Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून पारनेरच्या हितासाठी प्रयत्न - शहा
निघोज, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा फायदा झाला. हेच सूत्र स्वीकारून पुणे जिल्ह्य़ाबरोबरच पारनेर तालुक्याला फायदा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली.
बँकेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल शहा यांचा भैरवनाथ दूध संस्था परिवाराच्या वतीने पंचायत समितीचे सदस्य खंडू भुकन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी श्री. शहा बोलत होते. अध्यक्षस्थानी पराग दूध उद्योगसमुहाचे अध्यक्ष बबनराव कवाद होते. युनियन बँकेचे मंचर शाखा व्यवस्थापक भालेराव, उद्योगपती प्रीतम शहा, बाबाजी टेमगिरे, भैरवनाथ दूध संस्थेचे सचिव दिलीप उनवणे, संचालक शिवाजी वरखडे, बाबाजी वाघमारे, ‘पराग’चे कार्यकारी संचालक दत्ता भुकन आदी या वेळी उपस्थित होते.
केंद्राचे कृषिमंत्री शरद पवार यांचे मार्गदर्शन व राज्याचे अर्थमंत्री दिलीप वळसे यांच्या नेतृत्वाखाली बँकेचा विकास झाला. बँकेच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, व्यापारी, उद्योजक यांचा विकास झाला. या घटकांमुळेच बँकेवर काम करण्याची संधी आपणास मिळाली. पारनेर तालुक्यातील भैरवनाथ संस्था परिवाराला याचा फायदा मिळाला. बँकेने २ अब्ज ७० कोटींच्या ठेवी जमा केल्या. आजपर्यंत दोन अब्जांचे कर्जवाटप केले असल्याची माहिती श्री. शहा यांनी दिली.
भैरवनाथ संस्था परिवाराचे संस्थापक बबनराव कवाद यांनी सांगितले की, देवेंद्र शहा व प्रीतम शहा या बंधूंच्या माध्यमातून समाजकारण काय असते याची माहिती आम्हाला मिळाली. त्यांचेच अनुकरण करून आम्ही जांबूत (तालुका शिरूर), तसेच निघोज व परिसरात दूध शीतकरण केंद्रे उभी केली. शेतकऱ्यांच्या दुधाला सर्वाधिक भाव दिला. भैरवनाथ दूध संस्था परिवाराच्या विकासात शहा बंधूंचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली पराग दूध उद्योगसमूह व संस्था परिवार आर्थिक भरभराटीला आला.
उद्योगपती प्रीतम शहा, भुकन, भालेराव आदींची भाषणे झाली. दिलीप उनवणे यांनी आभार मानले.