Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

वीरेंद्रसिंह यांच्या निषेधार्थ ‘बीड जिल्हा बंद’
बीड, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

केतुराच्या गावकऱ्यांना पाण्यासाठी कोठडीत पाठविणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्रसिंह यांच्याविरुद्ध महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ‘जिल्हा बंद’ केला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात दुचाकीवरून फेरी काढत शहर अवघ्या काही तासांत पूर्णपणे बंद करून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे जिल्हा परिषदेत अधिकारी विरुद्ध पदाधिकारी असा संघर्ष पेटला आहे.

सामाजिक लेखापरीक्षण
कल्याणकारी राज्याच्या निर्मितीचे स्वप्न साकारण्या-करिता पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून दर वर्षी कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक केली जाते. सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्याकरिता आणि त्याचे जीवन अधिक सुखदायी करण्याकरिता शासनातर्फे अनेक योजना राबविल्या जात आहेत आणि या योजनांच्या अंमलबजावणीवर मोठय़ा प्रमाणावर खर्च केला जात आहे. राज्याच्या ज्या भागात विकासाचा अनुशेष शिल्लक आहे, अशा भागाकरिता विशेष योजना मंजूर केल्या जात आहेत.मराठवाडासुद्धा राज्यातील एक अविकसित भाग आहे आणि या भागाच्या विकासाचा अनुशेष दूर करण्याकरिता दर वर्षी विशेष ‘पॅकेज’च्या माध्यमातून अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे.

चार लाखांचा कापूस भस्मसात
धारूर, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

‘केदार जिनिंग प्रेसिंग’मधील एका कापसाच्या गंजीस आज दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिनिंगमधील कापसाला आग लागण्याची गेल्या चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे.शहरापासून हाकेच्या अंतरावर ‘केदार जिनिंग प्रेसिंग’ आहे. येथे दोन महिन्यांच्या कालावधीत नाफेडमार्फत २५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली.कापसाच्या चार गंजींपैकी एका गंजीस दुपारी अचानक आग लागली.

दोन महिलांचा निर्घृण खून
औरंगाबाद, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

विवाहितेचा खून करून परस्पर अंत्यसंस्कार करण्याची सातारा गावची घटना ताजी असतानाच दोन महिलांचे निर्घृण खून करण्यात आल्याचे आज सकाळी उघडकीस आले. विशेष म्हणजे एक घटना रात्री साताऱ्यातच घडली. पोलिसांनी सांगितले की, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने तिचा दोरीने गळा आवळून खून केला आणि नंतर पुरावा मागे राहू नये म्हणून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला.

पदपथच्या निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी
निलंगा, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

शहरातील बँक कॉलनी रस्त्यावरील पदपथाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिक व छावा संघटना यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या भागातील रहिवासी व छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे असे की, शिवाजी चौक ते बँक कॉलनी या रस्त्यावर पालिकेच्या वतीने वैशिष्टय़पूर्ण योजनेच्या अनुदानात सुरू असलेले पदपथाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. पदपथाचे बांधकाम नालीवर व रस्त्याच्या बाजूस खोदकाम करून करणे आवश्यक आहे. असे असताना नालीच्या बाजूस रस्त्यावरच असलेल्या साईडपटटय़ावर दगड गिट्टी अंथरून पदपथाचे काम करण्यात येत आहे. यासाठीच्या सिमेंट काँक्रीट बेडसाठी कमी प्रमाणात सिमेंटचा वापर करून कमी-जास्त जाडीचे बेड तयार करून ठोकळे बसविण्यात येत आहेत. सार्वजनिक निधीचा गैरवापर न करता पदपथाचे काम दर्जेदार करावे व बनावट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निकृष्ट काम त्वरित बंद करून त्याची चौकशी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे नाना आकडे, गुणवंत शिरसले, बबन राजे, प्रकाश गोमसाळे, तुळशीदास साळुंके, अनिल वाळके आदींनी केले आहे.

डिघोळ येथे पर्यावरण जाणीव जागृती कार्यक्रम
सोनपेठ, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

कै. विजय गुंडेवार ग्रामीण विकास प्रतिष्ठानातर्फे डिघोळ येथे पर्यावरण जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात आला. केंद्र सरकारच्या वनमंत्रालयाच्या सहकार्याने झालेल्या जनजागृती कार्यक्रमात प्लास्टिक कॅरीबॅगमुळे होणारे प्रदूषण व पर्यावरणास धोका यावर भर देण्यात आला. या प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन पंचायत समिती सदस्य विनोद गायकवाड, ग्रामसेवक ए. एम. गायकवाड, मुख्याध्यापक गुजराथी, सुधीर शेटे आदींनी केले.

‘राणे यांच्यामुळे काँग्रेसला नवी भरारी मिळेल’
बीड, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

काँग्रेस पक्षनेतृत्वाने नारायण राणे यांचे निलंबन रद्द केल्यामुळे राज्यातील काँग्रेसला नवी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त करून झाले गेले विसरून पक्षाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वजण एकदिलाने काम करू आणि आगामी निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देऊ, असे मत आमदार प्रा. सुरेश नवले यांनी व्यक्त केले. बीड येथील आमदार प्रा. सुरेश नवले हे श्री. राणे यांचे कट्टर समर्थक आहेत. काँग्रेसने राणे यांचे निलंबन रद्द केल्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. या पाश्र्वभूमीवर ते ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, नारायण राणे यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता मात्र काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री बदलाच्या प्रक्रियेनंतर राणे यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी निलंबनाची कारवाई केली होती. पण सोमवारी पक्षश्रेष्ठांनी राणे यांचे निलंबन रद्द करून पक्षात सक्रीय करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे आपण स्वागत करीत आहोत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष चांगले यश मिळवेल, असेही ते म्हणाले.राणे यांचे निलंबन रद्द झाल्याची घोषणा होताच युवक कार्यकर्ते चंद्रकांत नवले यांच्या नेतृत्वाखाली माळीवेस येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला.

शिवशक्ती साखर कारखान्याची २९ मार्चला निवडणूक
उभारणीपूर्वीच निवडणूक, उस्मानाबाद, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

अद्याप उभारणीही न झालेल्या उमरगा तालुक्यातील कोळसूर येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याच्या १७ सदस्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रशासनाने जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. मतदान २९ मार्चला होणार आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. २४ फेब्रुवारी व अर्ज मागे घेण्याची मुदत दि. १३ मार्च आहे. दि. २९ मार्चला मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. उमरगा तालुक्यातील ६१ गावांतील ३ हजार ९८३ सभासद मतदार कारखान्याचे संचालक निवडणार आहेत. संस्था मतदारसंघात जि. प. सदस्य प्रकाश आष्टे एकमेव मतदार असल्याने या मतदारसंघातून ते बिनविरोध निवडून आल्यात जमा आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विशेष भूसंपादन अधिकारी डी. एल. पोरडवालकाम पाहणार आहेत.

गंगाखेड तालुक्यात रानडुकरांचा धुडगूस
गंगाखेड, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

तालुक्यातील डोंगराळ भागातील उंडेगाव, कोद्री व डोंगरगाव भागात रानडुकरांनी थैमान माजवीत शेतकऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार ताजे असतानाच रानडुकरांनी आपला मोर्चा आता गोदाकाठाकडील गावांकडे वळविला आहे. मुळी व दुसलगाव परिसरातील शेतीचे ते मोठय़ा प्रमाणात नुकसान करीत आहेत. गोदाकाठाकडील मुळी, दुसलगाव, खळी, सुनेगाव, नागठाणा परिसरात शेतात रानडुकरे धुडगूस घालीत पिकांचे नुकसान करीत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र तालुक्याच्या वन विभागाने ही बाब अद्याप गांभीर्याने घेतलेली नाही. थंडाव्यासाठी रानडुकरांनी गोदाकाठाकडे मोर्चा वळविल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वन विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अब्दुल हुई यांना उत्कृष्ट उर्दू लेखक पुरस्कार
औरंगाबाद, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

उर्दूतील प्रसिद्ध लेखक मोहम्मद अब्दुल हुई यांना मुंबईच्या जमैतूल मसलमीन या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त उर्दू साहित्याचे आदर्श लेखक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
इराण कौन्सीलचे प्रतिनिधी अली मोहम्मदी यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अब्दुल हुई हे इतिहासतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लेखन केले आहे.
यापूर्वी त्यांना अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. मुंबई येथे झालेल्या या सोहळ्यास बॅरिस्टर इकबाल गामा, राजीव मल्होत्रा, इसाक पटेल, जुमैमंसूर अहेमद, श्री. चौधरी आदी उपस्थित होते.

रामनगर कारखान्याला राज्य बँकेने टाळे ठोकले
जालना, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

राज्य सहकारी बँकेने थकित कर्जाच्या वसुलीसाठी रामनगर साखर कारखान्याला टाळे ठोकले! राज्य बँकेचे कारखान्याकडे ३३ कोटी ४९ लाख १८ हजार रुपयांचे कर्ज थकीत आहे. राज्य सहकारी बँकेने आपल्या कर्जवसुलीसाठी साखर कारखान्याकडे वेळोवेळी मागणी केली होती. बँकेच्या व्यवस्थापकांनी व्यवस्थापकीय संचालकांना ४ फेब्रुवारीला नोटीस बजावून जप्तीच्या कारवाईचा इशाराही दिला होता. तसेच ६० दिवसांची नोटीसही नोव्हेंबरअखेर बजावली होती. मुदतीत कर्जाची परतफेड न केल्याने कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन त्यातून थकबाकी वसुलीचे प्रयत्न करण्यासाठी बा. बा. कदम, डी. एस. वढे, एम. एम. मेहेत्रे, पी. के. पाटील, ए. आर. कदम, शिंदे यांची जप्तीच्या कारवाईसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांनी साखरेची तीन गोदामे, शुगर हाऊस विभाग, इंजिनीअरिंग विभाग, कार्यशाळा, भांडार, शेतकरी विभाग, स्थापत्य विभाग, बॉइलिंग हाऊस, बॉयलर आदीला टाळे ठोकले.

शिवजयंतीनिमित्त उद्या विद्यापीठात व्याख्यान
औरंगाबाद, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्त गुरुवारी (दि.१९)डॉ. अब्दुल गनी इमारतवाले यांचे व्याख्यान होणार आहे. डॉ. अब्दुल गनी इमारतवाले हे विजापूरच्या अंजुमन महाविद्यालयात इतिहास व पुरातत्व विभागात आहेत. ‘शहाजीराजे व शिवरायांचे कर्तृत्व आणि मराठा राज्याची निर्मिती’ या विषयावर ते बोलणार आहेत. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. ए. जी. खान राहणार आहेत.सकाळी साडेअकरा वाजता व्याख्यान होईल.

सर्वाना शिक्षण मोहिमेत ११ अस्थिव्यंग मुलांवर शस्त्रक्रिया
औरंगाबाद, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सर्वाना शिक्षण मोहिमेच्या अपंग समावेशीत शिक्षणांतर्गत औरंगाबाद पालिकेच्या वतीने शहरातील ११ अस्थिव्यंग मुलांवर शस्त्रक्रिया करण्यास आजपासून येथील शेठ नंदलाल धूत रुग्णालयात सुरुवात झाली. यासाठी पालिकेच्या वतीने ३ लाख ६ हजार रुपये धूत रुग्णालयाला आगावू देण्यात आले आहेत. शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमधील काहींची बोटे चिकटलेली, काहींचे पाय दुमडलेले आहेत. पहिल्या दिवशी दोन विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून टप्प्या-टप्प्याने ११ विद्यार्थ्यांवर या शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे प्रकल्प विभागप्रमुख विजय जावरे यांनी सांगितले. ११ विद्यार्थ्यांमध्ये पालिका शाळेत शिकणारा फक्त एकच विद्यार्थी आहे. बाकीचे विद्यार्थी हे शहरातील खासगी शाळांतील आहेत. आज महापौर विजया रहाटकर यांनी शस्त्रक्रियेपूर्वी या विद्यार्थ्यांची भेट घेतली.