Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

निमगाव खलूचा पूल बनला धोकादायक!
श्रीगोंदे, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

नगर व पुणे जिल्ह्य़ांना जोडणाऱ्या भीमा नदीवरील पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. पुलाचे संरक्षक कठडे गायब असतानाच पुलावरील रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने काही ठिकाणी पूल अक्षरश तुटला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने या पुलावर गेल्या ११ वर्षांत कसलीही दुरुस्ती न करता केवळ टोल आकारणीचे ठेके देण्याचे काम केले. हा पूल मृत्यूचा सापळा बनला आहे.
तालुक्यातील निमगाव खलू येथील भीमा नदीवरील या पुलावरील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. ११ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या हा पूल राज्य रस्ते विकास महामंडळाकडे आहे. या पुलावरून जाण्या-येण्याकरिता टोल मोजावा लागतो. दर तीन वर्षांंनी या पुलावरील टोलची लिलाव पद्धतीने बोली लावली जाते. या पुलाच्या देखभाल व दुरुस्तीची रक्कम दर वर्षी याच भरण्यातून आकारली जाते. प्रत्यक्षात मात्र या पुलावर ११ वर्षांत साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही.
पुलावरील लोखंडी पाईपचे संरक्षक कठडे अनेक ठिकाणी गायब आहेत. काही ठिकाणी वाहने धडकल्याने पाईप वाकले आहेत. तसेच पुलावरील डांबरी रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. तीन-चार ठिकाणी या खड्डय़ांनी रस्ता तोडला असून, त्यातून थेट नदीतील पाण्याचे दर्शन होते. या रस्त्यावरून सामान्यांबरोबरच मंत्री, अधिकारी यांच्या गाडय़ा दररोज धावत असतात, पुणे, नगर, बारामती, सोलापूर या भागाकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. वाळूच्या गाडय़ा तर मोठय़ा प्रमाणात असतात. या बरोबर पुलाच्या आसपास होणारा वाळूउपशा यामुळेही पुलाला धोका आहेच.