Leading International Marathi News Daily                               बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

किमती कमी करा
‘म्हाडा’च्या विरोधात जनहित याचिका
मुंबई, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

‘म्हाडा’ने विविध उत्पन्न गटांसाठी सध्या विक्रीस काढलेल्या मुंबईतील ३,८६३ घरांच्या किंमती बांधकाम खर्चाच्या तुलनेत अव्वाच्या सव्वा आणि खरोखरच ज्यांना घरे नाहीत अशा कोणत्याही उत्पन्न गटातील व्यक्तीच्या आवाक्याच्या बाहेरच्या असल्याने ‘म्हाडा’ला या घरांच्या किमती कमी करण्याचा आदेश द्यावा, यासाठी एक जनहित याचिका आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली. चांदिवली-पवई येथील ‘म्हाडा’ कॉलनीमधील निवासी इमारतींच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या महासंघातर्फे त्यांचे चिटणीस गौतम अहिरे यांनी ही याचिका केली आहे.

मंदीवर ‘पुणेरी’ तोडगा
* नोकरी गमावली तर नवे घर शाबूत राहण्याची हमी!
मुंबई, १७ फेब्रुवारी/ व्यापार प्रतिनिधी
सध्याच्या मंदीसदृश्य वातावरणात अनेक तरुणांवर नोकरी गमावण्याची पाळी आली आहे. नोकरीपेशाबाबत अनिश्चिततेच्या या सावटामुळे नव्या घरात जाण्याचे स्वप्नही स्वाभाविकच काही काळ थंड बस्त्यात टाकला गेले आहे. पण या मंदीच्या मानसिकतेला दूर लोटणारा पुणेकरी तोडगा मात्र पुढे आला आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदीवर उपाय म्हणून योजलेल्या या युक्तीने नोकरी गमावली तर कर्जाऊ घेतलेले नवे घर मात्र शाबूत राहणार आहे. देशाचे ‘ऑटो हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात वाहन उद्योगातील मंदीमुळे ‘ले-ऑफ’ ‘क्लोजर’चे गंडांतर अनेक कामगारांवर आले आहे.

उद्धव-पवार गुप्त बैठक?
नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

शिवसेना आणि भाजप यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या बोलणीत कोणतेच अडथळे नसल्याची ग्वाही दिल्लीतील भाजपचे नेते देत असले तरी युतीमध्ये आता गंभीर स्वरुपाचे तात्विक मतभेद उद्भवले असल्याचा दावा एका ज्येष्ठ शिवसेना नेत्याने आज केला. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी युतीची गुप्त बोलणी करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. उद्या काही तरी मोठी बातमी मिळेल, असे भाकित आज शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने केले.

मंचर येथील स्फोट हा मोठय़ा कटाच्या तयारीचा भाग?
* नागपूरच्या दारूगोळा कारखान्यातून आलेल्या स्फोटकांचा वापर
* राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या दौऱ्यापूर्वी झालेल्या या घटनेमुळे पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ
पुणे, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी
मंचर येथे एसटी बसमध्ये रविवारी सायंकाळी झालेला स्फोट हा एका मोठय़ा कटाचा तयारीचा भाग असावा, अशा प्राथमिक निष्कर्षांपर्यंत दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला ताब्यात किंवा अटक करण्यात आली नसली तरी या संदर्भात काही हिंदू व इस्लामी संघटनांच्या कार्यकर्त्यांची चौकशी करणार असल्याचे पथकातील सूत्रांनी सांगितले.

वडेट्टीवारांविरुद्ध ‘अ‍ॅट्रोसिटी’चा गुन्हा
चंद्रपूर, १७ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसापासून चर्चेत असलेल्या फाईलफेक प्रकरणात जिल्हा परिषदेच्या महिला सभापती सुभद्रा कोटनाके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राज्याचे आदिवासी व जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीची सत्यता पडताळून पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी म्हटले आहे.

सोन्याने गाठले १५ हजाराचे शिखर
शेअर बाजाराची ९००० खाली घसरण
मुंबई, १७ फेब्रुवारी/व्यापार प्रतिनिधी
जगभरात सर्वत्रच सोन्याला मागणी वाढली असून, परिणामी या मौल्यवान धातूने भावात आज प्रति १० ग्रॅमला रु. १५,२३० हे नवे शिखर गाठले. मुंबई सराफ बाजारात झालेल्या व्यवहारात स्टँडर्ड सोन्याच्या भावात आज १० ग्रॅममागे तब्बल ४७५ रुपयांनी वाढ झाली.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण १ मे रोजी जाहीर होणार
चंद्रशेखर कुलकर्णी
सॅन होजे, १७ फेब्रुवारी

मराठी भाषा हा मूलाधार असलेले राज्याचे सांस्कृतिक धोरण येत्या १ मेला जाहीर केले जाणार असून, त्यात परदेशस्थ भारतीयांचाही विचार केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या वेळी केली. या सांस्कृतिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निदान १०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरण्याचे अभिवचनही पाटील यांनी संमेलनास उपस्थित असलेल्या प्रतिनिधींपुढे बोलताना दिले.

गुप्तवार्ता विभागाने बदलली परीक्षेची तारीख!
राजीव कुळकर्णी
ठाणे, १७ फेब्रुवारी

राज्यभरातील हजारो तरुणांचे नुकसान होऊ नये व त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी राज्य गुप्तवार्ता विभागाने अधिकारीपदाची घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलली असून, ती आता २२ फेब्रुवारीऐवजी १ मार्च रोजी होणार आहे. कर्मचारी निवड आयोगातर्फे केंद्राच्या विविध विभागांतील ‘बी’ ग्रेडच्या अधिकारीपदासाठी, अन्न व औषधी प्रशासनातील ‘फूड इन्स्पेक्टर’ व वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारीपदासाठी एकाच दिवशी म्हणजे २२ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार होती.

रिसॅटची नांदी चांद्रयानामध्ये!
विनायक परब
मुंबई, १७ फेब्रुवारी

आजवर चंद्राच्या दिशेने झेपावलेल्या एकाही यानाला तेथे असलेल्या आणि काही किलोमीटर्स खोल असलेल्या विवरांच्या आत नेमके काय दडले आहे, याचे चित्रण करता आलेले नाही. मात्र चांद्रयान- एक हे असे पहिलेच यान ठरले आहे की, त्यावरील यंत्रणेने चंद्राच्या विवराच्या आतील भागाचे चित्रण केले आहे. त्यासाठी नासाच्या मदतीने मिनी-सार ही यंत्रणा विकसित करण्यात आली होती.

मतदार कौल व मतदानोत्तर सर्वेक्षणांवर बंदी
नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी/पी.टी.आय.

निवडणुकीच्या काळात विविध वाहिन्या तसेच प्रसारमाध्यमांद्वारे घेण्यात येणारे मतदारांचे कौल तसेच मतदानानंतर लगेच केले जाणारे सर्वेक्षण यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार जेथे एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे तेथे मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तासांपासून कोणत्याही मतदार कौलाचा तसेच सर्वेक्षणाचा निकाल छापील, इलेक्ट्रॉनिक अथवा अन्य कोणत्याही प्रसार माध्यमातून जाहीर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जेथे अनेक टप्प्यांत निवडणूक होणार आहे तेथे पहिल्या टप्प्याचे मतदान संपण्यापूर्वीच्या ४८ तासांपासून ते शेवटच्या टप्प्याचे मतदान संपेपर्यंतच्या काळात असे निकाल जाहीर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

हिरा आता ‘कठीण’ राहिला नाही!
लंडन, १७ फेब्रुवारी/पी.टी.आय.

हिरा हा सर्व पदार्थामध्ये कठीण असल्याचे आपण शाळेपासून शिकत आलो आहोत. त्यामुळेच काचेसारखा कठीण पदार्थ कापण्यासाठी हिरा वापरला जातो. परंतु हिऱ्याचे हे ‘काठिण्य’ आता तेवढे राहिले नाही, असे एका नव्या संशोधनातून पुढे आले आहे. अर्थात हिऱ्याचे काठिण्य कमी झालेले नाही, तर त्यापेक्षाही कठीण पदार्थाचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे. ‘लॉन्सडॅलेइट’ या नावाचा हा पदार्थ हिऱ्यापेक्षा तब्बल ५८ टक्के अधिक कठीण आहे, असा निष्कर्ष ‘न्यू सायंटिस्ट’ या विज्ञानविषयक नियतकालिकाने काढला आहे. लॉन्सडॅलेईट हा निसर्गत: आढळणारा पदार्थ असून अतिशय दुर्मिळ आहे. विशेष म्हणजे हिऱ्याप्रमाणेच हासुद्धा कार्बनपासूनच बनलेला आहे.

 


प्रत्येक शुक्रवारी