Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

चार वर्षांनंतरही वीज ग्राहक अनभिज्ञच!
संतराम सूळ
जामखेड, १७ फेब्रुवारी

 

सरकारी आदेशाबाबत लोकांमधील अनभिज्ञतेचा सरकारी कार्यालय गैरफायदा घेऊन कशा प्रकारे लोकांची फसवणूक करू शकते, याचा अनुभव शेतकरी व सामान्य जनता वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत घेत असल्याचे पाहावयास मिळते.
राज्य सरकारने २० जानेवारी २००५ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार ‘महावितरण’ ग्राहकांना देत असलेल्या सेवा किती अवधीत द्याव्यात, अवधीत दिल्या न गेल्यास ‘महावितरण’ने जनतेला त्याबद्दल किती नुकसानभरपाई द्यावी, याची मानके ठरवून दिली आहेत. त्यात फेज किंवा फ्यूज गेल्यामुळे वीज खंडित झाली असल्यास शहरी भागात ४ तासांत, तर ग्रामीण भागात ६ तासांत वीज सुरळीत झाली पाहिजे. तसे न झाल्यास त्या पुढील प्रत्येक तासाला प्रत्येक बाधित ग्राहकास ५० रुपये नुकसानभरपाई ‘महावितरण’ने देणे आवश्यक आहे. तसेच रोहित्र बिघडले, जळाले तर शहरी भागात २४ तासांत, तर ग्रामीण भागात ४८ तासांत रोहित्र दुरुस्त होऊन वीज सुरळीत करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास त्यापुढील प्रत्येक तासाला संबंधित बाधित ग्राहकाला ५० रुपये नुकसानभरपाई ‘महावितरण’ने देणे अनिवार्य आहे.
अध्यादेशात हे सर्व जरी असले, तरी वीज कंपनीच्या कारभाराबाबत विशेषत: ग्रामीण भागातील जनता शेतकऱ्यांना येणारा अनुभव प्रतिकूल आहे. रोहित्र जळाल्यास दोन-दोन आठवडे दुरुस्त केले जात नाही. वैतागलेले लोकच वर्गणी करून रोहित्र दुरुस्तीसाठी प्रयत्न करतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अशा प्रकारची मानके ‘महावितरण’ला लागू आहेत, हेच मुळात ग्राहकांना ठाऊक नाही. तसेच ‘महावितरण’चे कर्मचारीदेखील या बाबत अनभिज्ञच असल्याचे दिसते. या मानकांची माहिती ‘महावितरण’ने ग्राहकांसाठी फलकावर लावणे आवश्यक होते. परंतु अध्यादेश निघून ४ वर्षे झाली, तरी ही माहिती जाहीर करण्याचे सौजन्य वीज कंपनीने दाखविलेले नाही!
काम करणार शेतकरी, बिल काढणार ठेकेदार!
घरगुती वापर अथवा शेतीपंपासाठी वीज घेण्यासाठी रितसर कोटेशन भरले, तरी सर्व कामे ग्राहकांनाच करावी लागतात. घरगुती वीजजोडणीसाठी वीज कंपनीच्या ठेकेदाराकडून मीटर, वायर व अन्य साहित्य घेतल्यानंतर प्रत्यक्षात जोडणीसाठी ठेकेदाराच्या लोकांना ५० ते २०० रुपयांपर्यंत चिरीमिरी द्यावी लागते. विशेष म्हणजे ठेकेदाराचे लोक पैशासाठी सहा-सहा महिने वीजजोड देत नाहीत. दरम्यानच्या काळात संबंधित ग्राहकांना वीज कंपनीकडून वीजबिलेही येतात! ही बाबही नित्याचीच झाली आहे. असे ग्राहक ठेकेदारांच्या लोकांना पैसे देऊन वीजजोड घेतात. तक्रार करूनही वीज कंपनी या बाबत कसलीही कारवाई करीत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे.
खोदाईनंतर विहिरीस पाणी लागल्यास शेतकरी वीज कंपनीकडे वीजजोडाची मागणी करतो. परंतु वर्ष-वर्ष मागणी करूनही शेतीपंपाची वीजजोड मिळत नाही. मंजुरीनंतर वीजजोडासाठी लागणारे साहित्य ठेकेदाराकडून घ्यावे लागते. हे साहित्यही अपुरेच मिळते. हे अपुरे साहित्यही शेतकऱ्यास बाजारात स्वत घ्यावे लागते. त्यानंतर हे सर्व साहित्य खासगी वाहनाने स्वतच्या शेतात न्यावे लागते व खासगी लोकांकडूनच जोडणीचे काम करून घ्यावे लागते. त्यासाठी शेतकऱ्यास लोकांना मजुरी द्यावी लागते. इकडे संबंधित ठेकेदार काम पूर्ण केल्याचे सांगून वीज कंपनीकडून परस्पर कामाची बिले काढताना दिसतात! अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार होत असून, सर्वसामान्य ग्राहक मात्र यात चांगलाच भरडला जात आहे.