Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

वडेट्टीवारांविरुद्ध ‘अ‍ॅट्रोसिटी’चा गुन्हा
चंद्रपूर, १७ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

 

गेल्या दोन दिवसापासून चर्चेत असलेल्या फाईलफेक प्रकरणात जिल्हा परिषदेच्या महिला सभापती सुभद्रा कोटनाके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राज्याचे आदिवासी व जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीची सत्यता पडताळून पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी म्हटले आहे.
गेल्या रविवारी चिमूर येथे अंगणवाडी सेविकांच्या नियुक्तीसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या. मुलाखती घेण्यासाठी नेमलेल्या समितीत तालुका पातळीवरील सर्व अधिकारी असतात. त्यानुसार तब्बल अकरा अधिकारी मुलाखतस्थळी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात झाल्यानंतर उमेदवाराचे गुण दाखवण्याच्या मुद्यावरून राज्यमंत्री विजय वडेट्टीवार आणि महिला व बालकल्याण सभापती सुभद्रा कोटनाके यांच्यात वाद झाला. वाद टिपेला पोहोचल्याने सभापती सुभद्रा कोटनाके यांचा रक्तदाब वाढून त्या बैठकीतच बेशुद्ध पडल्या. यावेळी उपस्थित असलेल्या चिमूरच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने तपासले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. सोमवारी त्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी वडेष्ीवार यांनी रागाच्या भरात त्यांच्या समोरील फाईल फेकून मारली व जातीवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली. या तक्रारीची दखल घेत शहर पोलीस ठाण्यात विजय वडेट्टीवार यांच्याविरुध्द सोमवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेच्या वेळी उपस्थित असलेले चिमूरचे बालविकास प्रकल्प अधिकारी बिरमवार यांनी त्याच दिवशी रात्री तेथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यात बैठक सुरू झाल्यानंतर सभापती कोटनाके यांनी त्यांना फाईल फेकून मारली व कॉलर पकडून मारण्याची धमकी दिली, असे नमूद आहे. त्याची दखल घेत पोलिसांनी काल रात्री सभापती कोटनाके यांच्यावर अखदलपात्र गुन्हा नोंदवला आहे. राज्यमंत्री वडेट्टीवार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपण फाईल फेकून मारली नाही तर सभापती कोटनाके यांनीच अधिकाऱ्यांना फाईल फेकून मारली, असा दावा केला. आपल्याच पक्षातील काही स्थानिक नेते हे प्रकरण जाणीवपूर्वक तापवीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.