Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

प्रादेशिक

‘फाइलफेक प्रकरण म्हणजे पुंगलिया यांचे षड्यंत्र’
मुंबई, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह परिषदेच्या महिला व बालविकास समितीच्या सभापती कोटनाके यांच्यावर आपण फाइल फेकून मारली हा आरोप तद्दन खोटा व राजकीय हेतूने प्रेरित असून यामागे काँग्रेसचे नेते व माजी खासदार नरेश पुंगलिया यांचाच हात आहे, असा आरोप जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केला.

सिंहगड संस्थेचे सरकारने थकविले २० कोटी
मुंबई, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाची ४० हून अधिक महाविद्यालये चालविणाऱ्या सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी या संस्थेला मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फीच्या परताव्यापोटी देय असलेली सुमारे २० कोटी रुपयांची रक्कम राज्य सरकारने थकविली असून ती मिळावी, यासाठी संस्थेने उच्च न्यायालयात रिट याचिका केली आहे.

शिवसेनेसाठी शिव वडापावची डोकेदुखी
बंधुराज लोणे
मुंबई, १७ फेब्रुवारी

शिवसनेचे कार्याध्यक्ष उद्वव ठाकरे यांची बहुचर्चित शिव वडापाव योजना आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडली असताना आता सुधार समितीत या योजनेच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. सुधार समितीत सेना-भाजपचे बहुमत नसल्याने या योजनेचे काय होणार, अशी चिंता युतीच्या नेत्यांना लागली आहे. येत्या २४ फेब्रुवारी रोजी सुधार समितीची बैठक होणार आहे. शिव वडापाव योजना लागू करण्याची सेनेला फारच घाई झालेली आहे.

दहावी- बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचे सावट
विविध संघटना झाल्या आक्रमक
मुंबई, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी
शिक्षणावरील खर्चाची जबाबदारी टाळण्यापासून ते संवेदनशील मुद्दय़ांवर चालढकल करण्यापर्यंत राज्य सरकारकडून छुपे धोरण राबविले जात आहे. राज्य सरकारच्या या कारभाराच्या निषेधार्थ विविध संघटनांनी दहावी-बारावीच्या परीक्षांच्या पाश्र्वभूमीवर असहकार आंदोलन पुकारले आहे. येत्या २६ तारखेपासून बारावीची परीक्षा सुरू होत असतानाच संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याने परीक्षांमध्ये अनेक अडचणी निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नव्या पोलीस महासंचालकाच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू
अनामी रॉय यांचेही नाव स्पर्धेत
मुंबई, १७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी
पोलीस महासंचालक अनामी रॉय यांची निवड रद्दबातल ठरविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात न जाण्याचे निश्चित झाल्यानंतर राज्य शासनाने आता नव्या महासंचालकाच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. उच्च न्यायालयात हात पोळले गेल्याने आता नव्या महासंचालकाची निवड करताना पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. नव्या महासंचालकाची निवड करताना रॉय यांच्या नावाचाही विचार होणार आहे.

शशांक शिंदेंचा सन्मान का नाही?
कविता करकरे यांची खंत
मुंबई, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना शासनाने सन्मानचक्र दिले. त्यांच्या कुटुंबीयांना मदतही केली. त्याबद्दल आभार, मात्र शहीद शशांक शिंदे यांचीही उचित सन्मान व्हायला हवा होता, अशी खंत शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना त्यांनी या बाबतीत पत्र पाठविले आहे. केवळ मदत आणि सन्मान दिल्याने प्रश्न मिटत नाही तर दहशतवादाच्या विरोधात सर्वकष युध्द छेडण्याची आणि जनेतेने एकी दाखविण्याची गरज आहे, असेही कविता यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. सरहद्दीपलिकडून आलेल्या अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला याची कबुली पाकिस्तानने दिली आहे, हे आपले यश आहे. मात्र तेवढय़ावरच थांबून चालणार नाही, या संपूर्ण कटाच्या मूळाशी जाऊन गुन्हेगारांना शिक्षा झाल्याशिवाय समाधान मानता येणार नाही. कसाब या जिवंत सापडलेल्या अतिरेक्यावर लवकरात लवकर खटला चालवून त्याला फाशी देणे आवश्यक आहे. त्यात होणारा विंलब देशासाठी घातक आहे, असेही कविता यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. दहशतवाद्यांशी लढतांना पोलिसांना शस्त्रे व साधने कमी पडतात याचे प्रत्यंतर गडचिरोली पुन्हा आले. या घटनेनेच मला पत्र लिहण्यास उद्युक्त केले, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांना शस्त्रे देऊनच भागणार नाही तर त्यांचा सन्मानही झाला पाहिजे. त्यांना निवासस्थान, चांगला पगार, कामाचे तास, त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, अशी मागणी कविता यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे मुंबईभर हंडा मोर्चे
मुंबई, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आज मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पालिका विभाग कार्यालयांवर हंडा मोर्चे काढण्यात येऊन अपुऱ्या पाणीपुरवठय़ाची समस्या तात्काळ सोडवण्यासाठी निवेदने देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसने जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करावे, असा आदेश दिला होता. याच आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि के / पश्चिम विभाग अधिकारी रणजित ढाकणे यांत शाब्दिक बाचाबाची झाली.मुंबईकरांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, या मागणीसाठी सर्वत्र हंडे घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विभाग कार्यालयांवर धडकले. बोरिवली ते वांद्रे आणि अन्य ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. रिकामे हंडे घेऊन महिला मोठय़ा प्रमाणावर मोर्चात सहभागी झाल्या होत्या. के / पश्चिम कार्यालयात मोर्चेकरी घुसल्याने वातावरण तंग झाले होते. के / पूर्व विभाग कार्यालयातही असेच वातावरण होते. विभाग अधिकारी ढाकणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. इतरत्र मात्र आंदोलन शांततेत पार पडले. मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली बहुदा हे पहिलेच आंदोलन असावे, अशी चर्चा केली जात होती. त्यासाठी ‘आंदोलन करा’, असा आदेश खुद्द शरद पवार यांना द्यावा लागला.

कार्यालयाचा ताबा घेण्यावरून राष्ट्रवादी-शिवसेनेत हाणामारी
ठाणे, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

राष्ट्रवादीला रामराम ठोकून प्रताप सरनाईक यांनी सेनेत प्रवेश केल्यापासून आमदार जितेंद्र आव्हाड आणि सरनाईक यांच्या समर्थकांमध्ये सुरू असलेली धुसफूस आज हाणामारीत परिवर्तित झाली. महात्मा फुले नगरातील कार्यालयाचा ताबा घेण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महिलांमध्ये आज जोरदार हाणामारी झाली. आज महात्मा फुलेनगर येथील कार्यालयाचा ताबा घेण्यावरून दोन्ही गटांत हाणामारी झाली. सरनाईक राष्ट्रवादीत असताना त्यांनी हे कार्यालय सुरू केले होते. मात्र ते राष्ट्रवादीचे कार्यालय आहे, असा दावा करीत पक्षाच्या महिलांनी आज या कार्यालयाचा ताबा घेतला. तेथे बोर्डही लावण्यात आला. ही वार्ता कानी पडताच सरनाईक समर्थक महिला कार्यालयात घुसल्या. त्यावरून दोन्ही गटांत हाणामारी झाली. त्यात रजनी केळकर आणि संध्या मोर्लेकर यांच्या डोक्याला मार लागला असून, त्यांना सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अदनानच्या पत्नीचा दावा अमान्य
मुंबई, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

लोकप्रिय गायक अदनान सामी यास किंवा त्याच्या घरच्या इतर कोणालाही आपण राहात असलेल्या लोखंडवाला, अंधेरी येथील एबीसी स्काय गार्डन या इमारतीमधील पाच फ्लॅटमध्ये येण्यास आणि वावरण्यास मनाई करावी यासाठी त्याची पत्नी सबाह हिने केलेल्या दिवाणी दाव्याची फिर्याद आपल्या अधिकारकक्षेत येत नाही, असे म्हणून आज मुंबई उच्च न्यायालयाने आज तिला परत केली.
फिर्यादी सबाह दुबईची व प्रतिवादी अदनान पाकिस्तानी नागरिक असला तरी सबाहने तिच्या फिर्यादीत मांडलेला वाद पती-पत्नीमधील वैवाहिक वादाच्या स्वरूपातील असल्याने त्यावर सुनावणी करून निवाडा करण्याचा अधिकार फक्त कौटुंबिक न्यायालयास आहे, असा निकाल न्या. ए.व्ही. निरगुडे यांनी दिला.

भूमी अभिलेख कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
मुंबई, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींमध्ये भूमी अभिलेख विभागातील मोजणी कामावरील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ एक दिवसाचे सामूहीक रजा आंदोलन करण्याचा निर्णय भूमी अभिलेख राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेने घेतला आहे. भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा फटका राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना बसणार आहे.
सर्व विभागांच्या पायाभूत सोयी-सुविधांचे नियोजन आणि अंमलबजावणी करणाऱ्या भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे. भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ राज्यभर लेखणीबंद आणि जमीन मोजणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय या कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील मोजणीदार आणि अधिकारी यांनी काम बंद केल्यास महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे ठप्प होणार आहेत. मेट्रो रेल्वे, एस.आर. ए., धारावी प्रकल्प, एक्स्प्रेस वे, रेल्वे भूसंपादन यासारख्या प्रकल्पांची कामे ठप्प होतील, असे या कृती समितीने आपल्या पत्रकात म्हटले आहे. हे आंदोलन नेमके कधी करण्यात येणार आहे, हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

श्रेष्ठतेवरून महसूल आणि महसूलेतर कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली
मुंबई, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महसूल आणि ग्रामविकास व अन्य महसूलेतर कर्मचाऱ्यांमध्ये श्रेष्ठतेवरून जुंपली आहे. महसूल सेवा या सर्व सेवांमध्ये श्रेष्ठ हे चुकीचे चित्र निर्माण केले जात असल्याचा आरोप महसूलेतर राजपत्रित अधिकारी समन्वय महासंघाने केला आहे. सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आपल्यावर अन्याय झाल्याचे चित्र निर्माण करून महसूल अधिकाऱ्यांनी सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र महसूल बरोबरच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे काम तेवढेच महत्त्वाचे असते. महसूल खात्याच्या संघटनांच्या दबावामुळे सरकारने महसूलेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नये, अशी मागणी महासंघाचे पदाधिकारी सुनील चव्हाण, विजय लहाने, डॉ. महेश चंदूरकर, शिवमुर्ती नाईक, समीर भाटकर यांनी केली आहे. सहावा वेतन आयोग लागू करताना महसूल व महसूलेतर अधिकाऱ्यांच्या संवर्गातील वेतनश्रेष्ठीत कोणताही फरक नसतानाही नाहक ओरड केली जात असल्याचेही महासंघाचे म्हणणे आहे.

नवी मुंबईतील १४ गावांसाठी पाच कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर
मुंबई, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून वगळण्यात आलेल्या १४ गावांसाठी पाच कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस आज मान्यता देण्यात आली. त्यामुळे या गावांमधील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आता सुटू शकेल. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने नवी मुंबईतील गोठेसर, उत्तरशीव, वालीवली, भंडारली, मोकाशीपाडा, दहिसर, पिंपरी, नावाली, निगू, नारिवली, वाकण, बामल्ली, बाळे, नागाव या १४ गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा योजनेला मान्यता देण्यात आली. गोठेघर-दहिसरसाठी सुमारे पावणेचार कोटी रुपये तर बाळे-बामाल्ली योजनेवर १ कोटी ३४ लाख रुपये खर्च येणार आहे. अंबरनाथपासून शिळफाटाकडे जाणाऱ्या जलवाहिनीमधून ही पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींना ३ रुपये ७५ पैसे दराने पाणी उपलब्ध होणार आहे. या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राबविण्यात येणार असून काम पूर्ण झाल्यानंतर त्या जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केल्या जातील.

वंदना सूर्यवंशी यांची अखेर बदली
मुंबई, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

एमएमआरडीएच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनामध्ये घोटाळा तसेच एका व्यक्तीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या एमएमआरडीएच्या पुनर्वसन व पुनर्वास विभागाच्या प्रमुख उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांची आज बदली करण्यात आली. त्यांच्या जागी ए. एस. बिदरकर यांची नियुक्ती झाली. बिदरकर यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला. दलालाचे काम करणाऱ्या संतोष भोसले याने मागील आठवडय़ात एमएमआरडीए कार्यालयात विष पिऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने वंदना सूर्यवंशी तसेच एमएमआरडीएच्या इतर अधिकाऱ्यांना आपल्या मृत्यूप्रकरणी जबाबदार धरले होते. सूर्यवंशी तसेच इतरांनी पैसे घेऊनही पुनर्वसनाचे काम न केल्याने आपल्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरला नसल्याचे त्याने लिहून ठेवले होते. प्रकल्पग्रस्तांनी भोसले याच्या मृत्यूनंतर एमएमआरडीए कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली होती. अखेर वंदना सूर्यवंशी यांची आज बदली करण्यात आली. सूर्यवंशी तसेच इतर अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी एमएमआरडीए प्रकल्पग्रस्तांनी मागणी केली आहे.

सांताक्रुझ येथे बारच्या कॅशियरची हत्या करून चोरी
मुंबई, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

चोरीच्या उद्देशाने पहाटे बारमध्ये घुसलेल्या अज्ञात इसमांनी कॅशियरची हत्या करून सुमारे तीन लाख रुपये लुटून नेल्याची घटना आज सांताक्रुझ येथील ‘संगीत बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट’मध्ये घडली.
उदय शेष्ी असे (३८) कॅशियरचे नाव असून नेहमीप्रमाणे तो बारमधील काम पहाटे चारच्या सुमारास संपवून बारच्या हॉलमध्येच झोपला होता. त्याचवेळी काही जण आतमध्ये घुसले व त्यांनी शेष्ी डोक्यात अवजड वस्तू घालून त्याची हत्या केली. तसेच पैशांची तिजोरी फोडून त्यातील सुमारे तीन लाख रुपये लुटून नेले. दरम्यान, ही घटना घडली त्या वेळी बारमधील काही कर्मचारीही दुसऱ्या खोलीत झोपले होते. परंतु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैशांची तिजोरी वगळता चोरटय़ांनी कशाचीही तोडफोड केलेली नाही. त्यामुळे चोर बारशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार काही कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.

लोणावळा येथे आजपासून रेल्वेचा विशेष ब्लॉक
मुंबई, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

डीसी-एसी परिवर्तनाच्या कामासाठी मध्य रेल्वे लोणावळा येथे पाच दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक करणार आहे. या ब्लॉकमुळे पुण्यातील लोकल वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
उद्या १८ फेब्रुवारीपासून दररोज दुपारी १२.४० ते दुपारी २.१० या वेळेत हा विशेष ट्रॅफिक अ‍ॅण्ड पॉवर ब्लॉक केला जाणार आहे. या ब्लॉकमुळे पुणे-लोणावळादरम्यान धावणाऱ्या काही लोकलच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. याखेरीज पनवेलमार्गे धावणारी पुणे-मनमाड एक्स्प्रेस देहू रोड स्थानकात थांबवून ठेवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.