Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘लघुपाटबंधारेची कामे तातडीने सुरू न झाल्यास कारवाई’
संगमनेर, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

जिल्ह्य़ातील रोजगार हमी योजनेंतर्गत लघुपाटबंधारेची कामे तातडीने सुरू न झाल्यास ‘रोहयो’ कायद्यान्वये संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी दिला. संगमनेर तालुक्यातील ७ गावांचा र्सवकष आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तालुक्यातील रोहयो कामांचा आढावा आज डॉ. अन्बलगन यांनी तहसील कार्यालयात घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्य़ात प्रत्येक तालुक्यात रोहयोची कामे सुरू झाली आहेत. गावांची गरज बघून नियोजन केले जात आहे. कामांवर देखरेख करण्यासाठी कनिष्ठ अभियंते व निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक शनिवारी ‘एसएमएस’द्वारे कामांची माहिती घेतली जाईल.
तालुक्यात एकूण ९४ रोहयो कामे सुरू करण्याचे सूचित केले आहे. पंचायत समितीकडे ५७ कामे सोपविली आहेत. तालुक्यातील खरशिंदे, जवळे बाळेश्वर, चोरकौठे, नान्नज, डिग्रस, खांडगाव, तळेगाव या गावांचा रोहयोचा र्सवकष आराखडा तयार करण्यात आला आहे. तेथील पाणीटंचाई, रस्ते, पाटबंधारे, तलाव आदी कामे केली जातील.
जिल्ह्य़ातील अनेक गावांत मजुरांकडून कामांची मागणी आहे. सुमारे ७१ गावांत प्रत्येकी एक याप्रमाणे ७१ कोटी खर्चाच्या योजना आहेत. गावांचा सर्वागीण विकास करण्याचा त्यामागे उद्देश आहे. पाच ते सात तालुक्यांतील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन रोहयो कामांचा आढावा घेण्यात येईल. नवीन दराने ८८ कोटी, तर जुन्या दराने दीडशे कोटींची कामे मंजूर आहेत. या वर्षांत रोहयोवर सुमारे ७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कृषी सहायकांचा संप सुरू असल्याने त्यांची कामे मंडलाधिकाऱ्यांवर सोपविली आहेत. आतापर्यंत झालेल्या सर्व कामांचे मजुरीचे वाटपही झाले आहे. आजच्या आढावा बैठकीत रोहयो योजनेविषयी एकही तक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. आय. केंद्रे, प्रांताधिकारी बी. एच. पालवे, तहसीलदार अनिल पवार, गटविकास अधिकारी पी. एम. चौधरी उपस्थित होते.