Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

रिसॅटची नांदी चांद्रयानामध्ये!
विनायक परब
मुंबई, १७ फेब्रुवारी

 

आजवर चंद्राच्या दिशेने झेपावलेल्या एकाही यानाला तेथे असलेल्या आणि काही किलोमीटर्स खोल असलेल्या विवरांच्या आत नेमके काय दडले आहे, याचे चित्रण करता आलेले नाही. मात्र चांद्रयान- एक हे असे पहिलेच यान ठरले आहे की, त्यावरील यंत्रणेने चंद्राच्या विवराच्या आतील भागाचे चित्रण केले आहे. त्यासाठी नासाच्या मदतीने मिनी-सार ही यंत्रणा विकसित करण्यात आली होती. आता येत्या काही दिवसांत रात्रीच्या वेळेसही अंधारात पृथ्वीवरील चित्रण करण्याची सोय असलेला रिसॅट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) सोडण्यात येणार आहे, त्याची खरी नांदी चांद्रयानामध्येच झाली आहे.
चांद्रयान-एकमध्ये एकूण ११ यंत्रणा आहेत. त्यातील मिनी-सार म्हणजेच सिंथेटिक अ‍ॅपर्चर रडार ही यंत्रणा चंद्रावरील विवराच्या आतमधील चित्रणासाठी वापरण्यात आली होती. तशाच सी- बॅण्ड- सार यंत्रणेचा वापर आता रिसॅटमध्ये करण्यात येणार आहे. अंधारातही चित्रण करण्याची असलेली सोय हेच या यंत्रणेचे वैशिष्टय़ आहे. या यंत्रणेमार्फत रेडिओ लहरींचा वापर करून हे चित्रण केले जाते.
त्यामुळेच चंद्राच्या हॅवर्थ विवरातील चित्रण करणे शक्य झाले. चंद्राच्या विवरातील बाबीही स्पष्टपणे दाखविणारे पहिले छायाचित्र आता अधिकृतरित्या जारी करण्यात आले आहे. यात दिसणारी पष्ी ही हॅवर्थ विवरातील चित्रणाची आहे.
यात ५० बाय १८ किलोमीटर्स एवढय़ा अंतराचे चित्रण असून ते पृष्ठभागापासून १०० किलोमीटर्स अंतरावरून घेण्यात आले आहे. हे विवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आहे. चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशामध्ये असलेल्या विवरांमध्ये बर्फाच्या स्वरूपात पाण्याचा अंश असल्याचा संशय वैज्ञानिकांना असून त्याचा शोध या यंत्रणेतर्फे घेण्यात येणार आहे. हे छायाचित्र १७ नोव्हेंबर ०८ रोजी टिपलेले आहे. याच रडारचा वापर आता रिसॅटमध्ये पृथ्वीच्या चित्रणासाठी केला जाणार आहे.