Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

४४ बेशिस्त मनपा कर्मचाऱ्यांवर कारवाई
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

महापालिका प्रशासनाने अखेर आज शिस्तीचा चाबूक उचलला. बेशिस्त वागणाऱ्या तब्बल ४४जणांवर उपायुक्त डॉ. पंकज जावळे यांनी कारवाई केली. काहींची १ दिवसाची रजा मांडण्यात आली, तर काहींना १०० रुपये दंड करण्यात आला. कामचुकारपणा करणाऱ्या कोणाचीही यापुढे गय केली जाणार नाही, असे डॉ. जावळे यांनी सांगितले.
आज सकाळी कार्यालयात आल्यानंतर डॉ. जावळे यांनी अचानक सर्व विभागांची पाहणी सुरू केली. पाणीपुरवठा, सामान्य प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, नगर सचिव, विद्युत, अर्थ विभाग, नगररचना व अन्य विभागांना त्यांनी भेट दिली.
बऱ्याच विभागात काही कर्मचारी उपस्थित नसल्याचे त्यांना आढळले. हजेरी पुस्तक बघितले असता, त्यावर स्वाक्षऱ्या केल्या नसल्याचेही निदर्शनास आले. या सर्वाची १ दिवसाची रजा मांडण्यात यावी, असा आदेश डॉ. जावळे यांनी त्या त्या विभागप्रमुखांना दिला.
प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे केले आहे. शर्टच्या खिशाला ते लावावे, अशा सूचना आहेत. सुरुवातीचे काही दिवस या नियमाचे पालन केल्यानंतर बऱ्याचजणांनी ओळखपत्र लावणे बंद केले. अशा २० कर्मचाऱ्यांना डॉ. जावळे यांनी प्रत्येकी १०० रुपये दंड केला. हा दंड तत्काळ वसूल करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मनपा कार्यालय नव्या प्रशासकीय इमारतीत सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच संरक्षक भिंतीलगत चहाच्या गाडय़ा लागल्या. बरेचसे कर्मचारी या गाडय़ांवर कार्यालयीन वेळेत टाईमपास करत असत.
ही बाब लक्षात आल्याने प्रशासनाने आठ दिवसांपूर्वी या सर्व गाडय़ांचे अतिक्रमण हटवले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात थांबणे भाग पडू लागले आहे. त्यातही आज शिस्तीचा बडगा बसल्याने दिवसभर याचीच चर्चा सुरू होती.