो श्री-सदस्य बैठकीचे प्रेरणादाते निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी येथे केले. सुराज्य फौंडेशनच्या वतीने येथील उजळाईवाडी विमानतळानजीक भव्य पटांगणावर मंगळवारी दुपारी निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना फौंडेशनचा पहिला गौरव पुरस्कार राज्याचे अपारंपरिक ऊर्जामंत्री व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

सोलापुरातून पहिले विमान झेपावले..
सोलापूर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

किंगफिशर एअरलाईन्सच्या माध्यमातून मंगळवारपासून मुंबई-सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाली असून, पहिल्या दिवशी मुंबईहून १९ प्रवाशांना घेऊन हे विमान सोलापुरात नियोजित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिरा आले. नंतर हेच विमान येथून तब्बल ५५ प्रवासी घेऊन २५ मिनिटे उशिरा मुंबईकडे झेपावले. मात्र या आनंदाच्या प्रसंगी तैनात केलेल्या सुरक्षाव्यवस्थेचा अतिरेक होऊन त्याचा फटका प्रसारमाध्यमांसह अनेकांना बसला.

देश हा एकच धर्म ठेवा
नाना पाटेकर यांचे कळकळीचे आवाहन

कोल्हापूर, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

समाजात घडणाऱ्या प्रत्येक बऱ्यावाईट गोष्टीबद्दल ‘मला काय त्याचे’ अशीच तुमची आणि माझीसुध्दा प्रतिक्रिया असेल तर इथे चांगले काही घडणार नाही. एक दिवस इथे सारे काही सामसूम असेल. हे असे काही वाईट, अप्रिय घडू द्यायचे नसेल तर प्रत्येकाने आपला धर्म घरात चौकटीच्या आत ठेवावा. देश हा एकच धर्म ठेवावा असे कळकळीचे आवाहन सुप्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांनी आज सायंकाळी िबदू चौकात केले. निमित्त होते केंट क्लब हॉलिडे रिसॉर्टच्या वतीने माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी आयोजित केलेल्या एका हळव्या कार्यक्रमाचे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त कराड तालुक्यात कडक बंदोबस्त
कराड, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा येत्या गुरुवारी (दि. १९) कराड, विद्यानगर (सैदापूर) रेठरे बुद्रुक व उंडाळे असा नियोजित दौरा असून, या पाश्र्वभूमीवर कराड तालुक्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या प्रवास मार्गावरील दुरुस्ती व सुशोभीकरण पूर्णत्वाकडे असून, आजअखेर सुमारे दीड हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.राष्ट्रपतींच्या प्रवास मार्गावर स्वागत कमानी उभारल्या जात आहेत. या मार्गावरील हातगाडे, खाद्य पदार्थाच्या छोटय़ा व्यावसायिकांसह सर्वाना हटविण्यात आले आहे. बंदोबस्तासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. त्यात एक पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, १३ पोलीस निरीक्षक, ३८ सहायक पोलीस निरीक्षक व फौजदार या अधिकाऱ्यांसह ट्रॅकिंग फोर्सही तैनात आहेत. केंद्रीय गुप्तचर विभाग, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, तसेच राज्य गुप्तचर व गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारीही दाखल झाल्याचे समजते. दरम्यान राष्ट्रपतींच्या कार्यक्रमस्थळांना पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

वीरशैव कक्कय्या ढोर समाजातर्फे मे मध्ये सामूहिक विवाह
सोलापूर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी
वीरशैव कक्कय्या ढोर समाजाच्या वतीने येत्या २१ मे रोजी समाजातील गरीब वधू-वरांच्या सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सामुदायिक विवाह मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र होटकर आणि उपाध्यक्ष महांकाळेश्वर शिंदे यांनी दिली. या सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्त काँग्रेस भवनासमोरील धवल एसटीडी सेंटर येथे विवाह नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन जाई-जुई विचार मंचच्या संस्थापिका कु. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते आणि प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सुधीर खरटमल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी शिवाजी नारायणकर, विजयकुमार सदाफुले, मुन्ना कटके, सावित्री नारायणकर, जेटिंगा जोगदनकर, केशव इंगळे, प्रवीण सोनवणे, डॉ. व्ही. एन. धडके, अ‍ॅड. वंदना होटकर, विकास कांबळे आदींची उपस्थिती होती.

सोलापुरात आजपासून प्राणायाम व योग शिबिर
सोलापूर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय प्रार्थनायोग मंडळाच्या सोलापूर शाखेतर्फे श्री कुमारस्वामीजी जन्मशताब्दीनिमित्त येत्या १८ ते २३ फेब्रुवारीपर्यंत मोफत प्राणायाम व योग शिबिर तसेच मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विजापूर रस्त्यावरील इंदिरानगर येथील योगविहारात गेल्या १५ ऑगस्ट २००८ ते १५ ऑगस्ट २००९ पर्यंत वर्षभर श्री कुमारस्वामीजींचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यातीलच एका उपक्रमानुसार येत्या १८ ते २३ फेब्रुवारीपर्यंत दररोज पहाटे साडेपाच वाजता पतंजली योगपीठाच्या सुधा अळ्ळीमोरे यांच्या नेतृत्वाखाली प्राणायाम शिबिर आयोजिले आहे. त्याचप्रमाणे डॉ.सतीश मगाई यांच्या नेतृत्वाखाली मधुमेह तपासणी करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ यांनी पत्रकारांना सांगितले. या पत्रकार परिषदेस बाबासाहेब कुलकर्णी, नीलकंठप्पा कोनापुरे, शंकरराव धरणे हे उपस्थित होते.

दोन मोटारसायकलींची टक्कर होऊन एक ठार
जत, १७ फेब्रुवारी / वार्ताहर

दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण ठार, दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना अपघातात तानाजी शिवाजी नाईक (वय ३५) हे जागीच ठार झाले. जत तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाकडे काम करणारे तानाजी नाईक हे (क्रमांक केए २३- एस ४७६९) या बजाज तर भानुदास बाळासाहेब कोळी (वय २८, रा. खलाटी, ता. जत) व कमाल कासीम शेख (वय ३२, रा. साळमाळगेवाडी, ता. जत) हे दोघेजण (क्रमांक एमएच १०- एके ५७९५) या हिरोहोंडा मोटारसायकलवरून डफळापूरकडे निघाले होते.

भ्रष्टाचारविरोधी सदस्यावर खंडणी मागणीबद्दल गुन्हा
कागल, १७ फेब्रुवारी / वार्ताहर

माहिती अधिकाराद्वारे माहिती मागवून ३० हजारांची खंडणी मागणाऱ्या अण्णा हजारे भ्रष्टाचार समितीचे कागलमधील सदस्य संजय दिनकर गाडेकर यांच्या विरोधात कागल पोलिसांत फिर्याद दाखल झाली असून पोलिसांनी गाडेकर यास अटक केली आहे. शिवाजी चौकातील मंडईजवळ रामचंद्र शामराव मगर यांनी इमारत बांधली आहे. सदरची इमारत बांधकाम अतिरिक्त आहे व त्याबद्दल शेजाऱ्यांच्या तक्रारी आहेत असे मगर यांना सांगून गाडेकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवली व त्यांच्याकडून ३० हजार रुपयांची खंडणी मांगितली. न दिल्यास इमारतीची व घराची वाट लावतो अशी धमकी दिल्याची फिर्याद रामचंद्र मगर यांनी कागल पोलिसांत दिली आहे. दरम्यान अण्णा हजारे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष नारायण पोवार यांच्याशी संपर्क साधला असता संजय गाडेकर हे आमच्या समितीचे सदस्य नाहीत त्यामुळे अण्णा हजारे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या नावाचा गैरफायदा उचलत असतील तर खपवून घेतले जाणार नाही. गाडेकर हे सदस्य नसल्याने समितीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे सांगितले.

राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी वाळव्यात जय्यत तयारी
आष्टा, १७ फेब्रुवारी / वार्ताहर

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमानिमित्त प्रथमच गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी वाळवा तालुक्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या स्वागताची वैभव नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा उद्योग समूहाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्र व राज्य गुप्तचर विभागाचे अधिकारीही दाखल झाले आहेत.
गुरुवार दि. १९ रोजी दुपारी अडीच वाजता प्रतिभाताई पाटील यांचे आगमन होणार आहे. त्यांच्यासमवेत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री जयंत पाटील, महसूल तथा पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांच्यासह राज्यातील विविध खात्याचे मंत्री, खासदार, आमदार व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

‘लक्ष्मी-विष्णू’ कामगारांना १८ महिन्यांचा पगार मिळणार?
सोलापूर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

तेरा वर्षांपूर्वी बंद पडलेल्या लक्ष्मी-विष्णू कापड गिरणीच्या कामगारांना १८ महिन्यांचा पगार अदा करण्याबाबत नवी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री शंकरसिंग वाघेला यांनी सकारात्मक आदेश दिल्याचे इंटकप्रणीत राष्ट्रीय गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष मोहन सोनवणे यांनी कळविले आहे.इंटकच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीत पवार यांची भेट घेऊन सोलापूरच्या लक्ष्मी-विष्णू कापड गिरणीसह नरसिंग गिरजी कापड गिरणी, तसेच सोलापूर व यशवंत सहकारी सूत गिरण्यांच्या हजारो बेकार कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली. त्यानंतर पवार यांनी लगेचच वस्त्रोद्योगमंत्री वाघेला यांच्याशी संपर्क साधून बैठक घडवून आणली. केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडून कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर लक्ष्मी-विष्णू गिरणीच्या कामगारांना १८ महिन्यांचा पगार अदा करण्याची प्रक्रिया मार्गी लावण्याचे आदेश वाघेला यांनी दिल्याचे इंटकचे अध्यक्ष सोनवणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. शिष्टमंडळात इंटकचे सरचिटणीस चंद्रकांत सुरवसे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, भीम किल्लेदार, जंगलप्पा मॅकल, श्याम गांगुर्डे, अरुण भोसले, सिकंदर गोलंदाज, राजाराम पवार, झांबरे बुवा आदींचा समावेश होता.

संगमनगर धक्का येथील पुलासाठी ७५ लाख रुपये मंजूर
कराड, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

पाटण तालुक्यातील संगमनगर धक्का येथे लहान पूल बांधण्यासाठी ७५ लाख, तर कोयनानगर-मोरगिरी ते पापर्डे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली.केंद्र शासनाने सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे सदरचा निधी वर्ग केला असून, या दोन्ही कामांमुळे पावसाळय़ात या विभागातील जनतेची मोठी गैरसोय टळणार आहे. याकामी जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. पाटण तालुक्यातील जनतेकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचे आभार मानले जात आहेत.

बाळासाहेब दंडिले जि. प. गटाचे विभागप्रमुख
फलटण, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

फलटण पूर्व भागातील बाळासाहेब ऊर्फ शिवाजीराव दंडिले यांची गुणवरे जिल्हा परिषद गटासाठी शिवसेनेच्या विभागप्रमुखपदी जिल्हाप्रमुख विकास राऊत यांनी पत्रकाद्वारे नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल दंडिले यांचे माजी आ. बाबुराव माने, जिल्हाप्रमुख विकास राऊत, फलटण तालुका शिवसेनाप्रमुख अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी अभिनंदन केले आहे.