Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

शेतकरी संघटनेचे उपोषण आश्वासनानंतर मागे
श्रीरामपूर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

बाजार समितीच्या आवारातील शेतीमाल खरेदी करीत संगणक वजनकाटे बसविण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन सभापती नानासाहेब पवार यांनी दिले. त्यानंतर शेतकरी संघटनेने उपोषण मागे घेतले.
बाजार समितीत प्रचलित लोखंडी काटय़ाने माल घेतला जातो. त्यात वजनाची अचूकता नसते. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे संगणक वजनकाटे बसवावेत, या मागणीसाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष पटारे यांच्या नेतृत्वाखाली कचरू पटारे, अहमद शेख, अशोक पटारे, बाबासाहेब भवार, सुधीर खपके, विकास मोरे, राजेंद्र भिंगारे, गोरख उंडे, संजय इंगळे, कुंडलिक भिंगारे यांनी बाजार समितीसमोर उपोषण सुरू केले होते. उपोषणार्थीची सभापती पवार, संचालक दीपक पटारे, राधाकृष्ण आहेर, निवृत्ती बडाख, सचिव किशोर काळे, सहायक निबंधक अनिल भांगरे आदींनी भेट घेतली. शहरातील व्यापार आता संगणक वजनकाटय़ावर चालत आहे. या वजनकाटय़ांमध्ये बदल करता येतो, असे म्हणणे कपोलकल्पित आहे. उलट या काटय़ांमुळे वजनात अधिक अचूकता येते. आता साखर कारखान्यांनी या वजनकाटय़ांचा वापर करावा, असे आदेश साखर संचालकांनी दिले आहेत. त्यामुळे बाजार समितीनेही त्याचे अनुकरण करावे, अशी मागणी पटारे यांनी केली.
सहायक निबंधक हौसारे समितीचे प्रशासक असताना त्यांच्याकडे संगणक वजनकाटय़ाची मागणी संघटनेने केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. लोकनियुक्त संचालक मंडळाने त्याची अंमलबजावणी करावी, जिल्ह्य़ात अन्य बाजार समित्या त्याचे अनुकरण करतील, असे त्यांनी नमूद केले. सहायक निबंधक भांगरे यांनी बाजार समिती कायद्यात अत्याधुनिक वजनकाटे वापरण्याची तरतूद आहे. त्यामुळे समिती संगणक वजनकाटे बसवू शकते, असे म्हटले.
बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संगणक वजनकाटे बसविण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. पणन संचालकांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल, त्यानंतर संगणक वजनकाटे बसवू, असे सभापती पवार यांनी सांगितले.