Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘पालिकेने विकास आराखडा तयार केल्यास ‘यशदा’चा निधी मिळेल’
कोपरगाव, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

नगरपरिषदेने शहर विकास आराखडा तयार केल्यास यशदा मागास क्षेत्र अनुदान निधींतर्गत निधी मिळू शकेल, असे प्रतिपादन ‘यशदा’चे सल्लागार पी. डी. कोळेकर यांनी केले.
कोपरगाव नगरपालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन, प्रबोधिनी, यशदा व मागासक्षेत्र अनुदान निधींतर्गत बाह्य़ प्रशिक्षण अंतर्गत पालिकेच्या लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मंगेश पाटील होते.
श्री. कोळेकर म्हणाले की, पालिकेने शहर नियोजन, रस्ते, पाणीपुरवठा, गलिच्छवस्ती सुधारणा, नागरी दारिद्र्य निर्मूलन, उद्याने, बगीचे व क्रीडांगणासाठी प्रोत्साहन आदी १८ प्रकारच्या विकासात्मक कामांचा आराखडा तयार केल्यास ‘यशदा’कडून कोटय़वधींचा निधी मिळू शकतो. नागरिकांच्या गरजा ओळखून त्याचे वर्गीकरण करावे. तातडीचा आराखडा करून तो जिल्हा नियोजन समितीकडे दिल्यास त्यावर कार्यवाही झाल्यानंतर निधी उपलब्ध करून दिला जातो. भारतातील २५० व राज्यातील १२ जिल्ह्य़ांत अशा प्रकारचा निधी लोकसंख्येच्या निकषानुसार देण्यात आल्याचे ते म्हणाले.
लोकांच्या गरजा ओळखून ग्रामीण व शहरी भागासाठी विकासात्मक कार्यक्रम राबवून निर्माण झालेला प्रादेशिक असमतोल दूर करणे हे प्रमुख ध्येय असल्याचे संजय आढाव यांनी सांगितले.
या वेळी नगरपालिका सभा कामकाज कार्यपद्धती, नागरी विकास आराखडा, मागास क्षेत्र अनुदान निधी अंदाजपत्रक आदींविषयीची या वेळी माहिती देण्यात आली.