Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

बँकेतील पत सांभाळून पीक उत्पादन घ्या - जोशी
श्रीरामपूर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

शेतकऱ्यांनी फार्मर्स क्लबच्या माध्यमातून बँकेतील पत सांभाळून पिकांचे उत्पादन घेतल्यास बडोदे बँक अशा शेतकरी समुहाबरोबर खंबीरपणे उभी राहील, असे प्रतिपादन बँकेचे उपमहाव्यवस्थापक अशोक जोशी यांनी केले.
खंडाळे येथील श्रीसमर्थ फार्मर्स क्लबचे उदघाटन व शेतकऱ्यांना बडोदे बँकेच्या सौजन्याने शेडनेटसाठी कर्ज वितरण करण्यात आले. त्या वेळी जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी दत्तात्रेय राऊत होते.
शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्यास बँकेचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. उच्च तंत्रज्ञानाच्या मार्गाने शेतकरी विकास साधू शकतो, अशी अनेक शेतकरी मंडळांची उदाहरणे आहेत. बडोदे बँकेच्या श्रीरामपूर शाखेचे छोटे उद्योजक, शेतकरी, बचतगटांना अर्थसाहाय्य देऊन त्यांना स्वतच्या पायावर उभे करण्याचे काम सुरू आहे. शेतकरी कुटुंबाचा वैद्यकीय विमा, तसेच विद्यार्थी विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जोशी यांनी केले.
यावेळी बँकेचे कृषी विभागप्रमुख पाटील यांनी शेतकऱ्यांनी कर्जफेडीबाबत मानसिकता बदलावी, शेडनेटच्या माध्यमातून नफा मिळवावा आणि ग्रीन हाऊसचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन केले.
कृषी अधिकारी विकास पाटील यांनी कमी जागेत योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब क रून जास्त उत्पादन मिळविता येते, हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. यासाठी कृषी विभागाने कमी खर्चाचे व टिकावू स्वरूपाचे मॉडेल विकसित केले असल्याचे सांगितले. याप्रसंगी गणेश कारखान्याचे अध्यक्ष नारायणराव कार्ले, सुनील बोरुडे, मदन चौधरी यांची भाषणे झाली.