Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सोन्याने गाठले १५ हजाराचे शिखर
शेअर बाजाराची ९००० खाली घसरण
मुंबई, १७ फेब्रुवारी/व्यापार प्रतिनिधी

 

जगभरात सर्वत्रच सोन्याला मागणी वाढली असून, परिणामी या मौल्यवान धातूने भावात आज प्रति १० ग्रॅमला रु. १५,२३० हे नवे शिखर गाठले. मुंबई सराफ बाजारात झालेल्या व्यवहारात स्टँडर्ड सोन्याच्या भावात आज १० ग्रॅममागे तब्बल ४७५ रुपयांनी वाढ झाली. त्या उलट शेअर बाजारात सलगपणे घसरणीचा क्रम सुरूच असून, अंतरीम अर्थसंकल्पाने केलेल्या निराशेपायी ‘सेन्सेक्स’ आज पुन्हा २७० अंशांनी कोसळून ९,००० च्या पातळीखाली गेला. जगभरात सर्वत्रच आर्थिक मंदीवर उतारा म्हणून जाहीर झालेले रकारी ‘पॅकेज’ भांडवली बाजारात चैतन्य आणण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चितेत उत्तरोत्तर भर पडत असून, अशा काळात सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडील गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. भारतातही लग्नसराई नजीक येऊन ठेपली आहे, भावात आणखी वाढ होण्याआधी आताच सोने-खरेदीचा ग्राहकांमध्ये कल दिसून येत आहे. सोन्याच्या भावात वाढ होण्याचा हा क्रम आणखी काही दिवस सुरू राहील, स्टँडर्ड सोन्याचा (९९.५ टक्के शुद्धतेचे) १० ग्रॅमचा भाव १६,००० रुपयांवर गेल्यास नवल ठरणार नाही, असे सराफ बाजारातील जाणकारांचा कयास आहे. सामान्य ग्राहकांकडून मागणी वाढली असताना, सोन्याच्या साठेबाजीची प्रवृत्तीही बोकाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोन्याच्या बरोबरीने चांदीचा भावही वधारत असून, आज सराफ बाजारात झालेल्या व्यवहारात एक किलो शुद्ध चांदीचा भाव कालच्या तुलनेत ७०५ रुपयांनी वाढून २२,३१५ रुपयांवर गेला.
काल संसदेत सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पाने केलेल्या निराशेतून गुंतवणूकदारांना अद्याप बाहेर पडता आलेले नाही, हे ‘सेन्सेक्स’मध्ये आज झालेल्या २७० अंशांच्या घसरणीतून दिसून आले. कालच्या अर्थसंकल्पाच्या दिवशी ‘सेन्सेक्स’ ३२९ अंशांनी घसरला होता. आज दिवसभरातही समभागांच्या विक्रीचा सपाटा सुरूच राहिला आणि ‘सेन्सेक्स’ने ९००० अंशांची महत्त्वाची मानसिक पातळीही तोडली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ८,९९४.३४ अंशांवर स्थिरावला होता. यापूर्वी २३ जानेवारीला सेन्सेक्स ९,००० अंशांखाली बंद झाला होता. रिअल इस्टेट, बँकिंग आणि धातू क्षेत्रातील समभागांचे भाव आज मोठय़ा प्रमाणात घसरले. सर्वाधिक फटका टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागाला बसला.