Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

वाडिया पार्कमधील लॉनच्या कामास तिसऱ्यांदा मुदतवाढ
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलातील क्रिकेटच्या मैदानावर हिरवळ (लॉन) लावण्याच्या सुमारे ३० लाख खर्चाच्या कामास तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा, तसेच संकुलातील सुविधांच्या वापरासाठी ‘क्लब हाऊस’ निर्माण करण्याचा निर्णय समितीच्या सभेत घेण्यात आला.
संकुल समितीची सभा काल सायंकाळी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हिरवळ लावण्याचे काम पुण्याच्या प्रज्ज्वल गार्डन या ठेकेदार कंपनीस देण्यात आले आहे. कंपनीस यापूर्वी २१ ऑगस्ट २००७, ३१ ऑक्टोबर २००८ रोजी मुदतवाढ दिली गेली आहे. समितीनेही दिरंगाईबाबत कोणतीही कारवाई न करता मुदतवाढ दिली. कालही पुन्हा तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. दिरंगाईस समिती जबाबदार असल्याचे, तसेच दरवाढ करण्याच्या मागणीचे पत्र कंपनीने दिले आहे. आता खेळपट्टीची उंची एक फूट वाढवावी लागणार आहे.
जलतरण तलावाचे काम पुन्हा नव्याने सुरू असले, तरी तेथे पूर्वी बसवलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेतील सुमारे ३ लाख रुपयांच्या सुटय़ा भागांची चोरी झाली आहे. यंत्रणेतील किती रकमेचे, कोणते भाग चोरीस गेले याची तपासणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा क्रीडाधिकारी व संबंधित ठेकेदार कंपनी यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेशी संबंधित वाद व उच्च न्यायालयातील प्रकरणे यावर महापौर संग्राम जगताप, जिल्हाधिकारी, आयुक्त एकत्रित चर्चा करणार आहेत. संकुलातील मैदानांचा वापर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे. त्यांच्या व्यस्ततेमुळे हे अधिकार जिल्हा क्रीडाधिकारी प्रमोदिनी गड्डमवार यांना देण्यात आले.
संकुलातील सुविधांचा वापर करण्यासाठी शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर ‘क्लब हाऊस’ निर्माण करण्याविषयी चर्चा झाली. मात्र, ते बीओटी की एफओटी तत्त्वावर चालवायचे याचा निर्णय झाला नाही. समिती किंवा जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे मनुष्यबळ नसल्याने सुविधांच्या वापरासाठी ‘क्लब हाऊस’ पद्धत राबवायचे ठरले.
संकुलासाठी नियुक्त केलेल्या वास्तूविशारद मीनल काळे यांनी दोन टक्के शुल्काची मागणी केली आहे. पूर्वी दोन टक्क्य़ाचा निर्णय झाला होता. परंतु संकुलातील कामात झालेल्या चुकांमुळे तत्कालीन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राजगोपाल देवरा यांनी दंडात्मक कारवाई करताना शुल्क सव्वा टक्क्य़ावर आणले. या संदर्भातील निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला.

मैदानांना खेळाडूंची नावे
संकुलातील बहुतांशी मैदाने तयार झाली आहेत. त्यांचा वापर सुरू झाला आहे. या मैदानांना नगरचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंची नावे दिली जाणार आहेत. संकुलास सात प्रवेशद्वार आहेत. या प्रवेशद्वारांना प्रायोजकांची नावे देण्याचे ठरले.
तालीम पूर्ण झाली आहे. ही तालीम मनपाने चाालवावी, त्याबदल्यात देखभाल, कर्मचारी व जलतरण तलावास पाणी द्यावे अशी प्राथमिक चर्चा झाली. महापौर जगताप यांनी मनपा प्रशासन, नगरसेवक यांच्याशी चर्चा करून निर्णय सांगू, अशी भूमिका मांडली.