Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

उपनिबंधकांच्या निर्णयामुळे बज यांची उमेदवारी निश्चित
कोपरगाव पीपल्स बँक
कोपरगाव, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

कोपरगाव पीपल्स बँक निवडणुकीतील सभासद सुधीरकुमार बज यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा उपनिबंधक डी. डी. शिंदे यांनी वैध ठरविला. निवडणूक निर्णय अधिकारी ए. बी. कडू यांनी याआधी बज यांचा अर्ज रद्द ठरविला होता. बज यांनी या निर्णयास आव्हान दिले होते.
कोपरगाव पीपल्स बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बज यांनी सर्वसाधारण मतदारसंघातून अर्ज दाखल केला. छाननीवेळी बज हे बँकेचे थकबाकीदार असल्याचे बँकने कळविल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कडू यांनी त्यांचा अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे बज यांनी विधिज्ञ बी. सी. सातव यांच्यामार्फत अपील दाखल केले. त्यात भागीदारी फर्मतर्फे नव्हे, तर बँकेचा वैयक्तिक सभासद म्हणून बज निवडणूक लढवित आहेत. बज यांची फर्म थकबाकीदार असली, तरी फर्मचा वैयक्तिक सभासद थकबाकीदार होत नाही, हे म्हणणे सातव यांनी मांडले.
प्रतिवादी बँकेच्या वतीने विधिज्ञ एस. डी. कुलकर्णी यांनी बाजू मांडली. निवडणूक निर्णय अधिकारी कडू यांनी लेखी म्हणणे सादर केले. जिल्हा उपनिबंधक शिंदे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून वरील निर्णय दिला.
बज म्हणाले की, गेली ३० वर्षे बँकेत आजोबा, वडील, नातू अशी वंशपरंपरा सुरू आहे. बँकेवर प्रतिनिधीत्व देताना मर्जीतील लोकांना ते निवडून आणतात. बँकेचा गैरकारभार उघड होऊ नये, म्हणून सर्वसामान्य अभ्यासू व्यक्तींना स्थान देत नाहीत.
येत्या निवडणुकीत हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी आम्ही विरोधक विजय बडजाते, अनिल सोनवणे, रवींद्र जाधव व आपण स्वत लढा देणार असल्याचे बज यांनी स्पष्ट केले.