Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

रुग्णवाहिका सुरू करून प्रतिष्ठानचा आदर्श - राजळे
पाथर्डी, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

रुग्णवाहिका सेवा सुरू करून श्रीआनंद प्रतिष्ठानने एक चांगला आदर्श निर्माण केल्याचे मत आमदार राजीव राजळे यांनी व्यक्त केले.
प्रतिष्ठानने तालुक्याची गरज ओळखून रुग्णवाहिका सेवा सुरू केली. त्याचे उद्घाटन श्री. राजळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष खाबिया होते. व्यासपीठावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख, नगरसेविका मंगल कोकाटे, माजी नगराध्यक्ष हिंदकुमार औटी, भाजपचे अशोक गर्जे उपस्थित होते.
श्री. राजळे म्हणाले की, जैन धर्मात असणारे विविध प्रवाह एकत्र आणत आनंदऋषीजींनी शांती, अहिंसा व प्रेमाची शिकवण दिली. त्यांच्या शिकवणीचा आदर्श घेऊन आनंद प्रतिष्ठानच्या सदस्यांनी चांगला पायंडा पाडला.
शहरातील तरुण सेवाभावी वृत्तीने काम करतात, ही समाधानाची बाब आहे. जयंती, पुण्यतिथी साजरे करण्यास मर्यादा हवी. समाजाचे आपण काही देणे लागतो, याचे भान ठेवून जेवढे देता येणे शक्य आहे, तेवढे देण्याचे काम तरुणांनी करायला हवे. स्वतपुरता विचार करण्याचे सोडून वृद्धांची सेवा करायला हवी. तसेच आजचा तरुण भरकटलेला आहे, असे म्हणणेही आपण सोडून द्यायला हवे. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल्यास समाज सुधारण्यास वेळ लागणार नाही, असे श्री. राजळे म्हणाले.
पालिका गटनेते बंडू बोरुडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष मधुकर काटे, संचालक सीताराम बोरुडे, रमण लाहोटी, अजय भंडारी, विठ्ठल मंत्री, बैय्या देवढे, डॉ. सुहास उरणकर, जमीर आतार, राजू चोरडिया, राजू गुगळे उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अभय भंडारी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गोवर्धन देखणे यांनी सूत्रसंचालन केले. अभय गांधी यांनी आभार मानले.