Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

क ऱ्हे टाकळी येथे आज आरोग्य केंद्राचे उद्घाटन
राहाता, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या सहकार्याने शेवगाव तालुक्यातील कऱ्हे टाकळी येथे ग्रामीण आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली असून उद्या (बुधवार) या केंद्राचे उद्घाटन होत आहे.
प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक पाटील यांनी ही माहिती दिली. ट्रस्टमार्फत जिल्ह्य़ात हे ८वे आरोग्य केंद्र सुरू करण्यात येत असून, चोवीस तास सेवा उपलब्ध असणाऱ्या या केंद्रातून अल्पदरात रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. महिला आरोग्यसेवा, बाल आरोग्यसेवा, युवा आरोग्य केंद्र, कर्करोग निदान आणि एड्सविषयी समुपदेशन आणि तपासणीकरिता विभाग निर्माण केल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरही वेळोवेळी या केंद्रास भेट देऊन मोफत तपासणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेवगाव तालुक्यात सिडा प्रकल्पाच्या माध्यमातून यापूर्वीच विविध आरोग्यसेवा पुरविल्या जात आहेत. फिरता आरोग्य दवाखाना, विविध वैद्यकीय शिबिरे या माध्यमातून या परिसरात प्रवरा मेडिकल ट्रस्टने यापर्वीच आरोग्य सुविधा देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. मात्र, कायमस्वरुपी आरोग्य केंद्र असावे, अशी ग्रामस्थांची सातत्याने मागणी होती. म्हणूनच या मागणीचा विचार करून हे आरोग्य केंद्र उभा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास आमदार नरेंद्र घुले, राधाकृष्ण विखे यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव करपे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधव मुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसाराम खाडे उपस्थित राहणार आहेत.