Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मंचर येथील स्फोट हा मोठय़ा कटाच्या तयारीचा भाग?
* नागपूरच्या दारूगोळा कारखान्यातून आलेल्या स्फोटकांचा वापर
* राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या दौऱ्यापूर्वी झालेल्या या घटनेमुळे पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ
पुणे, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

मंचर येथे एसटी बसमध्ये रविवारी सायंकाळी झालेला स्फोट हा एका मोठय़ा कटाचा तयारीचा भाग असावा, अशा प्राथमिक निष्कर्षांपर्यंत दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला ताब्यात किंवा अटक करण्यात आली नसली तरी या संदर्भात काही हिंदू व इस्लामी संघटनांच्या कार्यकर्त्यांची चौकशी करणार असल्याचे पथकातील सूत्रांनी सांगितले.
खेडपासून रांजणी गावाला जाणाऱ्या व मंचर स्थानकावर थांबलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बसमध्ये रविवारी साडेसातच्या सुमारास कमी तीव्रतेचा स्फोट झाला. जिलेटिनच्या कांडय़ा व डिटोनेटर वापरून हा स्फोट घडवून आणला गेला, अशी माहिती बॉम्ब शोधक व नाशक पथकाने व पोलिसांनी दिली. जिलेटिनच्या कांडीला डिटोनेटर लावण्यात आला होता, तर त्याला जोडलेली सुमारे साडेबारा फुट लांबीची वायर ही खिडकीतून बाहेर आणली गेली होती. स्फोटाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘खेड-मंचर या भागामध्ये जिलेटिनच्या कांडय़ांचा वापर विहीर व खाणींच्या कामासाठी केला जातो. त्यामुळे स्फोटानंतर या घटनेचे गांभीर्य स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आले नाही. मात्र, विहीर किंवा खाणींसाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी जिलेटिनची वाहतूक करावयाची असल्यास त्याला डिटोनेटर तसेच साडेबारा फुट लांबीची वायर लावून कोणी जिलेटिन कांडय़ा नेणार नाही. त्याचबरोबर, खाणींसाठी वापरण्यात येणारे जिलेटिनसाठी परवाना आवश्यक असल्याने ते खुलेआम मिळत नाही. हा स्फोट राजकीय संघर्षांतून झाला नसल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले आहे. नागपूरच्या दारूगोळा कारखान्यातून आलेल्या स्फोटकांचा वापर या स्फोटामध्ये करण्यात आला होता. घटनास्थळावरून मिळालेल्या स्फोटकाच्या आवेष्टनावरून व अन्य पुराव्यांच्या आधारे ही माहिती उघड झाली आहे, असे पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पीटर निरीक्षक पीटर लोबो यांनी सांगितले. अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटासाठी तसेच सुरत येथे निकामी करण्यात आलेल्या बॉम्ब व अन्य स्फोटकांची वाहतूक ‘इंडियन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या रियाज भटकल याच्या सांगण्यावरून सय्यद नौशाद व अहमद बावा या दोघा कार्यकर्त्यांनी पुण्यातून केली होती, अशी माहिती नुकतीच उघडकीस आली होती. या पाश्र्वभूमीवर मंचर येथे झालेला स्फोट अशा प्रकारचा कुठल्या मोठा कटाच्या तयारीचा भाग असावा, अशी शक्यता एटीएसचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुणे (दि. १८) दौऱ्यापूर्वी ही घटना घडल्याने शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.