Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

उद्धव-पवार गुप्त बैठक?
नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

 

शिवसेना आणि भाजप यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या बोलणीत कोणतेच अडथळे नसल्याची ग्वाही दिल्लीतील भाजपचे नेते देत असले तरी युतीमध्ये आता गंभीर स्वरुपाचे तात्विक मतभेद उद्भवले असल्याचा दावा एका ज्येष्ठ शिवसेना नेत्याने आज केला. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी युतीची गुप्त बोलणी करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
उद्या काही तरी मोठी बातमी मिळेल, असे भाकित आज शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने केले. विश्वसनीय सूत्रांच्या मते उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी दिल्लीत येऊन शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी-शिवसेनेच्या संभाव्य युतीविषयी प्राथमिक बोलणी केली होती. आता या बोलणीला मूर्त स्वरुप देण्यासाठीच उद्धव ठाकरे यांचे आज दिल्लीत आगमन झाल्याचे म्हटले जात आहे. उद्धव यांचे दिल्लीतील आगमन गुप्त ठेवण्यात आले असले तरी प्रसिद्धी माध्यमांच्या एका वर्तुळात त्याची चर्चा सुरु होती. पक्षाच्या बहुतांश नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली आगमनाविषयी भाष्य करण्याचे टाळले. राज्यात भाजपशी असलेल्या प्रदीर्घ युतीला शिवसेना कंटाळली असून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याची तयारी चालविली आहे. शरद पवार यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांपूर्वीच शिवसेनेची युती करावी आणि राज्य विधानसभा विसर्जित करून लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही निवडणुकीला संयुक्तपणे सामोरे जावे, असा प्रस्ताव शिवसेनेने ठेवला आहे. राष्ट्रवादीला लोकसभेच्या २६ जागा सोडण्याची तयारी शिवसेनेने दाखविली आहे. प्रसंगी ३० जागा सोडण्याचीही शिवसेनेची तयारी असल्याचे समजते. विधानसभेच्या १३० ते १४० जागा राष्ट्रवादीला देण्यास शिवसेना तयार आहे. शिवसेनेची पवारांसोबतची ‘गुफ्तगू’ केवळ काँग्रेस आणि भाजपवर दबाव आणण्यासाठी सुरु असून शिवसेना रालोआतून बाहेर पडणार नाही, याची खात्री भाजप नेत्यांना वाटते. जागावाटपाच्या बोलणीत कोणतेही अडथळे उरले नसून आमची बोलणी २६ फेब्रुवारीनंतर होईल, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
पण आता जागावाटपाचा राहिला प्रश्न नसून मुद्दा गंभीर तात्विक मतभेदांचा आहे, असे मत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. हे मतभेद संपुष्टात आल्याशिवाय जागावाटपाची बोलणी पुढे सरकू शकत नाही, असेही ते म्हणाले. समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्यासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघ सोडावा म्हणून अमर सिंह यांनी पवार यांच्याशी रविवारी बोलणी केली. त्यापाठोपाठ आज उद्धव ठाकरेही पवार यांच्याशी भेटणार असल्याची चर्चा सुरु होती. शिवसेनेने सपा-राष्ट्रवादीच्या या हातमिळवणीकडे कानाडोळा करण्याचे ठरविले आहे. भाजप-रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांची उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी भेट घेतल्याचे समजते. या भेटीचा तपशील कळू शकला नाही.