Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण १ मे रोजी जाहीर होणार
चंद्रशेखर कुलकर्णी
सॅन होजे, १७ फेब्रुवारी

 

मराठी भाषा हा मूलाधार असलेले राज्याचे सांस्कृतिक धोरण येत्या १ मेला जाहीर केले जाणार असून, त्यात परदेशस्थ भारतीयांचाही विचार केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या वेळी केली. या सांस्कृतिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निदान १०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरण्याचे अभिवचनही पाटील यांनी संमेलनास उपस्थित असलेल्या प्रतिनिधींपुढे बोलताना दिले.
महाराष्ट्र पन्नासाव्या वर्षांत पदार्पण करीत असताना राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर व्हावे यासाठीची चर्चात्मक प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. या प्रक्रियेत अनिवासी भारतीयांनीही व्हावे, असे आवाहन करून हर्षवर्धन पाटील म्हणाले, की मनोरंजनाची साधने म्हणजे सांस्कृतिक कार्य नव्हे, याचे भान असल्यानेच साहित्यापासून चित्रपटनिर्मितीपर्यंत आणि लोककलांपासून पुरातत्त्व विद्येपर्यंत सर्व आयामांचा समावेश असलेले सांस्कृतिक धोरण निश्चित करण्याचे ठरविले आहे.
परदेशातील मराठी साहित्य संमेलन ही यापुढे काळाची गरज आहे. मराठीचा प्रसार आणि प्रचार यासाठी महाराष्ट्र सरकार परदेशात अशा रीतीने भरणाऱ्या साहित्य संमेलनाच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही देऊन पाटील म्हणाले, की या विश्व साहित्य संमेलनातून मराठी विद्यापीठापासून अमेरिकेतील महाराष्ट्र माहिती केंद्रापर्यंत अनेक मागण्या पुढे आल्या. अनिवासी भारतीयांशी संबंध असलेल्या या मागण्यांना एका अर्थाने या संमेलनामुळेच व्यासपीठ मिळाले आहे. हे या संमेलनाचे फलित आहे. या मागण्यांची आपण गांभीर्याने दखल घेतली असून, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबतचा पाठपुरावा प्रभावीपणे केला जाईल.
सकाळी मुक्कामाच्या हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांनी ‘मराठी भाषा भवन’ उभारण्याची मुंबईत गरज आहे, असा स्पष्ट उल्लेख केला होता. किंबहुना नव्या सांस्कृतिक धोरणाच्या दिशेने पुढचे पाऊल टाकताना सांस्कृतिक कार्यक्रम जर पुरस्कृत असेल तर त्या रकमेवरील २५ टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असल्याकडेही पाटील यांनी स्पष्ट केले.
हिंदी विद्यापीठाच्या धर्तीवर मराठी विद्यापीठासाठी होणारी मागणी रास्त आहे. विश्व साहित्य संमेलनाचा प्रयोग यशस्वी झाल्याचे मत नोंदवितानाच यापुढील अशा संमेलनांना सरकारचे पाठबळ राहील मात्र संमेलनाचे स्थळ लंडन असावे, की स्वित्र्झलड, यासारख्या वादात सरकार पडणार नाही, असे पाटील यांनी सांगितले. अर्थात अशा संमेलनांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक धोरणाद्वारे तरतूद केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले- पाटील यांनी समारोपाच्या वेळीही पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला झालेल्या विरोधाचा, टीकेचा समाचार घेतला. अर्थात संमेलनाध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांनी याबाबत ठाले- पाटील यांना थेट सबुरीचा सल्ला दिला. ते म्हणाले, की या आनंद सोहळ्यात केवळ आनंदाबाबत बोलणेच औचित्याचे ठरेल. गतइतिहास पुन: पुन्हा उगाळण्याचे कारण नाही. संस्कृती घडविण्याच्या बरोबरीने संस्कृती बिघडविण्याचे कामही अव्याहत सुरू असते. या पाश्र्वभूमीवर विश्व साहित्य संमेलनाच्या रूपात साकारलेली वाङ्मयीन कार्यशाळा दृष्ट लागण्याजोगी देखणी होती.
विश्व साहित्य संमेलनाचा धावता आढावा घेताना डॉ. पानतावणे यांनी सर्व परिसंवादांचा, त्यातील अभ्यासपूर्ण विवेचनांचा आवर्जून उल्लेख केला. पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा ‘भावसरगम’ ही या संमेलनाला मिळालेली देणगी होती, असे सांगतानाच सुधीर गाडगीळ हा भान असलेला सर्वोत्तम मराठी निवेदक असल्याचे गौरवपर उद्गारही त्यांनी काढले.
साहित्यिक निमंत्रितांचे शिस्तीने अगत्यपूर्वक आदरातिथ्य केल्याबद्दल डॉ. पानतावणे यांनी ‘बे एरिया’तील संदीप देवकुळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे भरभरून अभिनंदन केले. सुधीर गाडगीळ यांच्या समवेत या संमेलनाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अभिनेत्री अश्विनी भावे यांचाही अध्यक्षांनी विशेष उल्लेख केला.