Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मंदीवर ‘पुणेरी’ तोडगा
* नोकरी गमावली तर नवे घर शाबूत राहण्याची हमी!
मुंबई, १७ फेब्रुवारी/ व्यापार प्रतिनिधी

 

सध्याच्या मंदीसदृश्य वातावरणात अनेक तरुणांवर नोकरी गमावण्याची पाळी आली आहे. नोकरीपेशाबाबत अनिश्चिततेच्या या सावटामुळे नव्या घरात जाण्याचे स्वप्नही स्वाभाविकच काही काळ थंड बस्त्यात टाकला गेले आहे. पण या मंदीच्या मानसिकतेला दूर लोटणारा पुणेकरी तोडगा मात्र पुढे आला आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदीवर उपाय म्हणून योजलेल्या या युक्तीने नोकरी गमावली तर कर्जाऊ घेतलेले नवे घर मात्र शाबूत राहणार आहे. देशाचे ‘ऑटो हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात वाहन उद्योगातील मंदीमुळे ‘ले-ऑफ’ ‘क्लोजर’चे गंडांतर अनेक कामगारांवर आले आहे. पुण्यात बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेल्या सॉफ्टवेअर उद्योगातूनही अनेकांची गच्छंती झाली आहे. पण या मंडळींनी बँकांचे गृहकर्ज घेऊन नवे घर घेतले असल्यास, या कर्जाचे हप्ते भरण्याची चिंता मात्र त्यांच्यावर राहणार नाही, अशी उपाययोजना ‘प्रमोटर्स अ‍ॅण्ड बिल्डर्स असोसिएशन ऑफ पुणे (पीबीएपी)’ या बांधकाम विकासकांच्या संघटनेने पुढे आणली आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष ललित कुमार जैन यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, सध्याच्या आर्थिक स्थितीपायी नोकरी गमवावी लागलेल्या ग्राहकांच्या गृहकर्जाचे पहिले तीन हप्ते हे बांधकाम व्यावसायिकाकडून भरले जातील आणि नवीन नोकरी व रोजगार उपलब्ध होईपर्यंत बँकांची मुद्दल परतफेड काही काळ स्थगित केली जाईल, अशी ही मोठा दिलासा देणारी योजना मालमत्ता विकासक व बँकांच्या संगनमताने पुढे आली आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम प्रक्रियांमध्ये गुंतलेल्या २६० बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘पीबीएपी’ने घरांसाठीच्या मागणीत वाढ होण्याच्या दृष्टीने पुढाकार घेताना हे पाऊल टाकले आहे. एका अंदाजाप्रमाणे पुण्यात सध्याच्या घडीला न विकल्या गेलेल्या फ्लॅट्सचे प्रमाण ५० टक्क्यांच्या घरात असून, पुढील ३० महिन्यांत विविध आकाराच्या आणखी २७,००० नवे फ्लॅट्स उपलब्ध होतील. अनेक विकासकांनी ही योजना महिनाभरापासून अंमलात आणायलाही सुरुवात केली असल्याचे जैन यांनी सांगितले. असोसिएशनच्या वतीने गृहनिर्माणविषयक निश्चित स्वरूपाचे ‘कॉस्ट अ‍ॅनालिसिस’ केले गेले असून, सध्या येथील जागांचे अत्यल्प दर असलेल्या हडपसर ते सर्वात महागडय़ा एरंडवणे-कोरेगाव पार्कपर्यंत नवीन घरांच्या किमती या तळच्या स्तरावर राहतील या संबंधाने पुण्यात सहमतीचे वातावरण तयार होत आहे, असे ललित जैन यांनी सांगितले. जमीन, प्रत्यक्ष बांधकाम आणि अन्य खर्च जमेस धरून पुण्यात गृहनिर्माणासाठी येणारा प्रति चौरस फूट खर्च हा रु. २६५० ते रु. ३३०० या दरम्यान असल्याचे असोसिएशनच्या विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे. त्या उलट बहुतांश विकासकांनी प्रति चौरस फूट रु. २७५० या कमाल दराने घरांची विक्री करण्याला मान्यता दर्शविली आहे, अशी त्यांनी माहिती दिली. यापूर्वीही गृहवित्ताचे व्याजदर वाढले असताना, असोसिएशनच्या वतीने ग्राहकाने बुकिंग केल्यानंतर पहिल्या २४ महिन्यांपर्यंत चढय़ा व्याजदराचा काही भार सोसण्याची योजना ‘पीबीएपी’ने पुढे आणली होती.