Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

गुप्तवार्ता विभागाने बदलली परीक्षेची तारीख!
राजीव कुळकर्णी
ठाणे, १७ फेब्रुवारी

 

राज्यभरातील हजारो तरुणांचे नुकसान होऊ नये व त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी राज्य गुप्तवार्ता विभागाने अधिकारीपदाची घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलली असून, ती आता २२ फेब्रुवारीऐवजी १ मार्च रोजी होणार आहे.
कर्मचारी निवड आयोगातर्फे केंद्राच्या विविध विभागांतील ‘बी’ ग्रेडच्या अधिकारीपदासाठी, अन्न व औषधी प्रशासनातील ‘फूड इन्स्पेक्टर’ व वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारीपदासाठी एकाच दिवशी म्हणजे २२ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. सोमवारच्या ‘लोकसत्ता’च्या अंकात ‘स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आगामी रविवार तापदायक’ या शीर्षकाखाली हजारो सुशिक्षित बेरोजगारांच्या भवितव्याशी निगडित प्रश्नास वाचा फोडण्यात आली. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांनी तातडीने त्याची दखल घेऊन राज्य गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख डी. शिवानंदन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. अगोदरच सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने केवळ एकाच दिवशी येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमुळे हजारो मराठी मुलांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची सूचना केळकर यांनी केली. शिवानंदन यांनीही मग विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. गुप्तवार्ता विभाग सक्षम बनविण्यासाठी चांगले अधिकारी मिळणे गरजेचे असून इतर परीक्षांची तयारी केल्यामुळे या परीक्षेस अनेक जण मुकणार होते. त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून ही परीक्षा आता २२ फेब्रुवारीऐवजी १ मार्च रोजी सकाळी १० वाजता गोरेगाव येथे होणार असून, सर्व उमेदवारांना मोबाइल फोन, ई-मेलद्वारे हा बदल कळविण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त शशिकांत शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ज्या उमेदवारांना शारीरिक मोजमाप चाचणीसाठी हजर राहता आले नाही त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात येणार असून, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता दादर येथे त्यांची चाचणी घेतली जाईल. तसेच यासंबंधीची सर्व माहिती www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे शिंदे म्हणाले.अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त उत्तरवार यांच्याशीही आमदार केळकर यांनी संपर्क साधला. गुप्तवार्ता विभागाने परीक्षेच्या तारखेत बदल केल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र ‘फूड इन्स्पेक्टर’ व अन्य पदांसाठी राज्यभरातून २५ हजार उमेदवार परीक्षेस बसले असून, उमेदवारांची मागणी रास्त असली तरी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करणे आता शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक क्षेत्रातील भरतीसाठी लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे, बँका, एलआयसी यांच्या स्पर्धा परीक्षा सतत होत असतात. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये भरतीसाठी स्पर्धा परीक्षा आयोजित करताना त्या दिवशी इतर स्पर्धा परीक्षा नाहीत, याची खात्री करून घ्यावी व भविष्यात अशा प्रकारे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही आमदार संजय केळकर यांनी म्हटले आहे.