Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रीय कार्याध्यक्ष, प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात राष्ट्रवादी युवकमधील गटबाजीचे प्रदर्शन
पक्ष निरीक्षकांच्या अहवालानंतर जिल्हाध्यक्षपदाबाबत निर्णय - तपासे
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा संघटनेतील गटबाजीचे पडसाद आजच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष व प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात तीव्रतेने उमटले. कोण, कोठे आहे याचा वस्तूनिष्ठ अहवाल पक्ष निरीक्षक राजेंद्र गावडे यांनी पाठवल्यावर जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय घेण्याचे प्रदेशाध्यक्ष महेश तपासे यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. तत्पूर्वी त्यांनी मेळाव्यात बोलताना गैरहजर तालुकाध्यक्षांना नोटिसा बजावण्याचे फर्मान काढले. त्याचबरोबर युवकचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनाही कानपिचक्या दिल्या. जिल्हाध्यक्ष दादा कळमकर व तपासे यांनी गटबाजीबद्दल नाराजी व्यक्त केली. नाराजी व्यक्त करताना कळमकर यांनी वर्पे यांच्या कामाचे कौतुक केले.
जिल्हाध्यक्षपदावरून वर्पे यांना हटवण्यासाठी ८ तालुकाध्यक्ष तपासे यांना राजीनामे सादर करणार असल्याचे वर्पे यांच्या विरोधकांनी जाहीर केले होते. वर्पे यांच्या विरोधात असंतोष एकवटणारे युवकचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ मुरकुटे यांची मात्र तपासेंशी नगरमध्ये भेट न झाल्याने मुरकुटे तालुकाध्यक्षांना घेऊन रात्री उशिरा सुपे (ता. पारनेर) येथे भेटण्यासाठी प्रयत्नशील होते. दरम्यान, जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनीही तपासे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून तक्रारी कानावर घातल्या, असे समजले.
युवा जागृती सप्ताहाच्या रॅलीनिमित्त राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजीव झा व प्रदेशाध्यक्ष तपासे आज सायंकाळी नगरमध्ये होते. प्रारंभीच वर्पे यांनी गेल्या ८ दिवसांपासून राष्ट्रवादी युवक वृत्तपत्रात गाजत असली, तरी संघटना जिल्ह्य़ात अभेद्य असल्याचा दावा केला. कळमकर यांनी गटबाजीकडे तपासे यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, यापूर्वी कोणत्या अध्यक्षाने काम केले नाही इतके काम संदीपने केले. कोणत्याही पक्षाच्या युवक संघटनेपेक्षा राष्ट्रवादीची संघटना सरस आहे.
युवकांमधील गटबाजीचा परिणाम मोठय़ा राष्ट्रवादीवर होत असल्याने तपासे यांनी कोण काढायचे, कोण ठेवायचे याचा निर्णय त्वरित घ्यावा असे सुचवून कळमकर म्हणाले की, तालुकाध्यक्षांमधील बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. गटबाजी रोखण्यासाठी तपासेंनी पावले उचलावीत. काही छोटे-मोठे वाद असतील, तर त्याचा बंदोबस्त करावा. काहीजण दिशाभूल करीत असतील, त्यांना जवळ करू नये.
याचाच संदर्भ देत तपासे यांनीही कळमकर यांनी गटबाजी वाढू न देण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन केले. काही तालुकाध्यक्ष कार्यक्रमास गैरहजर असतील, तर त्यांना गावडे यांनी कारणे दाखवा नोटिसा बजवाव्यात, मात्र अधिकार वापरताना त्याचा उद्रेक होऊ नये. वर्पे दोन-अडीच वर्षांपासून काम पाहत आहेत. ते समन्वय निर्माण करू शकत नाही का? त्यांनी समन्वय ठेवला पाहिजे. पक्षहितासाठी निर्णय घेण्यास मी सक्षम आहे. मी दबावाखाली काम करीत नाही. वर्पे यांची निवड करतानाही माझ्यावर दबाव होता, परंतु तो आपण जुमानला नाही.
मेळाव्यास अनुपस्थित राहण्यासाठी वर्पे यांच्या विरोधकांनी नियोजन केले होते. त्यासाठी मुरकुटे व काही तालुकाध्यक्ष शहरातील एका पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात बसून होते.
मेळावा सुरू झाल्यानंतर काही वेळाने त्यातील काही तालुकाध्यक्ष तेथे आले; मात्र पारनेर, श्रीरामपूर, कर्जत, जामखेड, अकोले येथील तालुकाध्यक्ष अनुपस्थित होते. मेळावा संपल्यानंतर झा व तपासे पुण्याकडे रवाना झाले.

वर्पेविरोधक शिष्टमंडळाशी शिरूर विश्रामगृहावर चर्चा
रात्री उशिरा राष्ट्रीय कार्याध्यक्ष झा व प्रदेशाध्यक्ष तपासे यांची सिद्धार्थ मुरकुटे, सुजित झावरे व तालुकाध्यक्षांच्या शिष्टमंडळाने शिरूरच्या सरकारी विश्रामगृहावर भेट घेतली. झावरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात असल्याचे सांगितले. शिरूर येथे शिष्टमंडळाने तपासे यांच्यासमोर वर्पे यांच्याविरुद्धचा असंतोष प्रगट केला. तपासे यांनी निरीक्षक गावडे यांना ८ दिवसांत अहवाल देण्यास सांगितले. शिष्टमंडळात मुरकुटे, झावरे यांच्यासह शिर्डी, राहाता, संगमनेर, श्रीगोंदे, नेवासे, शेवगाव, अकोले, पारनेर, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष उपस्थित असल्याचा दावा वर्पेविरोधकांनी केला.